विविध उत्पादन केंद्रामध्ये निर्माण केलेल्या आणि स्थानिक गरजा भागविल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या वस्तूंचे व सेवांचे वितरण करणारी व्यवस्था. तिच्या योगे त्या वस्तू व सेवा ग्राहकांना अंतिम टप्प्यात योग्य स्थळी, योग्य स्थितीत, योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य किंमतींना उपलब्ध होतात.
इतिहास : वाणिज्य हे मानवी सभ्यतेइतकाच प्राचीन असून त्याच्या विकासाची सुरुवात कृषीवलावस्थेच्या प्रारंभापासून झाली. वाणिज्य हे नाव Com व Mercis या दोन लॅटीन शब्दांपासून तयार झाला आहे. Com म्हणजे ‘एकत्र येणेʼ आणि Mercis म्हणजे ‘वस्तूʼ किंवा ‘सामुग्रीʼ होय. वस्तू किंवा सामुग्रीची देवाण-घेवाण करण्यासाठी एकत्र येणे, म्हणजे ‘वाणिज्यʼ होय. वाणिज्याच्या साह्याने विनिमय (Exchange) ही संकल्पना अस्तित्वात येऊन मुलभूत आर्थिक क्रियांचा प्रारंभ झाला. कालांतराणे मुद्रेचा शोध लागला आणि ती वस्तुविनिमय व वाणिज्य या दोन्ही कार्यांसाठी पर्वणीच ठरली. मुद्रेमुळे आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असणाऱ्या सुसूत्रता, सुलभता आणि सहजता या मुलभूत गोष्टी साध्य झाल्या. आर्थिक व्यवहार आणि व्यापार सुलभ व्हावेत या गरजेतून वाणिज्याचा उगम झाला.
वाणिज्यविषयक क्रियांचा प्रारंभ गरजांची बहुविधता आणि जटील व क्लिष्ट आंतर व्यक्तीगत संबंध या दोन कारणांमुळे झाला. एखाद्या समूहाचे वस्तू व सेवा यांचे उत्पादन जोपर्यंत त्यांच्या गरजा भागविण्यापुरतेच मर्यादित असे, तोपर्यंत त्या समूहास वाणिज्य व्यवस्थेची विशेष गरज भासत नसे; कारण स्थानिक परिसरात परस्परांच्या गाठीभेटी घेऊन वस्तू व सेवा यांची देवघेव करणे शक्य होत. उत्पादनांत विशेषीकरणाचे तत्त्व वापरण्यात येऊ लागले म्हणजे, उत्पादनाची विविधता व त्याचे परिमाण वाढते. देवघेवींची संख्याही वाढत जाते आणि देवघेव केवळ स्थानिक स्वरूपाची न राहता ती दुरवर वास्तव्य करणाऱ्या उत्पादकांमध्ये व ग्राहकांमध्ये होण्याची शक्यता निर्माण होते. ही देवघेव उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये प्रत्यक्षपणे न होता व्यापारी व अभिकर्ते यांच्या मध्यस्थीने होऊ लागते. मागणीनुसार उत्पादित माल व सेवा पुरविण्याची व्यवस्था करावी लागते. आर्थिक व्यवहारांचा हा व्याप सांभाळणारा व्यापार व त्यास मदत करणारे अन्य व्यवसाय या सर्वांना मिळून ‘वाणिज्यʼ ही संज्ञा वापरतात.
वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग ही अर्थव्यवस्थेची मूलभूत अंगे आहेत व त्यांच्या कार्यक्षमतेची जबाबदारी बहुतांशी वाणिज्यावर येऊन पडते. उत्पादनाचे व वितरणाचे नियोजन करण्यासाठी भांडवल पुरवावे लागते. उत्पादनासाठी लागणारे श्रमिक व सामग्री एकत्र आणून त्यांचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. उत्पादित मालाची साठवण करणे, तो बाजारपेठ (Market)मध्ये नेणे, त्याच्या वाटपाची व्यवस्था करणे आणि हे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालावेत व उत्पादक आणि उपभोक्ते या दोहोंच्याही गरजा भागाव्यात यांसाठी वाणिज्य व्यवस्था अस्तित्वात येते. ही व्यवस्था आपली जबाबदारी पेलण्यास समर्थ व्हावी म्हणून काही व्यापारी संस्था, त्यांना साह्य करणाऱ्या इतर संघटना आणि व्यापारी कौशल्ये यांची पुरेशी वाढ व्हावी लागते. वायदेबाजार (Futures Market), नाणेबाजार (Money Market), रोखे (Stock) बाजार यांसारख्या प्रगल्भ संघटना व विक्रयकला, जाहिरातकला आणि व्यवस्थापन यांसारखी व्यापारी कौशल्ये यांची वाणिज्यास अत्यंत मदत होते. साहजिकच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत वाणिज्य सदराखाली येणारी कार्ये संस्था, कौशल्ये व व्यवसाय यांना राष्ट्रांच्या विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राथमिक व दुय्यम व्यवसायांपेक्षा वाणिज्यविषयक व्यवसायांत अधिक लोक गुंतलेले आढळून येणे, किंबहुना विकसित अर्थव्यवस्थेचे हे एक लक्षण असते. अर्थव्यवस्थेतील वाणिज्याचा व्याप पुढील तक्त्यावरून स्पष्ट होतो.
वाणिज्य संघटना : वाणिज्य व्यवसायात अनेक प्रकारच्या संघटना कार्य करीत असतात. त्यांतील काही खाजगी क्षेत्रात, तर काही सहकारी वा सरकारी क्षेत्रात असतात. संयुक्त क्षेत्रातही काही संस्था असू शकतात. खाजगी क्षेत्रातील वाणिज्य व्यवसाय एकमेव व्यापारी, भागीदारी, खाजगी वा संयुक्त भांडवल कंपनी अथवा सूत्रधारी कंपनी यांपैकी एखाद्या स्वरूपाची संघटना बनवून चालतो. सहकारी क्षेत्रातील संस्था सहकाराच्या तत्त्वांनुसार कार्य करतात. सरकारी क्षेत्रातील व्यवसायसंस्था सरकारी कंपन्या किंवा सरकारी विभाग, मंत्रालय, जिल्हा परिषदा, नगरपालिका व ग्रामपंचायती किंवा कायद्यानुसार खास अस्तित्वात आलेली महामंडळे यांच्यामार्फत चालविल्या जातात. खाजगी क्षेत्रातील संघटना नफ्याचे उद्दीष्ट समोर ठेवून कार्य करतात, तर सहकारी व सरकारी संस्थांचे मूळ उद्दिष्ट नफा हे नसून सभासदांचे हित व सार्वजनिक हित यांचे रक्षण व संवर्धन करण्याचे असते. संघटनांच्या या विविध रूपांचे काही विशिष्ट फायदे व तोटे असतात. त्यांचा तारतम्याने विचार करून व उपक्रमाच्या गरजा लक्षात घेऊन उपक्रम चालविण्यास आवश्यक असलेल्या उत्पादक घटकांची व सामग्रीची जुळवाजुळव करता येते.
व्यापार (Trade) : अर्थव्यवस्थेचा विकास व तिचे कार्य प्रामुख्याने पैशांच्या मध्यस्थीने होणाऱ्या देवघेवींवर अवलंबून असल्यामुळे वाणिज्यात व्यापारास अतिशय महत्त्व आहे. देवघेव सुलभ व्हावे म्हणूनच व्यापाराची आवश्यकता जाणवते. व्यापारी मालाचा साठा करतात व तो ग्राहकांना लागेल तेव्हा व हवा असेल त्या ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था करतात. मालाची देवघेव एकाच राष्ट्रात वसत असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा संस्थांमध्ये झाल्यास, त्या व्यवहारांस ‘अंतर्गत व्यापारʼ असे संबोधतात; परंतु ही देवघेव निरनिराळ्या राष्ट्रांतील व्यक्तींमध्ये किंवा संस्थांमध्ये झाल्यास तिचा ‘परराष्ट्रीय व्यापाराʼत समावेश होतो. परदेशातून येणाऱ्या मालाच्या व्यापारास ‘आयात व्यापार’ म्हणतात, तर परदेशांना पाठविण्यात येणाऱ्या मालाच्या व्यापारास ‘निर्यात व्यापार’ असे म्हणतात.
मालाची देवघेव दोन प्रकारची असू शकते. मालाची विक्री जेव्हा अल्प प्रमाणावर होते, तेव्हा तिला किरकोळ विक्री किंवा किरकोळ व्यापार म्हणतात; परंतु देवघेवीचे परिणाम मोठे असले, तर ती घाऊक व्यापारक्षेत्रात झाली असे म्हणतात. किरकोळ विक्री आणि घाऊक विक्री हे दोन्ही रोखीने किंवा उधारीने केले जाते. काही किरकोळ विक्री भाडेखरेदी पद्धतीने किंवा हप्तेबंदी खरेदी पद्धतीनेदेखील होते. माल विकत घेणाऱ्यास त्यावर संपूर्ण मालकी हक्क मिळतो किंवा मालकी हक्क विक्रेत्याकडे राहून खरेदीदार हा अभिकर्ता या नात्याने माल ताब्यात घेतो व नंतर त्याची विक्री झाल्यावर विक्री-किंमतीमधून आपली अडत कापून घेऊन उरलेली रक्कम मूळ विक्रेत्याकडे पाठवितो. घाऊक व्यापारात काही दलाल केवळ विक्रेते व खरेदीदार यांना एकत्र आणण्याचेच कार्य करतात व त्यासाठी आपली दलाली वसूल करतात. घाऊक बाजारांत दोन प्रकारचे व्यवहार करण्याची सोय असते. एक, ‘हजरव्यवहार’ व दुसरा ‘वायदाव्यवहार’. किरकोळ व्यापारात अनेक प्रकारची दुकाने व विक्री केंद्रे (Shops and Sales Center) तसेच महाजालकाद्वारे (Internet) खरेदी-विक्री करण्याकरिता अनेक केंद्रे आहेत व विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांसाठी ती उपयोगी पडतात. प्रत्येक प्रकारच्या विक्रीकेंद्राची काही वैशिष्ट्ये असतात.
व्यापार साहाय्यक : व्यापार करणारे ते व्यापारी. त्यांना अनेक प्रकारचे साह्य मिळविल्याशिवाय आपली जबाबदारी तत्परतेने व कार्यक्षमतेने पार पाडता येत नाही. व्यापारासाठी खेळते भांडवल लागते. काही दीर्घमुदती कर्जे काढावी लागतात. हुंड्यांचे व्यवहार करावे लागतात. धनादेश वापरावे लागतात व रकमा एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवाव्या लागतात. तसेच सद्यस्थितीत व्यापार आणि आर्थिक व्यवहार मोठ्याप्रमाणात महाजालकाद्वारे होत आहे. उदा., महाजालकीय बँकिंगद्वारा (Internet Banking), डेबीट कार्डद्वारा, क्रेडीट कार्डद्वारा इत्यादी. या सर्व सोयी आधुनिक बँका पुरवू शकतात. बँकाच्या मदतीशिवाय व्यापारी उलाढाली पार पडणे जवळजवळ अशक्यच आहे. बँकाप्रमाणेच इतरही काही संस्था व्यापाऱ्यांना व उद्योगसंस्थांना अर्थसाह्य करीत असतात. उत्पादन व व्यापार यांसाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर लागते. काही अल्पमुदतीसाठी, तर काही मध्यम व दीर्घमुदतीसाठी. ते पुरविणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या अर्थसंस्था अस्तित्वात येतात. त्यांचा समावेशही वाणिज्य या संज्ञेखाली होतो.
मालाचे उत्पादन झाल्यानंतर त्याची विक्री ताबडतोब न होता बहुधा काही कालावधीनंतर होत असते. मध्यंतरीच्या काळात तो माल गुदामात सुरक्षितपणे साठवावा लागतो व त्याची साठवण, राखण व प्रेषण यांसंबंधीची व्यवस्था करावी लागते. मालाच्या व प्रवाशांच्या ने-आणीसाठी रस्तेवाहतूक, रेल्वेवाहतूक, जलवाहतूक व विमानवाहतूक या सर्वांचा उपयोग होतो. तसेच त्यांचा व्यापारासाठीही अत्यंत उपयोग होतो. वाहतूक (Transport) व्यवस्थेमुळे बाजारक्षेत्रे व व्यापार वाढत जातो. संदेशवहनाच्या सोयीही व्यापारासाठी आवश्यक असतात. दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याखेरीज व्यापारी उलाढाली झटपट व मोठ्या प्रमाणावर होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे व्यापारातील अनिश्चिततेचा धोका कमी करण्यासाठी विमाव्यवसायाची आवश्यकता असते. गुदामात ठेवलेला माल चोरीस जाऊन किंवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नुकसान होण्याचा संभव असल्याने, व्यापार मालाचा विमा (Policy) उतरवितात. जहाजाने येणाऱ्या मालाचे सागरी धोक्यांमुळे नुकसान झाल्यास ते भरून निघावे म्हणून सागरी विमा उतरविणे इष्ट असते. त्याचप्रमाणे इतरही अनेक प्रकारच्या अनिश्चित घटनांपासून संरक्षण व्हावे म्हणून विमाव्यवसायाचा उपयोग होतो. असे व्यापारास साहाय्यक ठरणारे सर्व व्यवसाय वाणिज्यात अंतर्भूत होतात.
व्यापारी कौशल्ये : व्यापारी उपक्रम काटकसरीने व कार्यक्षमतेने चालून त्यांपासून पुरेसा नफा मिळावा, त्यांची इतर उद्दिष्टेही साध्य व्हावी यांकरिता काही व्यापारी कौशल्यांची गरज लागते. स्पर्धामय बाजारात आपला माल अधिकाधिक खपाविण्यासाठी योग्य विक्री संघटना स्थापून विक्रयकला (Salesmanship) निपुण व अनुभवी विक्रेते नेमावे लागतात. ग्राहकांच्या नजरेत आपला माल सदैव भरावा यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने मालाची जाहिरात (Advertisement) करावी लागते. व्यापारी उपक्रमास सुयोग्य अशी संघटना उभारून तिच्या कार्याचे व्यवस्थापन निष्णात व्यवस्थापकांच्या हाती सोपवावे लागते. ज्या प्रमाणात ही कौशल्ये एखाद्या राष्ट्रात प्रगत स्वरूपात वापरली जातात, त्या प्रमाणात ते राष्ट्र व्यापारी व औद्योगिक स्पर्धेमध्ये जगातील आपले अग्रेसरत्व टिकवू शकते.
वाणिज्य व सरकार : वाणिज्य व्यवहार ज्या अर्थव्यवस्थेमध्ये चालतात आणि ती अर्थव्यवस्था ज्या वातावरणात कार्य करते, त्यावर शासकीय यंत्रणेचा पुष्कळच प्रभाव पडतो. साहजिकच वाणिज्य व सरकार यांचे घनिष्ठ संबंध येतात. सरकारी खरेदी-विक्री व उत्पादन आणि कंत्राटे यांचा व्यापारावर महत्त्वाचा परिणाम होतो. अनेक कारणांसाठी बऱ्याच उद्योगसंस्था व व्यवसाय सरकार चालविते. शिवाय खासगी उद्योगसंस्थांनाही सरकारकडे मदत घ्यावी लागते. सरकारची करविषयक, व्यापारविषयक, औद्योगिक व आर्थिक धोरणे वेळोवेळी बदलत जात असल्याने वाणिज्य व्यवहारांचे स्वरूपही स्थिर न राहता वारंवार बदलत जाते. आर्थिक नियोजन करताना सरकारला वाणिज्याचेही नियोजन करावे लागते. नियोजनाची उद्दिष्टे यशस्वीपणे गाठण्यासाठी वाणिज्य व्यवसाय व शासनसंस्था यांचे परस्पर सहकार्य आवश्यक ठरते.
संदर्भ :
- Bahl, J. C.; Dhongde, E. R., Elements of Commerce and Business Methods, Bombay, 1973.
- Branton, N., The Structure of Commerce, London, 1964.
समीक्षक – संतोष गेडाम