ही संज्ञा अमेरिकन चित्रपटांमधल्या विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी चित्रपटांसाठी वापरली जाते. मराठी भाषेत या संज्ञेचा सामान्यत: अर्थ ‘काळा चित्रपट’ किंवा ‘गडद चित्रपट’ असा घेतला जातो. ‘न्वार’ हा फ्रेंच शब्द निनो फ्रँक या चित्रपट समीक्षकाने ‘सिएरि नुवार’ या गुन्हेगारी व तत्सम फ्रेंच साहित्याच्या संज्ञेवरून १९४६ साली प्रथम वापरला. कृष्णधवल छटांचा तीव्रतेने केलेला वापर आणि गडद सावल्यांचे प्राबल्य असलेली प्रकाशयोजना, शहरी वातावरण, गुन्हेगारी क्षेत्र आणि एकंदर निराशामय विश्व अशा काळोख्या दृश्य स्वरूपामुळे ही संज्ञा या चित्रपटांच्या बाबतींत वापरण्यात आली आणि नंतर रूढ झाली. तांत्रिकदृष्ट्या या चित्रपटांवर जर्मनीत १९२० नंतर उदयाला आलेल्या अभिव्यक्तिवादी चित्रपटांचा मोठा प्रभाव झालेला दिसून येतो.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकन समाजात आर्थिक विषमता, राजकीय भ्रष्टाचार यांचा प्रभाव वाढला आणि त्यांतून माणसांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव व नैराश्य, अस्थिरता, बेरोजगारी यांच्यामुळे तेथील समाजात गुन्हेगारी वाढू लागली. महानगरांमध्ये गुन्हेगारी व्यापक आणि संघटित झाली. या सामाजिक परिस्थितीचे पडसाद साहित्यात येऊ लागले आणि जेव्हा त्या प्रखर वास्तववादी (हार्डबॉईल्ड) साहित्यावर आधारित चित्रपट बनू लागले, तेव्हा पडद्यावर ते प्रकर्षाने दिसू लागले. आधीच्या काळातील स्वप्नाळू सांगीतिक चित्रपटांपेक्षा या नवीन प्रकारच्या वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती अधिक मिळू लागली. हा बदल १९४०च्या दशकात घडून आला. या प्रकारचे अगदी सुरुवातीचे चित्रपट सुमार होते; परंतु त्यांची लोकप्रियता पाहून काही प्रतिभावंत निर्माते व दिग्दर्शक यांनी या विधेत काही श्रेष्ठ चित्रपट निर्माण केले. १९३०—४० च्या दशकात अमेरिकेतील ‘प्रखर वास्तववादी’ साहित्यनिर्मितीचे उद्गाते डॅशियल हेमेट, रेमंड चँडलर, डेव्हिड गुडीस, होरेस मॅक्कॉय आणि जेम्स एम. केन यांच्या गुन्हेविषयक कादंबऱ्यांचे रूपांतर चित्रपटांमध्ये होऊ लागले. त्याची सुरुवात जॉन हस्टन दिग्दर्शित ‘द माल्टीज फाल्कन’ (१९४१) पासून; तर अखेर ऑर्सन वेल्सच्या ‘टच ऑफ एव्हिल’ने (१९५८) झाल्याचे मानले जाते; मात्र ‘न्वार’ चित्रपटाची प्रभावी दृश्यवैशिष्ट्ये ‘डबल इंडेम्निटी’ (दिग्दर्शक – बिली वाइल्डर, १९४४) व ‘लॉरा’ (दिग्दर्शक – ओटो प्रेमिन्गर, १९४४) या चित्रपटांतून दिसून येतात. पुढे ती ‘द वूमन इन द विंडो’ (फ्रिट्झ लांग, १९४४), ‘मर्डर माय स्वीट’ (एडवर्ड दमित्रीक, १९४४) ‘द पोस्टमन आल्वेज रिंग्ज ट्वाईस’ (टे गार्नेट, १९४६), ‘द स्ट्रेंजर’ (ऑर्सन वेल्स, १९४६), ‘द बिग स्लीप’ (हॉवर्ड हॉक्स, १९४६) आणि ‘आउट ऑफ द पास्ट’ (दिग्दर्शक – जाक तूर्नर, १९४७) या प्रमुख व इतर अनेक न्वार चित्रपटांत अधिक प्रकर्षाने दिसून येतात.
न्वार चित्रपटांची दृश्यरचना पडद्यावर अंधाऱ्या जगाची निर्मिती करत होती आणि त्या जगाला सुसंगत अशी पात्रे आणि संहिता लिहिल्या जात होत्या. यातली प्रमुख पात्रे तत्कालीन नायकांपेक्षा खूप वेगळी होती. परिस्थितीने गांजलेले, नैतिक दृष्ट्या कमकुवत, मूल्यकुत्सित (सिनिकल), कशाचा तरी आणि कुणाचा तरी आधार शोधणारे नायक या चित्रपटांमध्ये अनायक (अँटीहीरो) गणले गेले. हंफ्री बोगार्ट हा या विधेतला प्रमुख नट ठरला. यातल्या नायिकाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. अनेकदा त्यांना फम-फताल (femme fatale – फ्रेंच संज्ञा) म्हणजे मृत्युकारक स्त्री म्हटले जाते. पुरुषांना मोहात पाडणे, चतुरपणे फसविणे, त्यांचा वापर करणे, कारस्थाने करणे ही अशा व्यक्तिरेखेची वैशिष्ट्ये होत. मोठ्या गुन्हेगारी संघटनांचे अधिपती असलेले बलाढ्य खलनायक यांची इतर पात्रांवर चालणारी पूर्ण हुकूमत इतर पात्रांसाठी दहशतीचे स्वरूप धारण करीत असे. या वातावरणात अशा चित्रपटांचे सर्व कथानक घडत असते. कायदेशीर आणि सभ्य जग झोपी गेल्यानंतर अधोविश्वाचे कामकाज सुरू होण्याचा शिरस्ता असल्याने या चित्रपटांमध्ये रात्रीची दृश्ये अपरिहार्य होती. गुन्हेगारीच्या बंदिस्त जगतात एकदा शिरकाव केला तर सभ्य समाजात परत येण्याची शक्यता दुर्मीळ होती, तरीही ती आशा धरून जगणाऱ्या प्रमुख पात्रांचा अशा चित्रपटांत शोकांतिक अंत ठरलेला असे. त्यामुळे सर्व पात्रे असुरक्षितता, संदिग्धता, अविश्वास यांनी ग्रस्त असतात. खून, हिंसाचार, फसवणूक, कारस्थाने यांनी भरलेले हे जग निराशामयच असू शकते आणि तोच अनुभव या चित्रपटांमध्ये वारंवार प्रत्ययाला येतो.
या चित्रपटांच्या चित्रमांडणीमध्ये प्रकाश व अंधार, सावल्या यांचे विरोधाभासी मिश्रण, तिरकस व असाधारण कोनांतून चित्रीकरण, तुटक आणि विभाजित दृश्ये, विशिष्ट कोनातून साधलेल्या पात्रांच्या संदिग्ध हालचाली अशा तांत्रिक वैशिष्ट्यांचा अवलंब झालेला दिसून येतो. पात्रांचे संशयास्पद तुटक वर्तन आणि वेडसरपणाकडे झुकलेली लहरीवृत्ती व ती दर्शवणारे त्यांचे कटाक्ष, हिंसक, संशयी व गुन्हेगारी वृत्तीचे प्रदर्शन या सगळ्यांतून तणाव, उत्कंठा, रोचकता घडवत प्रेक्षकांना एक भयचकित करवून टाकणारा अनुभव देणारे असे हे चित्रपट असत. या चित्रपटांमध्ये ‘चिअरोस्क्युरो’ पद्धतीने प्रकाशाचा आणि त्याला पूरक असा कॅमेऱ्याचा वापर. पात्रांच्या चेहऱ्यावरील हावभावांना अधिक उठावदार करण्यासाठी अशा चित्रपटांत प्रकाशाचा कमी, पण वस्तुनिष्ठ वापर करण्यात येई. तसेच, चेहऱ्याचे चित्रणही समीप (क्लोज अप) पद्धतीने असे. त्यामुळे काही पात्रांचे भयावह, तर काही पात्रांचे भयकंपित, भयचकित चेहरे पडद्यावर प्रभावी ठरत. त्याचप्रमाणे बहुधा चित्रीकरण रात्री किंवा अंधाऱ्या जागी व (रंगीत चित्रीकरणाची सोय असतानाही) बव्हंशी कृष्णधवल प्रणालीने केले जात असे. सुरुवातीला या चित्रपटांना फारसे आर्थिक पाठबळ नव्हते. अशावेळी कमी प्रकाशयोजना, रात्रीची अनायासे अंधारलेली वेळ अशा वातावरणात चित्रिकरण खर्चिक बाबींना टाळता येत असे. अशा चित्रणामुळे या चित्रपटांचे ‘न्वार’ म्हणजे गडद, काळे हे नाव सार्थ ठरते.
न्वार चित्रपटांच्या नेमक्या स्वरूपाबाबत चित्रपट समीक्षकांमध्ये मतभेद आहेत. रेमंड बोर्डी, एटिएन शौमेटन, अँड्र्यू स्पायसर यांनी अशा चित्रपटांना केवळ एक ठराविक प्रभावशाली दृश्यांची मालिका म्हणून उल्लेखलेले आहे. रेमंड दुरनाट, पॉल श्रेडर, रॉबर्ट पोर्फिरिओ, आर. बार्टन पाल्मर यांसारख्या काही चित्रपट समीक्षकांच्या मतानुसार ‘न्वार’ ही विधा नसून ती केवळ एक चित्रपटशैली आहे. येथे अमेरिकन गुन्हेगारी चित्रपट (गँगस्टर फिल्म्स) आणि न्वार यांच्यामधील फरक पुढीलप्रमाणे दिसून येतो. गुन्हेगारी चित्रपटांचे कथानक गुन्हेगारांचे सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा आणि गुन्हेगार आणि त्यांच्या संघटना यांचे उदयास्त यांच्या कथा सांगतात. गुन्हे कसे आणि का घडतात याची कारणपरंपरा दाखवतात. गुन्हेगारी आणि राजकीय आणि उद्योगविश्वातल्या सामर्थ्यशाली व्यक्ती या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असतात. या चित्रपटांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे आपापसातले संघर्ष तसेच पोलिसांशी होणारे संघर्ष कथेला गती देतात. गुन्हेगारीचा बीमोड झाला पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे ही कल्पना अंतर्भूत असते. हे चित्रपट एखाद्या विशिष्ट दृश्यशैलीशी बांधील नसतात. गुन्हेगारी चित्रपटांमधल्या स्त्रिया एकांगी व्यक्तिमत्त्वाच्या नसतात. याउलट न्वार चित्रपट सामान्य, असुरक्षित माणसांच्या अध:पतनाच्या कथा सांगतात. न्याय-अन्याय, जुलुमी माणसांना शासन होणे, आशादायक शेवट अशा गोष्टींना येथे थारा नसतो. हे चित्रपट खूपच शैलीबद्ध असतात आणि त्यातल्या स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व साचेबंद आणि घडीव असते.
रॉजर एबर्ट या विख्यात अमेरिकन समीक्षकाने फिल्म न्वारची प्रमुख वैशिष्ट्ये अशी मांडली आहेत. त्यांच्या मते, “न्वार ही विधा नसून एक छटा आहे. न्वारमध्ये कथेच्या सूत्रापेक्षा एका निराशावादी नैतिक विश्वात वावरणाऱ्या पात्रांची मनःस्थिती, वृत्ती आणि क्रियांना अधिक महत्त्व असते. या भ्रष्ट अधोविश्वात न्याय मिळत नाही. स्वातंत्र्य हे एक मृगजळ असते. माणसाच्या प्रबळ इच्छा, मोह, लैंगिक आकर्षण आणि महत्त्वाकांक्षा त्याला विनाशाकडे नेते. न्वार चित्रपटांतील स्त्री ही पुरुषांना विनाशाकडे नेणारी असते. ती निव्वळ ‘वाईट’ नसते तर पुरुषी भीती आणि इच्छेचे मूर्त स्वरूप असते, पुरुषांचा अंमल असलेल्या जगात ती अधिक आत्मभानाने वागते. न्वारमधील शहरे म्हणजे चक्रव्यूह असतात. इथे माणसे सर्वार्थाने हरवतात आणि नष्ट होतात.”
भारतात न्वार चित्रपटांचा प्रभाव १९५० सालानंतर दिसून येतो. गुरुदत्त यांचे ‘बाजी’ (१९५१) आणि ‘जाल’ (१९५२), राज खोसला यांचा ‘सीआयडी’ (१९५६) ही याची ठळक उदाहरणे म्हणत येतील. ‘हावरा’ (१९५८) हा शक्ती सामंत दिग्दर्शित चित्रपट जरी गुन्हेगारी संबंधी असला तरी न्वारच्या जवळ जाणार होता. गोदार या प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शकाने न्वारची शैली वापरून ‘अल्फाविल’ (१९६५) हा भविष्यवेधी काल्पनिक विज्ञानपट तयार केला. अलीकडच्या काळात देशोदेशी न्वार शैली वापरून आधुनिक काळातली कथानके रचली जात आहेत. त्यांचे स्वरूप पूर्वीच्या न्वार पेक्षा अधिक वास्तववादी दिसून येते. त्यांना नवन्वार (NeoNoir) असे संबोधले जाते. सद्यकाळात ‘न्वार’ प्रकार मोठ्या पडद्यावरील चित्रपटांपुरता मर्यादित न राहता दूरचित्रवाणीसारख्या मालिकांच्या माध्यमातून व महाजालकाच्या (इंटरनेट) ‘ओटीटी’ माध्यमातून लोकप्रिय होत आहे.
संदर्भ :
- Borde, Raymond, and Etienne Chaumeton, A Panorama of American Film Noir, 1941–1953, trans. Paul Hammond , San Francisco, [2002 (1955)].
- Conard, Mark T., The Philosophy of Neo-Noir, Lexington, 2007.
- Schrader, Paul, “Notes on Film Noir”, Film Comment 8, no. 1 (collected in Silver and Ursini, Film Noir Reader [1]), 1972.
- Spicer, Andrew, Film Noir. Harlow, 2002.
- 10 Shades of Noir : Film Noir – An Introduction; http: // www. imagesjournal.com/issue02/ infocus/filmnoir.htm
समीक्षक : अनिल झणकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.