अभयगिरी विहार, अनुराधपूर.

श्रीलंकेतील प्राचीन थेरवाद बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा विहार. त्याची स्थापना सिंहली राजा वट्टगामणी अभय (इ.स.पू. २९–१७) यांनी अनुराधपूरच्या उत्तरेकडील भागात केली. त्यांचे उपनाम ‘वलगंबा’ असेही होते. राजाच्या नावावरून ‘अभयगिरी’ हे नाव देण्यात आले. ‘उत्तर विहार’ या नावानेही तो ओळखला जातो. त्या काळात धार्मिक आणि राजकीय सत्ता परस्परावलंबी असल्यामुळे विहारांची भूमिका इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच खूप प्रभावी होती. अनुराधपुरातील सर्वांत मोठा स्तूप अभयगिरी विहाराशी संबंधित आहे.

प्रथम, अभयगिरी विहार देवानंपियतिस्स (इ.स.पू. ३०७–२६७) यांनी स्थापलेल्या महाविहाराशी संलग्न होता; तथापि वट्टगामणी अभय यांच्या राज्यकालाच्या अखेरीस भिक्षू-उपासक परस्परसंबंध आणि पाली ग्रंथांना पुरक संस्कृत ग्रंथांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे अभयगिरी विहार महाविहारापासून स्वतंत्र झाला. तरीही राजा प्रथम गजबाहू (इ.स. ११३–१३५) यांच्या आश्रयामुळे त्याची प्रतिष्ठा आणि संपन्नता लक्षणीयरित्या वाढली. १३ व्या शतकाच्या आसपास अनुराधपूरसुद्धा जेव्हा लयास गेले, अशा परिस्थितीतही अभयगिरी विहारातील दोन प्रमुख महाविद्यालये १६ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.

‘महावंस’ आणि ‘दीपवंस’ या थेरवाद बौद्ध ऐतिहासिक ग्रंथांमध्ये श्रीलंकेत केंद्रित तीन प्रमुख विहारांचा—महाविहार, अभयगिरी आणि जेतवन—उल्लेख आढळतो. राजा प्रथम पराक्रमबाहू यांच्या सुधारणा-कालखंडात अभयगिरी आणि जेतवन विहारांना महाविहार परंपरेत समाविष्ट करण्यात आले; तथापि अभयगिरी विहार अनेकदा सर्वाधिक प्रतिष्ठित आणि प्रभावी मानला गेला.

अभयगिरी विहाराचे स्वतःचे धर्मग्रंथ असल्याचे उल्लेख आढळतात; परंतु त्यांचे स्वरूप महाविहार परंपरेतील पाली ग्रंथसंग्रहापेक्षा किती वेगळे होते, याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काही संशोधकांच्या मते, हा विहार थेरवादातील एक विभाजित गट म्हणून नव्हे, तर महाविहाराच्या मर्यादित चौकटीपलीकडे विविध बौद्धिक व धार्मिक परंपरांचे संगमस्थान म्हणून कार्यरत होता. महायान व वज्रयान (मंत्रयान) घटकांना स्वीकारण्याच्या उदार दृष्टिकोनामुळे हा विहार बहुपद्धतवादी, प्रगतिशील आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संपर्कवर्तुळातील एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आला. चीन, जावा आणि भारतातील बौद्ध संस्थांशी त्याने संबंध प्रस्थापित केले आणि श्रीलंकेत गौतम बुद्धांच्या दंतधातूची प्रथम स्थापना करण्याचे ऐतिहासिक श्रेयही त्याला दिले जाते.

अभयगिरीच्या साहित्यिक परंपरेविषयी उपलब्ध माहिती मर्यादित असली, तरी प्राप्त उल्लेखांवरून ही परंपरा विविध परंपरांनी  समृद्ध अशी बहुआयामी असल्याचे दिसते. महाविहाराच्या पारंपरिक थेरवादापेक्षा वेगळ्या, अधिक उदार आणि बहुविध बौद्ध परंपरांचा केंद्रबिंदू म्हणून अभयगिरी विहाराचे स्थान विशेष महत्त्वाचे ठरते.

संदर्भ :

  • Geiger, W. (Trans.), The Mahavamsa : Or, The Great Chronicle of Ceylon, Pali Text Society, Oxford, 1912.
  • Kassapa, B. J. (Ed.). The Vesatthappakasini : Commentary on the Sivavamsa (with annotations by Śridhara Vasudeva Sodoni), New Nalanda Mahavihara, 1951.
  • Law, B. C. (Trans.), Legends of the Thupa (Thupavamsa). Royal Asiatic Society of Bengal, 1945.
  • Rahula, W. History of Buddhism in Ceylon : The Anuradhapura period, 3rd century BC to 10th century AD., Department of Archaeology, New Delhi, 1956.

समीक्षक : आनंद गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.