जारोरी, गौतम : (जन्मदिनांक उपलब्ध नाही). भारतीय जीवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म राजस्थानमधील कनोर या गावात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाजगी शाळेत राजस्थानात येथेच झाले. शालांत परीक्षेत ते राज्यातून प्रथम होते. पुढे त्यांनी उदयपूर कॉलेजमधून प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या पूर्वपरीक्षेत यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी मूलभूत विज्ञान संशोधनाचा मार्ग निवडला. बडोद्यातील महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून जीवरसायनशास्त्र विषयात एम्.एस्सी. पदवी प्रथम क्रमांकाने आणि दोन सुवर्ण पदकांसह संपादन केली. पुढे त्यांनी मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेतून पीएच.डी. पदवी संपादन करून तेथेच अध्यापन सुरू केले. फुलब्राइट शिष्यवृत्तीमुळे ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पुढील संशोधनासाठी गेले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेतच आपले अध्यापन आणि संशोधनाचे कार्य सुरू ठेवले.
जारोरी यांना प्रथिनांची रचना आणि कार्य यांचा परस्परसंबंध याबद्दल आकर्षण होत. जीवरसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि प्रोटिऑमिक्स (शरीरातील एकूण प्रथिन प्रकारांचा संच) या विषयात अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याच्या शिकवणी पद्धती विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रेरणा देतात. त्यांना दोन दशके घनभौतिकी (Solid state physics) विषयात संशोधन करण्याची संधी मिळाली.
जारोरी आणि त्यांचे सहकारी हिवतापकारक एकपेशी परजीवी प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरममधील एनोलेज विकरावर (एंझाइम) संशोधन करीत असतांना आढळून आले की, प्लाझ्मोडियमच्या पृष्ठावरील एनोलेज प्रथिनातील पाच ॲमिनो अम्लांचा खंडांश वेगळा केला असता अब्जांश कणावर त्यांचा लेप लावून ते कण उंदराच्या शरीरात अंत:क्षेपित केले. या एनोलेज प्रथिनाविरुद्ध प्रतिद्रव्ये निर्माण करण्याचे काम उंदराच्या शरीरात झाले. नंतर या प्रतिद्रव्यांनी प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरमचे संक्रमण थांबविले. परिणामी प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरमचे वाहक डास आणि माणूस या दोन पोशिंद्या प्राण्यांत पूर्ण होणारे जीवनचक्र भेदता आले. प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरमच्या पृष्ठावरील हा खंडांश माणसाच्या एनोलेजमध्ये सापडत नाहीत. हिवतापासारख्या गंभीर समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात जारोरी यांचे हे वेगळ्याच दिशेने केलेले प्रयत्न मोलाचे आहे.
जारोरी यांचे शोधनिबंध पुढीलप्रमाणे अनेक प्रतिष्ठित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत : करंट सायन्स, मलेरिया जर्नल, मॉलेक्युलर अँड बायोकेमिकल पॅरासायटॉलॉजी, आर्काईव्हज ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोफिजिक्स, इत्यादी. त्यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून एक्सलन्स इन टीचिंग अॅवार्ड फॉर बायॉलॉजी देऊन सन्मान करण्यात आले आहे.
कळीचे शब्द : #मलेरिया #लस #इनॉलेझ विकर
संदर्भ :
- https://www.tifr.res.in/~dbs/faculty/GK_Jarori.html
- https://scholar.google.com/citations?user=mr2mC3MAAAAJ&hl=en
- https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/health-news/tifr-scientists-come-up-with-potential-malaria-vaccine/articleshow/49491770.cms
- https://indianexpress.com/article/india/india-news-india/from-the-lab-search-for-an-anti-malaria-vaccine-2/
- https://www.pubfacts.com/author/Gotam+K+Jarori
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.