भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मुख्यत: मध्य प्रदेशातील मंडला, बालाघाट, सिधी, कटनी, शहडोल, सिंगरौली, अनुपपूर, उमरिया, दिंडोरी, नेतरहाट इत्यादी जिल्ह्यांत आढळून येते. तसेच काही अगरिया लोक बिहार, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतसुद्धा आढळतात. अगरिया जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४१,२४३ इतकी होती.

दंतकथांनुसार गोंड जमातीतील दोन भावांमधील वादामुळे अगरिया जमात ही गोंड जमातीपासून वेगळी होऊन एक स्वतंत्र जमात म्हणून उदयास आली. त्यांचा संबंध विस्तवाशी (अग्नी) असल्यामुळे त्यांना ‘अगरिया’ असे संबोधले जाऊ लागले. यांच्यात सुमारे ८९ गोत्र असून सर्व गोत्र निसर्गापासून बनलेले आहेत. उदा., बघेल गोत्र हे वाघा (बाघ) पासून घेतले आहे. यांच्यात असूर, केल्हा, पथरिया, खुटिया, महली, चोंक, गोंडदुका इत्यादी उपजमाती आढळून येतात.

या जमातीतील लोक मध्यम व मजबूत बांध्याची, रुंद नाक, पातळ ओठ, काळसावळी असतात. पुरुष धोतर (पंच), अंगरखा (बंडी) व डोक्यावर शेला गुंडाळतात; तर स्त्रीया लुगडे व चोळी घालतात. त्यांच्यात शरीरावर गोंदवून घेण्याची परंपरा असून विशेषत: महिला हात, पाय, कपाळ, हनुवटी इत्यादी ठिकाणी गोंदवून घेतात. या लोकांची वस्ती इतर आदिवासींप्रमाणे दुर्गम जंगली, डोंगराळ व ग्रामीण भागांत आढळते. त्यांच्या घराच्या भिंती मातीच्या, पांढरा चुना किंवा गेरुने सारवलेल्या आणि छप्पर गवत किंवा कवेलुंची असतात. अगदी थोडे शिक्षित व सधन अगरिया पक्के घरे बांधून राहत आहेत.

अगरिया जमातीत पितृसत्ताक परंपरा आहे. पूर्वी हे लोक कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक पद्धतीचा वापर न करता लोहयुक्त दगडांपासून शुद्ध लोखंड मिळविण्याची क्लिष्ट पद्धत कोणत्याही आधुनिक शिक्षणाशिवाय विकसित केली होती. त्यांचा मुख्य व्यवसाय लोखंडापासून विळे, फावडे, कुऱ्हाडी, कुदळ, नांगर, बाणांचे टोक इत्यादी अवजारे बनविण्याचा आहे. ते लोखंड गाळण्याला केवळ काम मानत नसून त्याला एक धार्मिक विधी समजतात. लोखंड गाळण्यापूर्वी ते पूजा करतात. ते अवजारे बनवून बाजारात विकतात. तसेच जंगलातून तेंदुची पाने, मोह, जंगली कंदमुळेदेखील गोळा करतात. काही लोक शेती व शेतमजुरी करतात. सामाजिक व आर्थिक कार्यात महिलांचा सहभाग असतो. हे लोक पावसाळ्यात घरी खाण्याकरिता मासे पकडतात. काही अगरिया शिक्षण घेऊन शासकीय व खाजगी क्षेत्रांत नोकरी करत आहेत.

अगरिया जमात शाखाहारी व मांसाहारी आहे. त्यांचे मुख्य अन्न भात, पेज, मक्याची भाकरी, उडीद, मूग, चण्याच्या डाळीचे वरण असून आहारात हंगामी भाज्यांचाही ते समावेश करतात. तसेच मासे, कोंबडे, बकरे, हरण, रानडुक्कर, ससा इत्यादी प्राण्यांचे मांस खातात आणि मोहापासून दारू बनवून पितात.

अगरिया जमातीमध्ये भिन्न वैवाहिक गोत्र असून वधुमूल्यास मान्यता आहे. जन्म, लग्न आणि मृत्यू यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी लोखंडाच्या वापराला हे लोक शुभ मानतात. वराच्या बाजूने लग्नाचा प्रस्ताव ठेवला जातो आणि वडीलधाऱ्यांकडून समारंभ केला जातो. पूर्वी बालविवाह लावण्याची प्रथा होती; मात्र आता मुलगा व मुलगी सज्ञान झाल्यानंतरच विवाह होताना दिसतात. त्यांच्यात घटस्फोट, विधवा किंवा विधूर यांना पुनर्विवाह करण्यास मान्यता आहे. या जमातीमध्ये पारंपरिक जातपंचायत असून त्याच्या प्रमुखास गौतिया असे म्हणतात. पंचायतीमार्फत अनैतिक संबंध, जमाती वादविवाद सोडविले जातात. गर्भधारणेदरम्यानच्या विधींमध्ये स्थानिक वृद्ध महिला घरी प्रसूती करतात. बाळंतपणानंतर मोह, जांभूळ, तेंदूची साल, गूळ इत्यादींचा काढा करून गर्भवती महिलेला दिला जातो.

अगरिया लोक निसर्गपूजक असून ते पृथ्वी, अग्नी, लोखंड यांची पूजा करतात. तसेच बुधदेव, ठाकूरदेव, दुल्हादेव, लोहासूर, बागदेव, शीतलमाता, जोगनी, इत्यादी देवीदेवतांचीही ते पूजा करतात. ते नवखणी, दसरा, दिवाळी, होळी, कर्मपूजा इत्यादी सण साजरे करतात. सण-उत्सवांच्या वेळी ते कर्म, पाडकी, लग्न इत्यादी नृत्य करतात आणि, कर्म, दादरिया, सुगीत, विवाह गीत इत्यादी पारंपरिक लोकगीते गातात. त्यांचा भूत, जादूटोणा यांवर विश्वास आहे.

जमातीत मृत व्यक्तीला पुरले जाते. तीजच्या तिसऱ्या दिवशी कुटुंबातील पुरुष व नातेवाइक पुरुषांचे केस कापतात. अंत्यसंस्कारानंतर दहाव्या दिवशी समाजातील लोकांना जेवण दिले जाते.

संदर्भ : एलविन, वेरियर (अनु. परिहार, प्रकाश), अगरिया, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली.

समीक्षक : आरती नवाथे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.