सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे प्लास्मोडियम सूक्ष्मपरजीवी

प्लास्मोडियम या सूक्ष्मपरजीवीचा आधुनिक वर्गीकरण विज्ञानानुसार प्रोटिस्टा सृष्टीतील ॲपिकॉम्लेक्सा (Apicomplexa) संघातील हिमोस्पोरिडा (Haemosporida) गणातील प्लास्मोडिडी (Plasmodiidae) कुलामध्ये समावेश होतो. शार्ल ल्वी आल्फॉस लाव्हरां या फ्रेंच वैज्ञानिकांनी १८८० मध्ये या परजीवीचा शोध लावला. याच्या उपसर्गामुळे मनुष्य व प्राण्यांना हिवताप (मलेरिया) हा रोग होतो. याच्या जवळपास २०० पेक्षा अधिक जाती सु. १४ उपप्रजातींमध्ये विभागलेल्या आहेत.

प्लास्मोडियम प्रजाती एकपेशीय दृश्यकेंद्रकी असून ती सदापरजीवी (Obligatory parasite) आहे. ती पृष्ठवंशीय प्राणी व कीटकांमध्ये आढळते. प्लास्मोडियमचा जीवनक्रम रक्तावर जगणारा कीटक (मादी डास) पोशिंद्याच्या शरीरात विकसित होतो. ही प्रजाती योग्य पोशिंदा मिळाल्यास संसर्ग करू शकते. याच्या जीवनचक्रातील कीटक पोशिंदा ॲनाफेलीस प्रजातीच्या डासाची मादी ही हिवतापाची वाहक असते, मात्र नर वाहक नसतात.

प्लास्मोडियमच्या पुढील पाच जाती हिवतापाचा मानवामध्ये संसर्ग पसरवतात – प्ला. व्हायव्हॅक्स, प्ला. मलेरिई, प्ला. फाल्सिपरम, प्ला. ओव्हेलप्ला. नोलेसी. प्ला. फाल्सिपरम ही जाती मानवाला अधिक घातक आहे. तिच्या संसर्गामुळे दरवर्षी जगात हजारो लोक मरण पावतात. हिवतापावर अनेक प्रकारची औषधे विकसित करण्यात आली आहेत. परंतु, प्लास्मोडियम प्रजातीमध्ये औषधाला प्रतिकार करण्याची क्षमता विकसित झाल्याचे दिसून आले आहे.

प्लास्मोडियम  : जीवनचक्र

प्लास्मोडियमचे जीवनचक्र : प्लास्मोडियमच्या जीवनचक्रात डास हा कीटक व माणूस हा सस्तन प्राणी असे दोन आश्रयी असतात. ज्या आश्रयींमधून परजीवीचा प्रसार होतो आणि लैंगिक प्रजनन होते अशा आश्रयीस प्राथमिक आश्रयी (डास) म्हणतात. प्राथमिक आश्रयीमधून द्वितियक आश्रयीमध्ये काही अवस्था झाल्याशिवाय (अलैंगिक प्रजनन) जीवनचक्र पूर्ण होत नाही. प्लास्मोडियम परजीवी आश्रयींच्या पेशीमध्ये राहतात. त्यांचे प्रजनन आश्रयी पेशींमध्येच होते. त्यांच्या शीर्षस्थानी असलेला सूक्ष्मनलिका समूह हा शीर्ष समूह (Apical complex) या नावाने ओळखला जातो. शीर्ष समूहातील पेशी अंगके आश्रयी पेशीत शिरकाव करण्यासाठी विकसित झाली असल्याने जीवनचक्रातील ही अवस्था बीजाणुज (Sporozoite) या नावाने ओळखली जाते. बीजाणुज ही अवस्था डासाच्या दंशावेळी माणसाच्या शरीरात प्रवेश करते. सु. एका तासात हे सर्व सूक्ष्मजीव व्यक्तीच्या यकृतात पोहोचतात. हे बीजाणू काही वेळा वर्षापेक्षा अधिक काळ यकृतात राहतात. याला यकृत सुप्तावस्था (Hypnozoite) असेही म्हणतात. प्लास्मोडियम परजीवी यकृतात पोहोचल्यावर यकृत पेशींना उपसर्ग निर्माण करतात. ही अवस्था खंडपेशिका (Merozoites) या नावाने ओळखली जाते. यकृत पेशी मधून बाहेर पडल्यानंतर प्लास्मोडियम परजीवी तांबड्या रक्तपेशीत प्रवेश करतात. त्यानंतर ते सातत्याने तांबड्या रक्तपेशींना उपसर्ग करतात. त्यातील काही परजीवींचे रूपांतर युग्मक पेशीमध्ये (Gametocytes) होते. प्राथमिक आश्रयी डास हे यातील काही युग्मक पेशी रक्ताबरोबर शोषून घेतात. मानवी शरीरातील रक्तामधून सूक्ष्म युग्मके डासांच्या मधांत्रामध्ये (Mid gut) जातात. तेथे युग्मक पेशीचे रूपांतर नर व मादी पेशीमध्ये होते. त्यांचे फलन होऊन युग्मनज (Zygote) तयार होतो. त्याचे नंतर चलयुग्मनजामध्ये (Ookinete) रूपांतर होते. हा चलयुग्मनज मध्यांत्राच्या भिंतीत शिरतो. या भिंतीतून तो बाहेर येऊन त्याचे रूपांतर युग्मकपुटीमध्ये (Oocyst) होते. या युग्मकपुटीचे अनेकदा विभाजन होऊन त्यापासून छोटे छोटे लांबट आकाराचे बीजाणूज तयार होतात. हे बीजाणुज डासाच्या लाळग्रंथीकडे स्थलांतरित होतात. डास मानवास दंश करताना बीजाणुज डासाच्या लाळेमधून मानवी रक्तात प्रवेश करतात व आपल्या जीवनक्रमाची पुनरावृत्ती करतात.

उपसर्ग झालेल्या तांबड्या रक्तपेशीत खंडपेशिकांची प्रथम वाढ अंगठीच्या आकारासारखी होते व त्यानंतर तिचे रूपांतर पोषपेशिकेत (Tropozoites) होते. या पोषपेशिका खंडप्रसू (Schizonts) या अवस्थेत परिपक्व होतात. त्यांचे अनेकवेळा विभाजन होऊन नव्या खंडपेशिका तयार होतात. बाधित तांबड्या रक्तपेशी नंतर फुटतात. त्यामुळे हजारो खंडजीव मुक्त होऊन सर्व शरीरभर पसरतात. त्यामुळे नव्या तांबड्या रक्तपेशी बाधित होतात. बहुसंख्य खंडपेशिका ह्या प्रजोत्पादनाचे चक्र चालू ठेवतात. परंतु, काही खंडपेशिका तांबड्या रक्तपेशींना बाधित केल्यावर त्यांचे रूपांतर नर व मादी अशा लैंगिक अवस्थेत होते. त्यांना लैंगिक पेशी म्हणतात. या लैंगिक पेशी रक्तात फिरतात व बाधित पृष्ठवंशीय पोशिंद्याला डासाने दंश केल्यावर रक्तामधून या पेशी डासांच्या लाळग्रंथीतून शरीरात प्रवेश करतात.

हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्मोडियम या परजीवीच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे डासामध्ये दिसत नाहीत. याचे कारण प्लास्मोडियमच्या उत्क्रांती इतिहासात मिळते.

पहा : प्लास्मोडियम : हिवताप परजीवी, लाव्हरां, शार्ल ल्वी आल्फाँस (पूर्वप्रकाशित),  हिवताप (पूर्वप्रकाशित).

संदर्भ :

  • https://www.britannica.com/science/maleria
  • https://www.cdc.gov/malaria/about/biology/index.html
  • https://www.org/maleria/life cycle-maleria life cycle

समीक्षक : सुरेखा मगर-मोहिते