‘ॲनातोलियन भाषासमूह’ या नावाने काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील प्राचीन ॲनातोलिया म्हणजेच आजच्या तुर्किये व आसपासच्या प्रदेशातील लुप्त भाषांचा निर्देश होतो. यामध्ये इंडो-यूरोपियन भाषाकुळातील हिटाइट, लुवियन (अ आणि ब), लिसियन, लिडियन, पलाईक, पिसिडियन, कॅरियन व सेडिटिक या भाषांचा, तसेच हटियन, हुरियन यांसारख्या बिगर इंडो-यूरोपियन भाषांचा समावेश होतो. म्हणजे, ॲनातोलियन भाषासमूह ही संज्ञा भाषांच्या प्रादेशिक गटाचा उल्लेख करते, पण इंडो-यूरोपियन भाषाकुळाच्या अभ्यासाच्या संदर्भात हीच संज्ञा या समूहातील केवळ इंडो-यूरोपियन भाषांसाठीसुद्धा वापरली जाते. त्या अर्थाने ॲनातोलियन भाषासमूह हा इंडो-यूरोपियन भाषाकुळाची उपशाखा मानला जातो.

ॲनातोलियन भाषा इ.स.पूर्व तिसऱ्या सहस्रकापासून इ.सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापर्यंत वापरात होत्या व त्यानंतर त्या पूर्ण लुप्त झाल्या. यांपैकी, हिटाइट, लुवियन (अ) व पलाईक या भाषांच्या वापराचे इ.स.पूर्व दुसऱ्या सहस्रकापासूनचे लिखित पुरावे सापडतात. सर्वात अलिकडचे, म्हणजे इ. सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील पुरावे पिसिडियन भाषेचे आहेत. त्यावरून, पिसिडियन ही शेवटची ॲनातोलियन भाषा ठरते. हिटाइट, लुवियन (अ) व पलाईक या भाषा क्युनिफॉर्म लिपीमध्ये म्हणजे ओल्या मातीच्या पाटीवर खिळ्यांचे ठसे उमटवून लिहिल्या जाणाऱ्या लिपीमध्ये लिहिल्या जात असत. लुवियन ब हायरोग्लिफ लिपीत आणि इतर भाषा अल्फाबेटिक म्हणजे वर्णलिपीमध्ये लिहिल्या जात. हिटाइट ही सर्व ॲनातोलियन भाषांमध्ये महत्त्वाची गणली जाते कारण त्या भाषेचे लिखित पुरावे सर्वात जास्त प्रमाणात आढळले आहेत. तसेच, सर्व ॲनातोलियन भाषांमध्ये ती सर्वात प्राचीन आहे.

हिटाइट भाषा हिटाइट साम्राज्याची लिखित भाषा होती. स्वत: हिटाइट भाषक आपल्या भाषेला ‘नेसिली’ किंवा ‘नेसुम्निली’, म्हणजे ‘नेसाची भाषा’ म्हणून ओळखत होते. ॲनातोलियामधील नेसा किंवा कानेश येथे हिटाइट साम्राज्याची सुरुवात झाली व नंतरच्या काळात हिटाइट सम्राट हटुशली पहिला याने आपल्या साम्राज्याची राजधानी हटुशा येथे हलवली. ही राजधानी आत्ताच्या तुर्कियेमधील बोगाजकोईच्या (आताचे बोगाजकाले) जवळ होती. येथेच इ.स.पूर्व १२०० च्या सुमारास हिटाइट साम्राज्य अस्तंगत झाले व त्यासोबत हिटाइट भाषा प्रत्यक्ष वापरातून लुप्त झाली.

इ.स. १९०६ ते १९१२ या कालावधीत तुर्कियेमधील बोगाजकोई या ठिकाणी चालू असलेल्या उत्खननात क्युनिफॉर्म लिपीतील हिटाइट भाषा लिहिलेल्या मातीच्या हजारो पाट्या सापडल्या. मात्र या लिपीतील भाषेची उकल १९१५ मध्ये बेडजिक ह्रॉज्नी (Bedřich Hrozný) या चेक भाषाशास्त्रज्ञाने केली. या भाषेतील शब्दांचे इतर इंडो-यूरोपियन भाषांशी असलेले साधर्म्य, विशेषत: क्रियापदांच्या प्रत्ययांतील सारखेपणावरून त्याने ही भाषा इंडो-यूरोपियन कुळातील असल्याचा अंदाज वर्तविला. उदाहरणार्थ, ezzatteni ‘खातो/खाईल’ या हिटाइट क्रियापदामध्ये त्याला ‘खाणे’ या अर्थाच्या, प्राचीन उच्च जर्मनभाषेतील ezzan, लॅटिनमधील edo, संस्कृतमधील ‘अद्’  या धातूंशी असलेले साधर्म्य जाणवले. तसेच -tteni हा कालवाचक प्रत्ययही लॅटिन व संस्कृतमधील प्रत्ययांशी जवळीक साधणारा वाटला. पुढील काही वर्षांमध्येच हिटाइटचे इंडो-यूरोपियन कुळाशी असलेले नाते सर्वमान्य झाले.

हिटाइट व इतर ॲनातोलियन भाषांचे इंडो-यूरोपियन भाषांच्या तौलनिक-ऐतिहासिक भाषाभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण, फेर्दिनां द सोस्यूरने मांडलेल्या, नंतरच्या काळात ‘स्वरयंत्रीय व्यंजने अभ्युपगम’ (the laryngeal hypothesis) या नावाने प्रख्यात झालेल्या सिद्धांताची हिटाइटने पुष्टी केली. सोस्यूरच्या म्हणण्यानुसार प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषांमध्ये काही व्यंजने होती (ज्यांना पुढे स्वरयंत्रीत व्यंजने म्हणण्यात आले), जी लुप्त झाल्यामुळे तत्कालीन ज्ञात अशा कोणत्याही प्राचीन किंवा अर्वाचीन इंडो-यूरोपियन भाषांमध्ये आढळत नव्हती. तीच व्यंजने हिटाइटमध्ये मात्र आढळत असल्याने सोस्यूरच्या मांडणीलाच नव्हे तर संपूर्ण ऐतिहासिक-तौलनिक भाषाभ्यासाच्या विश्लेषण पद्धतीला वैज्ञानिक अधिष्ठान असल्याचे सिद्ध झाले. या व्यंजनांखेरीज हिटाइट भाषेच्या रचनेत इतर सर्व इंडो-यूरोपियन भाषांपेक्षा खूपच वेगळी वैशिष्ट्ये आढळतात. त्यामुळे ॲनातोलियन भाषांचे इंडो-यूरोपियन भाषाकुळाशी नेमके नाते कशा प्रकारचे आहे, याविषयी मतभेद आहेत. काहींच्या मते, ॲनातोलियन ही इंडो-यूरोपियन भाषाकुळाची प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेपासून सर्वात आधी फुटून निघालेली, सर्वात प्राचीन शाखा आहे. इतर काही तज्ज्ञांच्या मते प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषा व हिटाइट/ॲनातोलियन या अधिक प्राचीन, लुप्त अशा प्रोटो-इंडो-ॲनातोलियन भाषेच्या उपशाखा आहेत. या मतानुसार ॲनातोलियन ही प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेची शाखा नसून भगिनी भाषाकुळ आहे.

ॲनातोलियन भाषांची ध्वनिव्यवस्था

ॲनातोलियन भाषांच्या तौलनिक अभ्यासातून प्रोटो-ॲनातोलियन भाषेची पुनर्रचना कल्पिता येते. त्यानुसार सामान्य ॲनातोलियनमध्ये */p/, */t/, */k/, */k’/, */kw/  ही अघोष स्पृष्ट व्यंजने, */b/, */d/, */g/, */g’/, */gw/ ही सघोष स्पृष्ट व्यंजने, */s/ व */h/ ही घर्षक व्यंजने, तसेच */m/, */n/ ही अनुनासिके व */y/, */r/, */l/, */w/ ही विवृत व्यंजने आढळतात. याशिवाय */H/ या चिन्हाने या भाषेतील विविध स्वरयंत्रीय घर्षक व्यंजनेही (*/h1/, */h2/, */h3/) दाखवली जातात. या भाषेत */ts/देखील काही ठिकाणी असल्याचे दिसते. स्वरांमध्ये */i/, */e/, */a/, */o/, */u/ हे पाच ह्रस्व स्वर व */i:/, */e:/, */æ:/, */a:/, */o:/, */u:/ दीर्घ स्वरही आढळतात.

ॲनातोलियन भाषांचे व्याकरण

प्रोटो-ॲनातोलियन भाषेमध्ये केवळ दोनच लिंगभेद आढळतात- प्राणिदर्शकलिंग व नपुंसकलिंग. प्राणिदर्शकलिंग हे मानवासह प्राणिवाचक शब्दांकरिता वापरले जाई व त्यात स्त्रीलिंग व पुल्लिंग असा भेद केला जात नसे. इतर सर्व नामे नपुंसकलिंगी होती. प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषांमधील द्विवचन ॲनातोलियन भाषांमध्ये आढळत नाही. मात्र नामांना लागणाऱ्या विविध विभक्तिप्रत्ययांबाबत प्रोटो-इंडो-यूरोपियन व प्रोटो-ॲनातोलियन भाषांमध्ये बरेच साम्य आहे. या दोन्ही भाषांमध्ये कर्ताकारकासोबतच, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक, अधिकरणकारक, संबंध व संबोधन हे अर्थ दाखवणारे विभक्तिप्रत्यय आढळतात. त्यांच्या प्रत्ययांच्या रूपांतही साम्य दिसते. जसे, संप्रदानकारक विभक्तीचे एकवचनाचे रूप प्रोटो-ॲनातोलियनमध्ये */-e/, तर प्राचीन हिटाइटमध्ये /-i/ किंवा /-ya/ आणि प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेतही /-ya/ आहे. संबंधदर्शक विभक्तिप्रत्यय- प्रोटो-ॲनातोलियन व प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेमध्येदेखील */-es/, */-os/ आहेत. मात्र ॲनातोलियन भाषांमध्ये प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेत न आढळणारी प्रेरक विभक्तीसुद्धा आढळते. तसेच दिशादर्शक म्हणजे ‘–च्याकडे’ असा अर्थ दाखवणारी विभक्तीसुद्धा (allative) ॲनातोलियन भाषांमध्ये आहे.

ॲनातोलियन भाषांमध्ये वर्तमान व भूत असे दोन काळ धातूंना पुढे लागणाऱ्या प्रत्ययांनी दर्शविले जातात. तसेच पूर्ण व अपूर्ण असे क्रियाव्याप्तीचे दोन भेद व विधानार्थ आणि आज्ञार्थ असे दोनच अभिव्यक्तीचे भेद दाखवले जातात. काही साहाय्यक धातूंचा वापरदेखील या भाषांमध्ये आढळतो. त्याचबरोबर, काही संयुक्त क्रियापदे किंवा क्रियापदांची एकाच वाक्यात येणारी साखळीसुद्धा आढळते. यात विशेषत: जाणे व येणे या धातूंचा मुख्य धातूला विशिष्ट अर्थांची जोड देण्यासाठी उपयोग केलेला आढळतो. अशा वेळी, जाणे व येणे हे धातू जाण्याची किंवा येण्याची क्रिया दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, लुवियनमधील ॲण्ड्र्यू गॅरट यांनी दिलेले वाक्य पहा-

(१) iyandu= ku= wa                           zassin  DUMU-annassi[n]  annin     warallin            uwata[ndu]

जा.तृपु.बहु.आज्ञार्थ=संयोगीपद=आश्रयी    हा         विशेषण-कर्म              आई.कर्म   आत्मवाचक.कर्म   ने.तृपु.बहु.आज्ञार्थ

‘आणि त्यांनी या मुलाच्या स्वत:च्या आईला नेऊ जावे (= न्यावे).’

बहुतेक सर्व ॲनातोलियन भाषांमधील वाक्यांची रचना कर्ता-कर्म-क्रियापद अशा स्वरूपाची आहे; पण क्रियापद वाक्याच्या सुरुवातीलाच येण्याचे प्रमाणही खूप आहे. कर्ता प्रथम किंवा द्वितीयपुरुषी असल्यास वाक्यातून वगळला तरी चालतो. तृतीयपुरुषी कर्ता वगळल्यास कर्तृपदाच्या स्थानी काही अर्थहीन सर्वनामे घालता येतात. या भाषांचे खास वैशिष्ट्य म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला पहिल्याच बलयुक्त शब्दाला लागून येणारे विविध अर्थांची बद्ध पदे किंवा आश्रयी पदे. वरील वाक्यातील संयोगीपद- ‘आणि’ या अर्थाचे ku, तसेच त्यापुढचे wa ही दोन्ही या आश्रयी पदांची उदाहरणे आहेत.

ॲनातोलियन भाषा ॲनातोलियामधील बिगर इंडो-यूरोपियन भाषांच्या जवळून संपर्कात होत्या, असे दिसते. हिटाइटसारख्या भाषेत हाटिक, हुरियन तसेच अकेडियन भाषांमधून खूप शब्द आयात केलेले सापडतात. विशेष म्हणजे, राजा, राणी यासाठीचे शब्द तसेच प्रशासकीय व्यवहारातील शब्द, काही धार्मिक व कर्मकांडांशी संबंधित शब्द बिगर इंडो-यूरोपियन भाषांमधून घेतलेले आहेत. ॲनातोलियन भाषांची ऐतिहासिक पुनर्रचना करताना येणारी मोठी अडचण ही आहे की या भाषांमधील शब्दसंपत्तीचे पुरेसे व स्पष्ट विश्लेषण अद्याप उपलब्ध नाही. लिखित साधनांचा हिटाइट भाषेइतका व्यापक साठा इतर ॲनातोलियन भाषांचा सापडत नाही. शिवाय, हिटाइटमधील साहित्याचे नमुने प्रशासन, व्यापारी व्यवहार, धार्मिक व्यवहार यांच्याशी अधिक संबंधित असल्याने दैनंदिन व्यवहारातील भाषिक वापरात आढळणाऱ्या सर्वसामान्य शब्दांचे नमुने फारसे हाती लागत नाहीत. तरीही, व्याकरणरचनेच्या साधर्म्यावरून या भाषांचे इंडो-यूरोपियनत्व सर्वमान्य झालेले आहे. ॲनातोलियन भाषांवर पुष्कळ अभ्यास झालेला असून आजही त्यात सातत्याने भर पडत आहे. पुरातत्त्वीय उत्खननातून सापडलेले ॲनातोलियन भाषांचे नमुने तुर्कियेमधील इस्तंबूल व अंकारा येथील वस्तुसंग्रहालयांमध्ये तसेच जर्मनीत बर्लिनच्या वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवलेले आहेत.

पहा : लिडियन संस्कृति, https://vishwakosh.marathi.gov.in/31948/

संदर्भ :

  • Hout, Theo P.J. van den, Cate, Philo H.J. Houwink ten, Melchert, Craig H., ‘Anatolian languages’, Encyclopedia Britannica, 20 May 2015. https://www.britannica.com/topic/Anatolian-languages. (Accessed: December 20, 2025).
  • Klein, Jared, Joseph, Brian, Fritz, Matthias (in cooperation with Mark Wenthe), Handbook of Comparative and Historical Indo-European Linguistics, De Gruyter Motoun, Berlin, 2017.
  • Melchert, Craig H., Historical Phonology of Anatolian (In Journal of Indo-European Studies, vol. 21, No. 3 & 4.  237-257) 1993.
  • Spinney, Laura, Proto: How one ancient language went global, William Collins, London, 2025.
  • https://glottolog.org/resource/languoid/id/anat1257 (Accessed: January 13, 2026).

समीक्षक : मिलिंद मालशे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.