संघर्ष हा जीत-जेत्यांमध्ये असतो, स्त्री-पुरुषात, मालक-कामगारात, माणूस-निसर्गात, धर्माधर्मांत, राष्ट्राराष्ट्रांत असतो. मार्क्सवाद विरुद्ध भांडवलशाही, स्त्रीवाद विरुद्ध पितृसत्ताक पद्धती, पर्यावरणवाद विरुद्ध आधुनिकवाद, मानववाद विरुद्ध निसर्गवाद या प्रकारच्या विचारसरणींमध्ये असणारा विरोध उघड आहे. जडवाद-चैतन्यवाद, ईश्वरवाद-निरीश्वरवाद, बुद्धीप्रामाण्यवाद-अनुभववाद, इहवाद-परलोकवाद, वास्तववाद-चिद्वाद यांमधील विरोधही अभ्यासक जाणतात. मात्र त्यामानाने मानववाद व मानवतावाद यात असणारा भेद व संघर्ष विचारात घेतला जात नाही.
येथे ‘मानव’ ही संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे. मानव म्हटले की, चार्वाकांना ‘चैतन्यविशिष्ट देह’ अभिप्रेत असतो व त्याचा पुरुषार्थ कामापुरता सीमित असतो. जैनांना मोक्षासाठी प्रयत्नशील असणारा चैतन्यलक्षणी जीव म्हणजे माणूस वाटतो, तर बौद्धमत पंचस्कंधयुक्त मानव मानते. त्रिगुणात्मक प्रकृती व पुरुष असे द्वैत सांख्य मानतात, म्हणून मानवही द्वैतात्मक (जड व चैतन्ययुक्त) असतो, तर योगमतात ‘पुरुषविशेष’ही आढळतो. त्यामुळे सांख्यमतात शक्य नसणारे ईश्वरप्रणिधान योगमतात येते. परिणामी मानव, त्याची कर्तव्यकर्मे, उद्दिष्टे, पूर्णावस्था, पूर्णवस्था शोधण्याची साधने यांतही मतभिन्नता दिसून येते. मानववाद किंवा मानवतावाद जेव्हा मानवाचा विचार करतात, तेव्हा मतभिन्नता अभिप्रेत नसते. सृष्टीतील इतर प्राण्यांहून निराळा असणारा, दोन हात, पाय, डोळे, कान असणारा, इतर प्राण्यांहून बुद्धिमान, तर्कप्रिय, संवेदनशील, कलाप्रेमी, सौंदर्यान्वेशी, भाषासंपन्न, मूल्यांची कदर करणारा, धर्मसंस्कृतीची जाण असणारा, वैज्ञानिक दृष्टी बाणलेला, ‘व्युत्पन्नचित्त’ मानव अभिप्रेत आहे.
मानववाद हा मानवकेंद्री, तर मानवतावाद मानवताकेंद्री असतो. निसर्ग, राज्य, कुटुंब, समाज, धर्म यांपेक्षा माणूस मोठा, महत्त्वाचा, श्रेष्ठ मानून त्याचे हित साधण्याला प्राधान्य दिले जाते. मानवतावादात मात्र मानवतेला, माणुसकीला, आपुलकीला, जिव्हाळ्याला, सौहार्दतेबरोबरच परोपकाराला, दयेला, करुणेला, सहानुभूतीला, अनुकंपेला, कणवेला, कळवळ्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. परिणामी दोहोंची मूल्ये मूलतः भिन्न असतात. मानववादात व्यक्तीच्या असण्याला कमालीचे महत्त्व मिळते. असणे अर्थपूर्ण असावे, जगणे समृद्ध व्हावे म्हणून व्यक्ती अहर्निश धडपडते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. नावलौकिक, सत्ता, महासत्ता, पद मिळावे, तसेच आपल्या कार्याचा ठसा उमटावा म्हणून ‘कीर्तिरूपे उरण्या’साठी आटापिटा करते. मानववाद असे सर्व प्रयत्न शिरोधार्य मानतो. माणूस किंवा मानव म्हणजे प्राप्त जीवनाला सुयोग्य आकार देणारा व त्याद्वारे आपले वेगळेपण व्यक्त करणारा प्राणी. त्याच्या त्या कृतीद्वाराच त्याचे माणूसपण अर्थपूर्ण ठरते. असा धीरोदात्तपणे वास्तवाला सामोरा जाणारा व कला, साहित्य, नवनिर्मिती यांद्वारे जीवनाचे सार्थक करणारा मानव अस्तित्ववादाला अभिप्रेत असतो. त्याला निरस, यांत्रिक, बेचव, त्याच त्याच चाकोरीबद्ध जीवनाचा मनस्वी कंटाळा येतो. रितेपणा, भकासपणा, निरर्थकता घालविण्यासाठी तो मनापासून जे आवडते, त्यात स्वतःला झोकून देतो. आवडीच्या क्षेत्रात त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ गवसतो. काळाच्या ओघात तो अपुरा वाटू लागतो. पुन्हा नव्या वाटांवरील प्रवास सुरू होतो आणि जीवनास तो नव्या उमेदीने सामोरा जातो. प्रसंगी वैफल्य, अर्थशून्यता, अपयश किंवा तोचतोचपणा जाणवला, तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तो कोणत्याही आधारांविना शोधतो. परमेश्वरी कृपा किंवा गुरूंचा आधार त्याला मान्य नसतो. इतरेजनांची साथ मिळाली तर बेहत्तर; नाही मिळाली तर ‘एकला चालो रे’ प्रमाणे त्याची वाटचाल अविरत चालू राहते.
उन्मुनो, पास्कल, नित्शे, किर्केगॉर, हायडेगर, सार्त्र, बूबर, काम्यू, दोस्तोव्हस्की, काफ्का, यास्पर्स आदी अस्तित्ववाद्यांना असाच मानव अभिप्रेत आहे; तर सीमॉन द बोव्हारने ‘स्त्री’च्या अस्तित्वावर क्ष-किरण टाकले आहेत. मानवेंद्रनाथ रॉय यांचा मानववाद मानवाच्या विवेकक्षमतेला अधोरेखित करणारा आहे व अशा विवेकी जनांचा समाज मानवजातीचा उत्कर्ष साधू शकतो, असा त्यांना विश्वास आहे. जे. कृष्णामूर्ती यांना प्रत्येक मानवाचा ‘स्वतंत्र’ विकास अपेक्षित आहे. विसाव्या शतकात व्यक्तिमाहात्म्य वाढीस लागल्याने मानववादानेही मानवी अस्तित्वाची प्रतिष्ठा अधोरेखित करताना व्यक्तीव्यक्तींतील भेद निदर्शनास आणले.
विरुद्ध, मानवतावाद हा व्यक्तीव्यक्तींतीलच नव्हे, तर मानव व मानवेतर सृष्टीतील भेद मिटवून टाकतो. मानवतावादाचा भर करुणेवर असतो. प्रेम, सेवा, त्याग, समर्पण हे मानवतावादातील परवलीचे शब्द होत. समाधान, कर्तव्यपूर्तीचा आनंद येथे ध्येयप्राप्तीपेक्षा अधिक असतो. मानववादी हा ध्येयासक्त असतो. त्याला विशिष्ट ध्येयपूर्तीचा ध्यास असतो. मानवतावादी हा दुःखी, पीडितांच्या व्यथा-वेदनांवर यथाशक्ती फुंकर घालतो, असह्य दुःखाची बोच कमी करण्यासाठी रात्रंदिवस झटतो. त्याची निष्ठा स्वतःप्रती तर असतेच, पण आर्त, दुःखाने गांजलेल्या, होरपळलेल्या जीवांवर मायेची पाखर घालणे हा त्याचा स्थायीभाव असतो, स्वभाव असतो. साने गुरुजींच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे’ मानतो तो मानवतावादी. त्याला जात, धर्म, देश, लिंगभाव दिसत नाही. तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचे भले करत राहतो, ते केवळ मानवतावादी भूमिकेमुळे. साने गुरुजी, म. गांधी, विनोबा भावे, मदर तेरेसा, बाबा आमटे, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस व संतमहंत मानवतावादी असतात. त्यांची आत्मशक्ती विलक्षण असते. सोसून, खपून, झिजून त्यांनी आत्मबळ कमाविलेले असते. विरुद्ध, मानववादातील आत्मबळाची संकल्पना निराळी आहे. प्रत्येकाने राजकारणात, समाजात, कुटुंबात राहून जे सामर्थ्य प्राप्त केले, त्याची अभिव्यक्ती कला, साहित्य, संगीत, क्रीडा यांसारख्या क्षेत्रात होते व तीच ज्याची त्याची ताकद असते. तिचा बरा-वाईट वापर होत राहतो आणि मग मानववाद अपुरा, थिटा वाटून मानवतावादाची कास धरली जाते.
संदर्भ :
- Bass, Gary J, ‘Humanitarian Impulses’, The New York Times Magazine, 2008.
- Wilson, Richard Ashby; Brown, Richard D. Eds., Humanitarianism and Suffering : The Mobilization of Empathy, Cambridge, 2009.
- https://www.allaboutphilosophy.org/humanism.htm
समीक्षक : लता छत्रे