दक्षिणपूर्व आशियाच्या मुख्य भूभागापासून (सुंदा) दूर असलेल्या बेटांवर प्राचीन मानव (होमिनिन्स) समुद्र ओलांडून कसे आणि कधी पोहोचले? यांविषयीचा प्राचीन पुरावा इंडोनेशियातील वॉलेसियामधील सर्वांत मोठ्या बेटांपैकी एक असलेल्या सुलावेसी बेटावर मिळाला आहे.

आशिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन मोठ्या भूभागांच्या मधोमध जैवभौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण बेटांच्या समूहास वॉलेसियन बेटे असे म्हणतात. या प्रदेशाचा शोध १८५९ मध्ये ब्रिटिश सृष्टिशास्त्रज्ञ (Naturalist) आल्फ्रेड रसेल वॉलिस (वॉलेस) (१८२३-१९१३) यांनी लावला. त्यांच्या नावावरून या प्रदेशाला वॉलेसिया (Wallacea) असे नाव देण्यात आले. वॉलेस मलय द्वीपसमूहात प्रवास करत असताना त्यांनी येथील सर्व बेटांना भेट दिली. यावेळी या दोन्ही भागातील प्राण्यांचे निरीक्षण करून एका काल्पनिक सीमारेषेची संकल्पना मांडली.  दोन्ही भागात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. बाली (इंडोनेशिया) आणि लाँबॉक(Lombok) यांच्यामध्ये ही काल्पनिक सीमारेषा आहे. या दोन बेटांमध्ये सु. ३५ किमी. अंतर असून मध्यभागी समुद्र आहे. ही रेषा दिसत नसली तरी दोन्ही भागांत दिसणाऱ्या प्राण्यांच्या विभिन्न प्रकारच्या प्रजातींवरून दोन्ही भागातील विभिन्नता अधोरेखीत होते. या सीमारेषेला वॉलेस रेषा (Wallace Line) असे म्हणतात. जैवभौगोलिक दृष्टीने हा प्रदेश आशियाई आणि ऑस्ट्रेलियन प्राण्यांच्या प्रजातींच्या संक्रमण क्षेत्रात येतो. त्यामुळे येथे अनेक वेगळ्या आणि स्थानिक प्रजाती आढळतात, जसे की अ‍ॅनोआ (लहान रानम्हैस), दुर्मीळ रानडुक्कर (Sulawesi Babirusa) आणि जंगली डुक्कर (Sulawesi warty pig).

सुलावेसी बेट (इंडोनेशिया): भौगोलिक स्थान (after Barsan et al. 2025).

वॉलेसिया प्रदेशातील काही महत्त्वपूर्ण बेटे – सुलावेसी, फ्लोरेस, तिमोर हलमाहेरा, सेराम बुरू आणि लाँबॉक. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या ही बेटे समुद्री (oceanic) स्वरूपाची आहेत. हिमयुगात समुद्राची पातळी कमी झाली तरीही ही बेटे आशिया किंवा ऑस्ट्रेलियाशी जमिनीने जोडली गेली नव्हती. त्यामुळे या प्रदेशात पोहोचण्यासाठी प्राचीन मानवांना समुद्र पार करावा लागला.

पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून वॉलेसियन बेटे अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण आशियातून ऑस्ट्रेलियाकडे स्थलांतर करणाऱ्या प्राचीन मानवांना या बेटांमधून जावे लागले. संशोधनानुसार आधुनिक मानव सुमारे ५०,००० ते ६५,००० वर्षांपूर्वी या प्रदेशात पोहोचले. काही बेटांवर यापेक्षा अधिक प्राचीन मानवी अस्तित्वाचेही पुरावे मिळाले आहेत. उदाहरणार्थ, फ्लोरेस बेटावर फ्लोरेन्सिस मानवाचे जीवाश्म सापडले आहेत.

सुलावेसी बेटावर पाषाणयुगाशी संबंधित अनेक महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे आढळतात, ज्यातून प्राचीन मानवांचे वास्तव्य, दगडी साधने आणि प्रागैतिहासिक गुहा-चित्रकलेचे पुरावे मिळतात. दक्षिण सुलावेसीतील वालनाए नदीच्या खोऱ्यातील कॅलिओ (Calio) येथील उत्खननातून काही दगडी हत्यारे सापडली असून त्यांचा काळ १.०४ ते १.४८ दशलक्ष वर्षपूर्व (आद्य प्लाइस्टोसीन) असा आहे. त्यामुळे  हे स्थळ या प्रदेशातील सर्वांत प्राचीन स्थळ मानले जाते. त्याच प्रदेशातील तालेपू (Talepu) येथे दगडी हत्यारे (गाभे आणि छिलके) सापडली असून ती १,१८,००० ते १,९४,००० वर्षांपूर्वीची (मध्य प्लाइस्टोसीन) आहेत.

दक्षिण सुलावेसीतील मारोस – पँगेप (Maros–Pangkep) या कार्स्ट प्रदेशात अनेक गुहा आहेत. लिआंग बुलू बेट्टू (Leang Bulu Bettue) येथे सु. ४५,००० ते २०,००० वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे, दगडी हत्यारे, हाडांची हत्यारे आणि अलंकार सापडले आहेत. लिआंग बुलू  सिपोंग (Leang Bulu’ Sipong) या गुहेत सु. ४३,९०० वर्षापूर्वीचे शिकारीचे दृश्य दाखवणारे सूक्ष्म आणि क्लिष्ट रचना असणारे चित्र रेखाटले आहे. तर लिआंग टेडोंग्ने (Leang Tedongnge) या गुहेत सु. ४५,५०० वर्षे जुने सुलावेसी वॉर्टी डुकराचे चित्र आढळते, जे जगातील सर्वांत प्राचीन प्राण्यांच्या चित्रांपैकी एक मानले जाते. तसेच लिआंग  तिम्पूसेंग (Leang Timpuseng) या गुहेत रेखाटलेले हाताचे ठसे (hand stencils) आणि प्राण्यांची चित्रे सु. ४०,००० वर्षांपूर्वीची आहेत.

यांशिवाय अलीकडे २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात मुना (Muna Island) बेटावर प्रागैतिहासिक काळातील अनेक शैलचित्रे मिळाली असल्याचे नमूद केले आहे.  या चित्रांमध्ये मानवी आकृती, प्राणी, नौका आणि भूमितीय आकृत्या दिसतात. या शैलचित्रांचे  कालमापन सु. ६७,००० वर्षपूर्व केले आहे. ही या प्रदेशातील कलात्मक आणि प्रतीकात्मक परंपरा दर्शविणारी उत्तर प्लाइस्टोसीन काळातील आणि ज्ञात स्रोतांनुसार ही जगातील सर्वांत प्राचीन शैलचित्रे असल्याचे स्पष्ट होते.

वर नमूद केलेले वॉलेसियन प्रांतातील प्रागैतिहासिक पुरावे मानव उत्क्रांती, प्राचीन स्थलांतर, बेटांवरील मानवी अनुकूलन आणि प्रारंभीच्या कलात्मक व प्रतीकात्मक संस्कृतीच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

संदर्भ :

  • Adhi Agus Oktaviana; Renaud Joannes-Boyau; Budianto Hakim; Basran Burhan; Ratno Sardi; Shinatria Adhityatama; Andrea Jalandoni; Hamrullah; Iwan Sumantri & Others, ‘Rock art from at least 67,800 years ago in Sulawesi’. Nature, 650: 652–656, 2026.
  • Basran Burhan; Budianto Hakim; Iwan Sumantri; Suryatman; Andi Muhammad Saiful; Adhi Agus Oktaviana; Ratno Sardi & Others, ‘A near-continuous archaeological record of Pleistocene human occupation at Leang Bulu Bettue, Sulawesi, Indonesia’, PLOS One, 20 (12): 1-51, 2025. https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0337993
  • Kealy, S.; Louys, J. and O’Connor, S., ‘Islands Under the Sea: A Review of Early Modern Human Dispersal Routes and Migration Hypotheses Through Wallacea’, Journal of Island and Coastal Archaeology, 11 (3): 364–384, 2016. https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/15564894.2015.1119218

समीक्षक : प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.