प्लास्मोडियम ह्या एकपेशीय सूक्ष्मपरजीवाच्या उपसर्गामुळे (Infection) हिवताप होतो. या सूक्ष्मजीव प्रजातीचा समावेश प्रोटिस्टा सृष्टीत ॲपिकॉम्प्लेक्सा (Apicomplexa) प्राणिसंघातील प्लास्मोडीडी (Plasmodiidae) कुलात होतो.

प्लास्मोडियम

इतिहास : शार्ल ल्वी आल्फाँस लाव्हरां (Charles-Louis-Alphonse Laveran) ह्या फ्रेंच लष्करी शल्यतज्ञांनी १८८० मध्ये प्लास्मोडियमचा शोध लावला. त्यांनी ह्या सूक्ष्मजीवाला ‘ऑसिलॅरिया मलेरिई’ (Oscillaria malariae) हे नाव दिले. परंतु, कालांतराने ते ‘प्लास्मोडियम’ असे झाले.

ब्रिटिश लष्करातील परंतु, भारतात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रोनाल्ड रॉस (Dr. Ronald Ross) यांना १८९७ मध्ये ॲनाफेलीस डासांच्या अन्नमार्गात आणि लाळग्रंथीत हिवतापकारक सूक्ष्मजीव सापडले. १८९८ मध्ये जिव्हान्नी बाट्टिस्टा ग्रास्सी (Giovanni Battista Grassi) यांनी डासांच्या लाळग्रंथींमध्ये प्लास्मोडियम असतो हे दाखवून दिले. हेन्री शॉर्ट (Henry Shortt) व सिरील गार्नहम (Cyril Garnham) ह्यांना मानवी यकृतात हिवतापाचे जंतू सापडले. एक दिवसाआड आणि दोन दिवसाआड येणारा हिवताप डासांच्या दोन भिन्न जातींमुळे येतो, हे कामिल्लो गोल्जी (Camillo Golgi) यांनी दाखवून दिले. अशा शोधांतून हिवतापकारक जीवांचे जीवनचक्र स्पष्ट होऊन हिवतापाच्या नियंत्रणासाठी दिशा मिळाली.

एका ठराविक जातीच्याच पोशिंद्याच्या विशिष्ट प्रकारच्या पेशींमध्येच प्लास्मोडियमचे बीजाणु (Sporont) शिरतात. त्यासाठी त्यांना पेशीच्या अग्रभागी एक विशेष लांबटगोल लवकसदृश (Plastid) पेशी अंगक असते. प्लास्मोडियमचे अग्रस्थ अंगक (Apicomplex) एकेकाळी स्वतंत्रपणे जगणाऱ्या प्लास्मोडियमच्या लाल-शैवाल पूर्वजांमधील हरीतलवकांसारखे होते. त्यांचा उपयोग प्रकाशसंश्लेषणाने अन्न तयार करण्याऐवजी पोशिंद्याच्या पेशीत घुसण्यासाठी होऊ लागला. ह्या एकाभोवती एक चार पटले असणाऱ्या खास पेशी अंगकावरूनच ‘ॲपिकॉम्प्लेक्सा’ हे नाव पडले.

प्लास्मोडियम  प्रजातीतील जाती : प्लास्मोडियमच्या अनेक जातींपैकी माणसांमध्ये हिवताप रोग पसरविणाऱ्या पुढील जाती आहेत — प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स (P. Vivax), प्ला. ओव्हेल (P. ovale), प्ला. मलेरिई (P. Malariae) आणि प्ला. फाल्सिपरम (P. Falsiparum). १९३२ पासून यात नोलेसी  (Knowlesi) या जातीची भर पडली. मुळात नोलेसी ही चिंपांझींमध्ये हिवताप निर्माण करणारी जाती होती. परंतु, ती आता स्वत:मध्ये बदल घडवून नव्या अतिरिक्त पोशिंद्यांत म्हणजे माणसांमध्येही हिवताप निर्माण करू लागली आहे.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या प्लास्मोडियम फाल्सिपरमने बाधित झालेल्या तांबड्या (लोहित) पेशी

प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स : या जातीचा प्रसार विस्तृत क्षेत्रात झालेला असून ती मुख्यत: आशिया खंडात आणि दक्षिण अमेरिकेत आढळते. यामुळे रोगी दगावू शकतात.

प्लास्मोडियम ओव्हेल  : या जातीचा फारसा प्रसार झालेला नाही. थोड्या प्रमाणात आफ्रिकेत आणि फार थोड्या प्रमाणात आशिया खंडात आहे. याची रोगकारकता सौम्य प्रकारची असते.

प्लास्मोडियम मलेरिई : ही जाती थोड्या प्रमाणात आफ्रिकेत, क्वचितच आशियात आणि दक्षिण अमेरिकेत आढळते. याची रोगकारकता सौम्य प्रकारची असते. यामुळे दर दोन दिवसांनी ताप येतो.

प्लास्मोडियम फाल्सिपरम : ही जाती मोठ्या प्रमाणात आफ्रिकेत, थोड्या प्रमाणात आशियात आणि दक्षिण अमेरिकेत आढळते. फाल्सिपरम जातीच्या हिवतापात मेंदूत रक्तस्राव होतो. लघ्वीमधून रक्त येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे (Coma), मनाचा गोंधळ होणे, वृक्क (Kidney) निकामी होणे अशी लक्षणे दिसतात. हा अतिधोकादायक जातीचा हिवताप (Cerebral malaria) मेंदूवर परिणाम घडवून आणतो. तसेच यामुळे शरीरक्रियांमध्ये वाढत्या प्रमाणात गुंतागुंत होत राहते. वैद्यकीय उपचारांअभावी रोगी मरण्याची शक्यता खूप जास्त असते.

प्लास्मोडियम नोलेसी : या जातीचा प्रसार आग्नेय आशिया खंडात मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतात अजून तरी याचा प्रसार झालेला दिसत नाही. यात रोग्याला रोज ताप येतो. याचे रोगी दगावण्याचे प्रमाण फाल्सिपरम आणि व्हायव्हॅक्स यांपेक्षा कमी असते.

प्लास्मोडियमच्या इतर दोनशेपेक्षा अधिक जाती असून त्यांमुळे पक्षी, माकडे (गोरिला, बोनोबो इत्यादी), सरीसृप वर्गातले प्राणी आणि अन्य अनेक प्रकारचे सस्तन प्राणी यांना हिवताप होतो.

जीनोम  (Genome) : अचूक औषध योजना आणि प्रभावी लस निर्मितीसाठी प्लास्मोडियमच्या जीनोमचा कसून अभ्यास आवश्यक आहे. अग्रस्थ अंगकांच्या उत्क्रांतीवरून असे लक्षात आले की, प्लास्मोडियमचे पूर्वज लाल शैवालासारखे (Red algae) स्वतंत्रपणे जगणारे एकपेशीय प्रकाशसंश्लेषक सजीव होते. प्लास्मोडियमसारख्या जीवांनी परजीवी अधिवासाचा मार्ग पत्करल्यावर त्यांच्या जीनोमचा संकोच झाला. सध्या माहित असलेल्या प्लास्मोडियमच्या जीनोममध्ये चौदा गुणसूत्रे, सुमारे ५,००० जनुके आणि सुमारे २३,०००,००० डीएनए (नायट्रोजन आधार; Nitrogen based) आहेत. प्लास्मोडियमच्या अंदाजे ५०% जनुकांचे नेमके कार्य अजून समजलेले नाही. परंतु, परजीवी जीवनशैलीमुळे ती निकामी झाली असावीत असे मानले जाते.

प्लास्मोडियम सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी मुख्यत: गोरिलासारख्या कपिंमध्ये  हिवताप आजार निर्माण करणारा परजीवी होता. कालांतराने त्यात उत्क्रांती होत गेली. साधारण मागील ४,००० वर्षांपासून प्लास्मोडियमने पोशिंदा म्हणून गोरिलासारख्या कपिऐवजी माणसाची निवड केली आहे. त्यामुळे आता याचा जगभर प्रसार झाला आहे.

पहा : शार्ल ल्वी आल्फाँस लाव्हरां (पूर्वप्रकाशित), हिवताप (पूर्वप्रकाशित).

संदर्भ :

  • https://www.dictionary.com/browse/mal-
  • Encyclopedia Britannica
  • https://www.malariasite.com/history-science/
  • https://www.scientificamerican.com/article/when-was-malaria-first-di/
  • https://www.cdc.gov/malaria/about/history/index.html
  • http://www.malwest.gr/en-us/malaria/informationforhealthcareprofessionals/basicpointshistory.aspx
  • https://www.cell.com/cell/fulltext/S0092-8674(17)30714-6

समीक्षक : रंजन गर्गे