आंग्रे, तुळाजी कान्होजी : (मृत्यू १७८६) मराठा आरमारातील एक देदीप्यमान नेतृत्व आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांची द्वितीय पत्नी राधाबाई उर्फ लक्ष्मीबाई यांचे पुत्र. कान्होजींना एकूण सहा पुत्र होते, त्यांपैकी तुळाजी एक. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती मिळत नाही. १७२९ मध्ये कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर आंग्रे घराण्यात सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष उफाळून आला. सुरुवातीला थोरले चिरंजीव सेखोजी आंग्रे सरखेल झाले, परंतु १७३३ मध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे संभाजी आणि मानाजी यांच्यात तीव्र यादवी निर्माण झाली. या कौटुंबिक कलहाचा परिणाम म्हणून आंग्रे घराण्याची सत्ता विभागली गेली. उत्तर विभागाची (कुलाबा-अलिबाग शाखा) सूत्रे मानाजी आंग्रे यांच्याकडे आली. त्यांना पेशवे आणि काही प्रमाणात इंग्रजांचाही पाठिंबा लाभला होता. याउलट, दक्षिण विभागाचा (सुवर्णदुर्गविजयदुर्ग शाखा) कारभार संभाजी आंग्रे यांच्याकडे सोपवण्यात आला.

तुळाजी आंग्रे हे सुरुवातीपासूनच संभाजींच्या सोबतीने दक्षिण विभागाचे रक्षण करण्यात आणि नाविक व्यवस्थापनात सक्रिय होते. १७४२ मध्ये संभाजी आंग्रे यांच्या निधनानंतर या दक्षिण शाखेची सर्व सूत्रे तुळाजींकडे आली. छत्रपती शाहू महाराजांनी तुळाजींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांना ‘सरखेल’ ही सर्वोच्च नाविक पदवी देऊन गौरवले. मात्र नानासाहेब पेशवे यांना तुळाजींचे वाढते वर्चस्व धोक्याचे वाटत होते. पेशव्यांना आपल्या शब्दाबाहेर न जाणारा मानाजी अधिक सोयीचा वाटत होता, म्हणून त्यांनी वारसाहक्काचा मुद्दा पुढे करून नेहमी मानाजींनाच पाठिंबा दिला. या राजकीय संघर्षात पेशव्यांनी तुळाजींना कुलाब्यात अटक करून पुण्यातील पर्वतीवर सहा महिने कालकोठडीत ठेवले होते.

सत्तेवर येताच तुळाजींनी आपल्या आरमारी सामर्थ्यात प्रचंड वाढ करण्यास सुरुवात केली. त्यांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा ‘विजयदुर्ग’ (घेरिया) किल्ल्याला आपले मुख्य केंद्र बनवले. विजयदुर्ग हा त्या काळी दक्षिण कोकणचा सर्वांत सुरक्षित आणि मोक्याचा जलदुर्ग मानला जाई, तेथून तुळाजींनी परकीय सत्तांना कडवे आव्हान दिले. तुळाजी आंग्रे यांच्या लष्करी कारकिर्दीतील जंजिऱ्याच्या प्रबळ सिद्दीवर मिळवलेला विजय हा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक पराक्रम मानला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या, जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांच्या कोकण किनारपट्टीवरील सत्तेला असलेला जुना आणि कडवा शत्रू होता. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल आणि गोवळकोट हे मोक्याचे किल्ले सिद्दीच्या ताब्यात असल्याने मराठ्यांच्या व्यापारावर आणि लष्करी हालचालींवर मोठ्या मर्यादा येत होत्या. थोरले बाजीराव पेशवे यांनी किल्ल्यांच्या मुक्तीसाठी अनेक प्रयत्न केले होते, परंतु काही भौगोलिक कारणांमुळे ही मोहीम पूर्ण होऊ शकली नव्हती. ही अपूर्ण राहिलेली जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांनी तुळाजी आंग्रे यांच्यावर सोपवली. तुळाजींनी आपल्या नाविक सामर्थ्याचा आणि गनिमी काव्याचा वापर करून सिद्दीची समुद्रातून पूर्णतः नाकेबंदी केली. इंग्रजांनी सिद्दीला मदत पुरवूनही तुळाजींच्या आरमाराच्या अखंड माऱ्यापुढे आणि शिस्तबद्ध नियोजनापुढे त्यांचा निभाव लागला नाही. रसद आणि कुमक रोखल्यामुळे सिद्दीचे सैन्य हतबल झाले. अखेर २३ जानेवारी १७४५ रोजी तुळाजींनी अंजनवेल किल्ला सर केला आणि त्याचे नामकरण ‘गोपाळगड’ असे केले. या महत्त्वपूर्ण विजयाची आणि अंजनवेलसह गोवळकोट किल्ला हस्तगत केल्याची बातमी त्यांनी २७ जानेवारी १७४५ रोजी शाहू महाराजांना कळवली. या विजयामुळे मराठा आरमाराची प्रतिष्ठा सातासमुद्रापार पोहोचली आणि तुळाजींचा दरारा इंग्रज व पोर्तुगीजांवरही बसला. या मोहिमेमुळे केवळ पश्चिम किनारपट्टी सुरक्षित झाली नाही, तर शाहू महाराजांच्या नजरेत तुळाजींचे स्थान एक विश्वासू आणि पराक्रमी सरखेल म्हणून कायमस्वरूपी अधोरेखित झाले.

पुढे तुळाजी आंग्रे यांनी बावडेकर अमात्यांच्या ताब्यातील मुडागड किल्ला जिंकून घेतला (१७४८). हा किल्ला कोकणातील खारेपाटण, राजापूर आणि सौंदल यांसारख्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर स्थित असल्याने, घाटावर जाणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुळाजींना तो आपल्या ताब्यात हवा होता. मात्र, मुडागड गमावल्यामुळे अमात्य, विशाळगडचे प्रतिनिधी, सावंतवाडीचे जयराम सावंत आणि अप्पाजी आंग्रे यांनी एकत्र येऊन १० फेब्रुवारी १७४८ रोजी तुळाजींवर भीषण प्रतिहल्ला चढवला. या संयुक्त आघाडीविरुद्ध लढताना तुळाजींनी छत्रपती शाहू महाराजांकडे मदतीची याचना केली, परंतु त्यांना ती नाकारण्यात आली. उलटपक्षी, शाहूंनी अप्पाजी आंग्रे यांना विजयदुर्गावर नियुक्त करण्यासाठी आणि तुळाजींच्या विरोधात पोर्तुगीजांची मदत मिळवण्यासाठी सातारा दरबारातील एका पोर्तुगीज व्यक्तिला गोव्याच्या व्हाईसरॉयकडे पाठवले. आपल्याच स्वकीयांकडून आणि सातारा दरबारातून आपल्याविरुद्ध शिजत असलेल्या या कारस्थानांची संपूर्ण माहिती तुळाजींना त्यांच्या हेरांकडून वेळोवेळी मिळत होती. अखेर, ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी तुळाजींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि १४ मे १७४८ रोजी अप्पाजी आंग्रे यांच्यावर मारेकरी घालून त्यांचा काटा काढला. या एका घावामुळे तुळाजींनी आपल्याविरुद्ध उभी राहिलेली ही मोठी राजकीय अडचण दूर केली.

तुळाजी आंग्रे हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारासाठी सर्वांत मोठा अडथळा बनले होते. मुंबई हे इंग्रजांचे मुख्य व्यापारी केंद्र होते, परंतु तुळाजींच्या आक्रमक धोरणामुळे मुंबईचा सागरी व्यापार अक्षरशः ठप्प झाला होता. १७४२ ते १७५५ या काळात तुळाजींनी इंग्रजांना प्रचंड लष्करी आणि आर्थिक तडाखा दिला. त्यांनी मद्रासचे ‘शार्लोट’, मुंबईचे ‘विल्यम’ आणि कलकत्त्याचे ‘सेवेर्न’ यांसारखी महत्त्वाची व्यापारी जहाजे पकडून आपल्या ताब्यात घेतली. या संघर्षातील सर्वांत मोठा धक्का म्हणजे ‘डर्बी’ या बलाढ्य इंग्रजी जहाजाची जप्ती. यामुळे इंग्रजांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. इतकेच नाही तर तुळाजींनी ‘रिस्टोरेशन’सारखी मोठी इंग्रजी युद्धनौका जाळून खाक केली. स्वतःला सागरी सत्ताधीश म्हणवणारे इंग्रज आपली नाचक्की लपवण्यासाठी तुळाजींना ‘चाचा’ म्हणून हिणवत असत, मात्र प्रत्यक्षात आंग्र्यांच्या तोफांच्या आवाजापुढे इंग्रज अधिकारी थरथर कापायचे. ऑक्टोबर १७४९ मध्ये तुळाजींनी आपल्या ५ गुराब आणि १७ गलबतांच्या साहाय्याने इंग्रजांच्या ‘रेसोल्युशन’ जहाजाला समुद्रात घेरले आणि ते यशस्वीपणे ओढत विजयदुर्ग किल्ल्यावर नेले. १७४९-५० च्या दरम्यान झालेल्या युद्धात इंग्रजांची ६४ तोफांची ‘व्हिजीलंट’ आणि ५० तोफांची ‘रूबी’ ही महाकाय युद्धजहाजे पकडून त्यांनी जगाला मराठ्यांच्या नाविक सामर्थ्याचा परिचय करून दिला.

इंग्रजच नव्हे, तर डच आणि पोर्तुगीजही तुळाजींच्या पराक्रमापुढे हतबल झाले होते. १७५३ मध्ये ६० तोफांनी सज्ज असलेल्या डचांच्या मोठ्या ताफ्यावर तुळाजींच्या आरमाराने असा भीषण हल्ला केला की, डचांचे ४० लाखांहून अधिक नुकसान झाले. डचांचे ‘लामेन्स स्लूप’ या युद्धात तुळाजींच्या हाती लागले. १७५४ मध्ये तुळाजींनी थेट मंगळूरवर स्वारी करून पोर्तुगीजांची वखार लुटली आणि डचांची तीन मोठी जहाजे पकडली. गोव्याच्या पोर्तुगीजांशी त्यांचे अनेक हिंसक संघर्ष झाले. तुळाजींच्या वाढत्या सत्तेमुळे पोर्तुगीजांच्या उत्तर कोकणातील वसाहतींना धोका निर्माण झाला होता.

तुळाजी आंग्रे यांना युद्धभूमीवर पराभूत करणे कठीण असल्याने इंग्रज आणि पोर्तुगीजांनी राजकीय डावपेच आखले. त्यांनी नानासाहेब पेशव्यांशी गुप्त बोलणी सुरू केली. इंग्रजांनी तुळाजींविरुद्ध पेशव्यांना लष्करी मदतीचे आमिष दाखवले. यामुळे परकीय सत्तांना मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव करण्याची संधी मिळाली.

तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील संघर्ष हा केवळ वैयक्तिक मतभेद नसून तो सत्तेच्या केंद्रीकरणातून निर्माण झालेला एक जटिल राजकीय तिढा होता. तुळाजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेचे पाईक होते. ते स्वतःला छत्रपतींचे थेट सेवक मानत असत आणि पेशव्यांच्या वाढत्या प्रशासकीय वर्चस्वाला त्यांनी कधीही दाद दिली नाही. तुळाजींची ही स्वतंत्र वृत्ती आणि करारी बाणा पेशव्यांच्या राजकारणात मोठा अडथळा ठरत होता. आपल्या आज्ञेत न राहणाऱ्या तुळाजींना पेशवे डोईजड समजू लागले होते, ज्यामुळे दोन्ही पक्षांतील अविश्वास वाढत गेला.

या अंतर्गत कलहात नानासाहेब पेशव्यांनी रणनीती म्हणून तुळाजींचे सावत्रभाऊ मानाजी आंग्रे यांना नेहमीच पाठबळ दिले. तुळाजीला पदच्युत करून कुलाबा व सुवर्णदुर्ग ही विभागलेली आंग्रे दौलत एकत्र करावी आणि ती मानाजींच्या, म्हणजेच पर्यायाने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून कोकणावर वचक निर्माण करावा, असा नानासाहेबांचा राजकीय डाव होता. तुळाजी आंग्रे यांचा बीमोड करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी घेतलेला निर्णय मराठा इतिहासात अत्यंत वादग्रस्त आणि दूरगामी परिणाम करणारा ठरला. तुळाजीला केवळ लष्करी सामर्थ्याने नमवणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर पेशव्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १९ मार्च १७५५ मध्ये पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात विजयदुर्ग मोहिमेसाठी एक लष्करी करार झाला, ज्याचा मुख्य उद्देश आंग्रे यांची आरमारी शक्ती समूळ नष्ट करणे हा होता. या मोहिमेसाठी इंग्रजांनी ॲडमिरल वॉटसन आणि कर्नल क्लाइव्ह यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली आरमार समुद्रातून तैनात केले, तर पेशव्यांच्या फौजांनी जमिनीवरून किल्ल्याला पूर्णपणे वेढले. १३ फेब्रुवारी १७५६ रोजी युद्धाने रौद्र रूप धारण केले. इंग्रजांनी किल्ल्यावर आणि बंदरात उभ्या असलेल्या जहाजांवर भीषण तोफमार सुरू केला. इंग्रजांच्या तोफांतून सुटलेल्या एका गोळ्यामुळे तुळाजींच्या ‘पाल’ या मुख्य जहाजाला आग लागली आणि काही क्षणांतच ही आग वाऱ्याच्या वेगाने पसरून बंदरातील संपूर्ण मराठा आरमार भस्मसात झाले. स्वतःचे अजेय आरमार डोळ्यादेखत जळताना पाहून तुळाजींची युद्धशक्ती मोठ्या प्रमाणावर क्षीण झाली.

जमिनीवरून पेशव्यांचा वाढता दबाव आणि समुद्रातून ब्रिटिशांचा प्रबळ तोफखाना अशा दुहेरी आक्रमणामुळे अभेद्य मानल्या जाणाऱ्या विजयदुर्गचा पाडाव झाला. तुळाजींनी शेवटपर्यंत निकराची झुंज दिली, परंतु अखेर त्यांना पेशव्यांच्या फौजेने कैद केले. इंग्रजांची इच्छा तुळाजींना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर चाचेगिरीचा खटला भरण्याची होती, मात्र पेशव्यांनी त्यांना स्वतःच्याच ताब्यात ठेवले. या पराभवामुळे केवळ एका सरखेलचा अस्त झाला नाही, तर भारताच्या सागरी संरक्षणाचा मुख्य आधार असलेले स्वतंत्र मराठा आरमार कायमचे संपुष्टात आले.

विजयदुर्गचा पाडाव झाल्यानंतर तुळाजी आंग्रे यांच्या जीवनाचा एक अत्यंत कष्टप्रद आणि करुण अध्याय सुरू झाला. एकेकाळी अरबी समुद्रावर आपली हुकूमत गाजवणाऱ्या या पराक्रमी सरखेलची तब्बल ३० वर्षे विविध किल्ल्यांवरील अंधारकोठडीत गेली. १७५६ ते १७८६ या प्रदीर्घ कालखंडात त्यांना मराठा साम्राज्यातील विसापूर, अहमदनगर, सोलापूर आणि वंदन अशा विविध किल्ल्यांवर बंदी म्हणून ठेवण्यात आले. एका प्रबळ सरखेल पदावरून थेट कैदी म्हणून झालेली ही घसरण तुळाजींच्या शारीरिक आणि मानसिक छळाची एक मोठी मालिकाच होती.

बंदिवासात असतानाही तुळाजींचा स्वाभिमानी आणि लढाऊ बाणा कायम होता. त्यांनी आपली सुटका करून घेण्यासाठी अनेक धाडसी बेत आखले. पुण्यात असताना त्यांनी इब्राहिमखान गारदी याच्या भाच्याशी संधान बांधून पुण्यात दंगल घडवून आणण्याचे आणि त्या गोंधळाचा फायदा घेत पळून जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, गारद्याने या कटाची पूर्वकल्पना रघुनाथराव उर्फ राघोबादादांना दिली. यामुळे हा प्रयत्न तर फसलाच, परंतु परिणामी तुळाजींवरील पहारा पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आला आणि त्यांच्या हालचालींवर तीव्र मर्यादा आल्या.

विसापूर किल्ल्यावर असतानाही तुळाजींनी दोन वेळा निसटण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. त्यांची ही धडपड त्यांच्या कधीही न झुकणाऱ्या वृत्तीचे दर्शन घडवते. २८ डिसेंबर १७६४ रोजी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या आदेशानुसार त्यांची रवानगी अहमदनगरच्या तुरुंगात करण्यात आली. तुळाजी कैदेत असतानाच, १२ मार्च १७६६ रोजी त्यांचे दोन्ही पुत्र बाबाजी बेडेकर यांच्या मदतीने विसापूर किल्ल्याच्या कैदेतून निसटण्यात यशस्वी झाले. आपल्या वडिलांना कैदेत सोडून या मुलांनी थेट मुंबई गाठली आणि इंग्रजांकडे आश्रय घेतला. ज्या इंग्रजांविरुद्ध तुळाजी आयुष्यभर लढले आणि ज्यांनी त्यांचे आरमार उद्ध्वस्त केले, त्यांच्याच आश्रयाला त्यांच्या मुलांना जावे लागले.

आयुष्याची शेवटची वर्षे त्यांनी सातारा जिल्ह्यातील वंदन किल्ल्यावर एकाकीपणात आणि बंदिवासात व्यतीत केली. तेथेच त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ढबू. दा. गो. ‘कुलाबकर आंग्रे सरखेल’, अलिबाग, १९३९.
  • पिसुर्लेकर, पांडुरंग, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, पुणे विद्यापीठ, पुणे, १९६७.
  • पुराणिक, श. श्री., ‘तुळाजी एक विजयदुर्ग’, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, २०२०.
  • पेंडसे, सचिन, ‘मराठा आरमार’, मर्वेन टेक्नॉलॉजीज, पुणे, २०१७.
  • शिखरे, सु. व., ‘मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास’, अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१७.

समीक्षक : संदीप परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.