स्वरूप / व्याख्या : भारतीय परिचर्या परिषद (Indian Nursing Council – INC) ही भारतातील परिचर्या शिक्षण व व्यवसायाचे मानक निश्चित करणारी व नियमन करणारी एक केंद्रीय वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशभरातील परिचर्या शिक्षणाची गुणवत्ता, प्रशिक्षण आणि व्यावसायिक पात्रता यांचे नियंत्रण करते.

स्थापना व संस्थापक :  भारतीय परिचर्या परिषद ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. केंद्र सरकारने संसदेच्या भारतीय परिचर्या परिषद कायदा, १९४७ च्या कलम ३(१) अंतर्गत परिचारिका, प्रसविका आणि आरोग्य अभ्यागतांसाठी प्रशिक्षणाचे एकसमान मानक स्थापित करण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती.

ऐतिहासिक आढावा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील परिचर्या शिक्षण व सेवा यामध्ये एकसमान मानके नव्हती. त्यामुळे प्रशिक्षित परिचारिका गुणवत्ता आणि प्रशिक्षणामध्ये मोठी तफावत होती.
१९४७ मध्ये भारतीय परिचर्या परिषद अधिनियम मंजूर करण्यात आला आणि १९४९ मध्ये परिषद कार्यरत झाली. यानंतर परिषदेने परिचर्या शिक्षणासाठी एकसमान अभ्यासक्रम, प्रशिक्षण मानके आणि नोंदणी प्रणाली लागू केली. आज भारतीय परिचर्या परिषद भारतातील परिचर्या शिक्षणाचे सर्वोच्च नियामक प्राधिकरण आहे.

संघटनात्मक रचना

उद्दिष्टे :

  • परिचर्या शिक्षणासाठी एकसमान मानके निश्चित करणे
  • प्रशिक्षित परिचारिकांची नोंदणी करणे
  • परिचर्या संस्थांना प्रशिक्षिण देण्यासाठी  मान्यता देणे
  • परिचर्या शिक्षणाचे   मूल्यमापन करणे व गुणवत्ता सुधारणा करणे

हेतू :

  • उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षित परिचारिका तयार करणे.
  • परिचर्या व्यवसायाची वाढ  आणि विकास करणे.

ब्रीदवाक्य :
“Quality Nursing Education for Quality Health Care”

“दर्जेदार  आरोग्य सेवेसाठी दर्जेदार परिचर्या शिक्षण “

संघटनात्मक रचना : हे सर्व सदस्य मिळून कार्यकारिणी मंडळ तयार होते आणि ठराविक निर्णयाची प्रक्रिया पार पाडली जाते.

भारतीय परिचर्या परिषदेची रचना :- ( सदस्य संख्येनुसार)

विभाग/नियम क्रमांक विभाग तपशील एकूण सदस्यता
३(१)(अ) राज्य परिचारिका परिषदा (परिचारिका) २९
३(१)(ब ) संस्था प्रमुख (विद्यापीठे) ०२
३(१)(क ) संस्था प्रमुख (आरोग्य अभ्यागत) ०१
३(१)(ड ) भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) ०१
३(१)(ई ) भारतीय वैद्यकीय  संघटना (IMA) ०१
३(१)(फ ) भारतीय प्रशिक्षित परिचारिकांची संघटना (TNAI) ०१
३(१)(ग) राज्य परिचारिका परिषद (मिडवाइफ/एएनएम) आळीपाळीने ०४
३(१)(ह) आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) – पदसिद्ध ०१
३(१)( इ) मुख्य अधिसेविका , आर्मी मुख्यालय – पदसिद्ध ०१
३(१)(ज) नर्सिंग सल्लागार – पदसिद्ध ०१
३(१)(क) माता विभाग संचालक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी – पदसिद्ध ०१
३(१)( ल) आरोग्य संचालक/एमई (राज्ये) २८
३(१)(म) परिचर्या  सेवा अधीक्षक ०८
३(१)(न) भारत सरकार नामांकन सदस्य ०४
 ३(१)(ओ) संसद सदस्य ०३
एकूण ८६

 परिषदेची विभागीय रचना आणि विभागाचे स्वतंत्र कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे :

भारतीय परिचर्या परिषदेमध्ये विविध विभाग असतात :

  • शैक्षणिक विभाग – परिचर्या अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण मानके निश्चित करणे.
  • मान्यता विभाग – परिचर्या महाविद्यालयांना प्रशिक्षणासाठी मान्यता देणे.
  • नोंदणी विभाग – प्रशिक्षित परिचारिकांची नोंदणी व नूतनीकरण करणे.
  • निरीक्षण विभाग – परिचर्या संस्थांचे निरीक्षण करून अहवाल तयार करणे.
  • प्रशासन विभाग – व्यवस्थापन आणि नियोजन विषयी धोरण तयार करणे.

 परिषदेतील विविध समित्या खालीलप्रमाणे कार्यरत असतात :

  • परिषदेची कार्यकारी समिती – परिचर्या शिक्षण कार्यक्रमांचा दर्जा राखण्याशी संबंधित कार्य ही समिती करते.
  • परिचर्या शिक्षण समिती – परिचर्या प्रशिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर या समितीत कार्य होतात.
  • समतुल्यता समिती (Equivalence Committee) – ही समिती भारतीय परिचर्या परिषद कायदा, १९४७ च्या कलम ११(२)(अ) किंवा (ब) अंतर्गत नोंदणीच्या उद्देशाने परदेशी पात्रता मान्य करण्या संदर्भात कार्य करते.
  • वित्त सल्लागार समिती – खरेदी आणि इतर कोणत्याही आर्थिक मुद्द्यांसंदर्भात कार्यरत असते.
  • दक्षता समिती – परिचारिकांनी पाळल्या जाणाऱ्या नैतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि दोषी          आढळल्यास अनैतिक कृतीची शहानिशा करण्यासाठी.
  • वरील समित्यांसोबतच विभागीय पदोन्नती समिती, रॅगिंग विरोधी समिती, लैंगिक छळ प्रतिबंध समिती, विविध परिचर्या कार्यक्रमांच्या सुधारणा आणि विकास  यांसाठी परिषदेने वेळोवेळी स्थापन केलेल्या इतर  विविध उपसमित्या नेमूण दिलेली कार्ये करत असतात.

 कामाचे स्वरूप : १) परिचर्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, २) परिचर्या संस्थांना प्रशिक्षणासाठी मान्यता देणे, ३) प्रशिक्षणाची गुणवत्ता तपासणे, ४) प्रशिक्षित परिचारिकांची  नोंदणी करणे, ५) राज्य परिचर्या परिषदांना मार्गदर्शन करणे इ.

शाखा-उपशाखा : भारतीय परिचर्या परिषद ही केंद्रीय संस्था आहे. तिच्या थेट शाखा नसल्या तरी प्रत्येक राज्यात राज्य परिचर्या परिषद (State Nursing Council) कार्यरत असतात. यांच्याशी समन्वय साधून परिचर्या शिक्षणाशी संबंधित खालील अभ्यासक्रम राबविले जातात

.क्र. अभ्यासक्रम कालावधी नोंदणी
सहाय्यकरी परिचारिका प्रसाविका पदविका (ANM) २ वर्ष नोंदणीकृत सहाय्यकरी परिचारिका प्रसाविका
सामान्य परिचर्या आणि प्रसाविका पदविका (GNM) ३ वर्ष नोंदणीकृत परिचारिका नोंदणीकृत प्रसाविका
बी.एस्सी. परिचर्या पदवी ४ वर्ष नोंदणीकृत परिचारिका नोंदणीकृत प्रसाविका
पी.बी.बी.एस्सी. परिचर्या पदव्युत्तर पदवी २ वर्ष पात्रता जोड
एम.एस्सी. परिचर्या पदवित्तर पदवी २ वर्ष पात्रता जोड
एम. फील. परिचर्या (डिसेंबर २०२३ पासून भारतात ही पदवी वैध मानली जात नाही.) १ वर्ष पूर्णवेळ

२ वर्ष अर्धवेळ

पात्रता जोड
पीएचडी परिचर्या ३ ते ५ वर्ष पात्रता जोड
पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑपरेशन रूम नर्सिंग १ वर्ष पात्रता जोड
पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकियाट्रिक (मनोरुग्ण)  नर्सिंग १ वर्ष पात्रता जोड
१० पोस्ट बेसिक डिप्लोमा इन जेरियाट्रिक परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
११ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन नियोनेटल परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१२ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन नेफ्रोलॉजी परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१३ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१४ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन कार्डिओथोरॅसिक स्पेशॅलिटी परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१५ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन आपत्कालीन आणि स्पेशॅलिटी परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१६ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पॅलिएटिव्ह केअर स्पेशॅलिटी परिचर्या १ वर्ष पात्रता जोड
१७ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन हेमॅटोलॉजी नर्सिंग १ वर्ष पात्रता जोड
१८ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑर्थो आणि रिहॅबिलिटेशन नर्सिंगमध्ये १ वर्ष पात्रता जोड
१९ पोस्ट बेसिक डिप्लोमा इन हेमॅटोलॉजी नर्सिंग १ वर्ष पात्रता जोड
२० पोस्ट बेसिक डिप्लोमा इन बर्न अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी नर्सिंग १ वर्ष पात्रता जोड
२१ नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटिकल केअर – रेसिडेन्सी प्रोग्राम २ वर्ष पात्रता जोड
२२ नर्स प्रॅक्टिशनर इन मिडवाइफेरी नर्सिंग  रेसिडेन्सी प्रोग्राम २ वर्ष पात्रता जोड

 वरील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सेवेत असलेल्या परिचारिकांसाठी निरंतर प्रशिक्षणासाठी ई-अध्ययनासाठी गर्भावस्थेतील मधुमेह आणि प्रसूतिपूर्व काळजी हे अभ्यासक्रम देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग :

  • परिचर्या शिक्षणाचा विकास
  • ग्रामीण आणि शहरी आरोग्य सेवांमध्ये सुधारणा
  • आरोग्य जागरूकता कार्यक्रम
  • महिला सक्षमीकरणामध्ये योगदान
  • आरोग्य क्षेत्रातील संशोधन प्रोत्साहन

परिचारिका नोंदणी आणि मार्गनिरीक्षण प्रणाली (Nurses Registration and Tracking System; NRTS) : भारतीय परिचर्या परिषदने भारत सरकारच्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre; NIC) यांच्या सहकार्याने भारतीय परिचारिकांच्या नोंदणीबाबतची सर्व  माहिती जतन व देखभाल करण्याच्या उद्देशाने NIC द्वारे एक प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर नोंदणीकृत परिचारिका आणि नोंदणीकृत प्रसविका (RN & RM), नोंदणीकृत साहाय्यक परिचारिका प्रसाविका  (RANM), नोंदणीकृत महिला आरोग्य अभ्यागत (RLHV) यांची सर्व  माहिती गोळा करण्यासाठी प्रमाणित पद्धत आहे.

परिचारिका नोंदणी आणि मार्गनिरीक्षण प्रणालीची उद्दिष्टे :

  • परिचारिकांची मोफत नोंदणी – सोप्या पद्धतीने मोफत नोंदणी आणि आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाशी जोडणी करून नोंदणी करणे.
  • सरलीकृत नोंदणी आणि देशभरात एकात्मिक एकसमान प्रणाली तयार करणे.
  • परिचारिकांना राष्ट्रीय विशिष्ट ओळख क्रमांकासह सक्षम करणे.
  • पाच वर्षांनी एकदा परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक १५० तासांच्या निरंतर परिचर्या शिक्षणाशी (Continuing Nursing Education; CNE) जोडलेले आहे.
  • परिचारिका एकमात्र ओळखपत्र (Nurse Unique Identification; NUID) मिळवणाऱ्या उमेदवारांना पहिल्यांदाच ३० तासांच्या CNE चे प्रोत्साहन मिळेल.
  • राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धोरणकर्त्यांसाठी प्रभावी मनुष्यबळ नियोजन सुलभ करणे.
  • परिचारिकांच्या संपूर्ण सेवाकाळाचे एकत्रीकरण केलेले ग्राहक-पुस्तिका (pass book) तयार करणे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व :

राष्ट्रीय स्तरावर : राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार (NFNA) : १९७३ पासून परिचारिकांच्या गुणवंत सेवेची ओळख म्हणून हा पुरस्कार प्रस्थापित करण्यात आला. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत भारतीय परिचर्या परिषद पुरस्कार निवडीचे आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे. देशभरातली सर्वोच्च गुणवंत परिचारिकांना हा पुरस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो .

 आंतरराष्ट्रीय स्तरावर : १) जागतिक आरोग्य संघटना (WHO) मानकांशी सुसंगत शिक्षण, २) भारतीय परिचारिकांना परदेशात काम करण्यासाठी पात्रता मिळवून देणे .

संस्थेशी निगडित नियतकालिके (पत्रिका, मासिक, वार्षिकी इत्यादी) : भारतीय परिचर्या परिषद खालील प्रकारची विविध  प्रकाशने करते :

  • वार्षिक अहवाल (Annual Report)
  • परिचर्या शिक्षण मार्गदर्शिका
  • प्रशिक्षण मार्गदर्शक पुस्तिका
  • अभ्यासक्रम पुस्तिका

परिषदेतर्फे / विविध संस्थामार्फत राबविण्यात येणारी इतर विधायक कामे :

  • परिचर्या शिक्षणाचे आधुनिकीकरण
  • प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे
  • संशोधन कार्यास प्रोत्साहन  देणे
  • गुणवत्ता नियंत्रण प्रणाली (Quality assurance procedure ) विकसित करणे

संदर्भ :

  • Basavanthappa, BT. Nursing Administration, 2014.
  • Indian Nursing Council Act, 1947 – Government of India
  • Park, K. Park’s Textbook of Preventive and Social Medicine, 23rd ed.
  • TNAI, History and Trends in Nursing in India.
  • Indian Nursing Council Official Website – www.indiannursingcouncil.org

समीक्षक : सरोज वा. उपासनी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.