इंडोनेशिया येथील सुलावेसी बेटावरील अश्मयुगीन स्थळे. या बेटावरील तालेपू-कॅलिओ आणि लिआंग बुलू बेट्टू या अश्मयुगीन स्थळांवर पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाचे पुरावे मिळतात. यातील कॅलिओ आणि तालेपू ही दोन्ही स्थळे दक्षिण सुलावेसीमध्ये वालनाए नदीजवळील विवर्तनीय हालचालींमुळे तयार झालेल्या सखल प्रदेशात आहेत. वालनाए नदीच्या एका काठावर तालेपू आहे, तर दुसऱ्या काठावर कॅलिओ आहे. ही दोन्ही स्थळे वालनाए फॉर्मेशनच्या बेरू मेंबर या स्तराशी संबंधित आहेत. याशिवाय सुलावेसी बेटाच्या दक्षिण भागात असलेल्या मारोस-पाँगकेप या चुनखडकाच्या भागातील लिआंग बुलू बेट्टू या बोगद्यासारख्या गुहेत मध्य प्लाइस्टोसीन ते होलोसीन काळातील पुरातत्त्वीय पुरावे एकाच ठिकाणी मिळाले आहेत. या तीनही स्थळांवर मिळालेली दगडी हत्यारे ही प्राचीन मानवाने समुद्र अडथळे पार केले होते, याचा एक भक्कम पुरावा आहे.

तालेपू (इंडोनेशिया) येथील उत्खननात मिळालेली दगडी हत्यारे. चित्रसंदर्भ : (after van den Bergh et al. 2016).

तालेपू : येथे २००७  आणि २००८-२०१२ या काळात झालेल्या उत्खननात चर्ट आणि इतर सिलिसिअस दगडांपासून तयार केलेली विविध हत्यारे सापडली. हे उत्खनन ऑस्ट्रेलियन भूशास्त्रज्ञ गेरीट डी. वान डेन बर्घ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. येथे दोन ठिकाणी केलेल्या (टी-२ आणि टी-४) उत्खननांतून एकत्रित १८ मी. जाडीच्या गाळाची ५ (ए ते इ) मुख्य स्तरांमध्ये विभागणी केली. टी-२ मधून २७० आणि टी-४ मधून ४१ दगडी हत्यारे मिळाली. ही हत्यारे क्षारयुक्त चुनखडकापासून बनवलेली असून त्यात प्रामुख्याने छिलके आणि गाभे आहेत. टी-२ मधील काही दगडी हत्यारे, तर टी-४ मधील सर्व दगडी हत्यारे धारदार आहेत. टी-२ मधील उत्खननात गायबैलाच्या कुळातील (bovid) प्राण्याचा खालचा जबडा, तर टी-४ मधून विलुप्त झालेल्या महाकाय डुकराच्या (Celebochoerus) दाताचे ८ तुकडे, स्टेगेडॉन हत्तीच्या दुधाच्या दाताचा तुकडा (Stegodon milk molar), आणि मगरीच्या हाडयुक्त बाह्य कवचाचे (dermal scute of a crocodile) जीवाश्म मिळाले आहेत. तालेपू जीवाश्माचा काळ युरेनियम शृखंला कालमापन पद्धतीने दोन लक्ष वर्षापेक्षा जुना असल्याचे दिसून आले आहे. तर ज्या गाळातून दगडी हत्यारे मिळाली त्याचे कालमापन ११८ ते १९४ हजार वर्षपूर्व (मध्य प्लाइस्टोसीन काळ) असे आहे.

लिआंग बुलू बेट्टू (इंडोनेशिया) येथील उत्खननांतून मिळालेली दगडी हत्यारे. टप्पा २ मधील दगडी हत्यारे, छिद्र केलेले प्राण्याचे हाड, प्राण्याच्या दातावर केलेला मणी. चित्रसंदर्भ : (after Burhan et al. 2025).

लिआंग बुलू बेट्टू : या गुहेत २०१३ पासून (२०१३-२०१५, २०१७-२०१९, २०२३) ८ मी.हून जास्त जाडीच्या गाळाचे स्तरित उत्खनन चालू आहे. या ८ मी. खोल उत्खननात वरपासून खालपर्यंत नवाश्मयुग ते अश्मगुगीन काळातील स्तरीय पुरावे  (टप्पा १ ते ४, Phase I-IV) सलग एकाच ठिकाणी मिळाले आहेत. टप्पा ४ मध्ये (सर्वांत वरचा स्तर)  होलोसीन काळातील नवाश्मयुगीन मृदभांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. तर टप्पा २ हा पुरातत्त्वीयदृष्ट्या संपन्न असा आहे, ज्यात चर्टची हजारो दगडी हत्यारे (२५,००० पेक्षा अधिक) आणि अनेक प्राण्यांचे जीवाश्म (गायबैल कुळातील जंगली डुक्कर, सुलावेसी अस्वल (Ailurops ursinus) हा मांजरासारखे तोंड आणि अस्वलासारखे जाड केस असणारा प्राणी) मिळाले आहेत. याशिवाय अनेक शंख-शिंपले, हाडांवर केलेली हत्यारे आणि अलंकार, प्राण्यांच्या दातांपासून बनवलेले मणी, गेरूचा वापर असे अनेक महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.  या टप्प्यातील दगडी हत्यारे प्रामुख्याने असंख्य छिलके, गाभे, बायपोलर हत्यारे, मोठ्या आकाराचा ज्वालामुखी दगड (anvil), धारदार पाती आणि चकचकीत कडा असलेली अशी मिळाली आहेत. या टप्प्याचा काळ कार्बन १४, युरेनियम शृखंला आणि तप्तदीपन कालमापन पद्धती वापरून १६,००० ते ४०,००० वर्षपूर्व (उत्तर प्लाइस्टोसीन काळ) आहे. हत्यार बनवण्याच्या तंत्रावरून ही हत्यारे आधुनिक मानवाने बनवली असावीत.

कॅलिओ (इंडोनेशिया) येथील उत्खननांतून मिळालेली दगडी हत्यारे आणि प्राण्यांचे जीवाश्म. चित्रसंदर्भ : (after Hakim et al. 2025).

कॅलिओ : येथे बेरू मेंबरच्या गाळाचे थर उत्थित (uplifted) झालेले आहेत. यात नदीने आणलेल्या दगड-गोट्यांचे घट्ट झालेल्या (काँग्लोमरेट conglomerate) थराचे उत्खनन २०१९, २०२१-२२ मध्ये बी. हकीम (इंडोनेशिया) आणि ए. ब्रूम (ऑस्ट्रेलिया) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या उत्खननात एकाच थरातून ७ दगडी छिलके आणि काही प्राण्यांचे जीवाश्म सापडले. यात विलुप्त झालेल्या महाकाय डुकराचा (Celebochoerus) दात असलेला वरचा जबडा आणि मगरीच्या दाताचे जीवाश्म मिळाले आहेत.

उत्खननात मिळालेले सातही दगडी छिलके चर्टचे आहेत. ही हत्यारे ज्या निक्षेपांमध्ये मिळाली त्याचे पुराचुंबकीय कालमापन पद्धतीने मापन केल्यानंतर ते ७७,३००० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत अश्मीभूत दातांचे इलेक्ट्रॉन संस्पंदन पद्धतीने केलेले कालमापन किमान १.०४ दशलक्ष वर्षपूर्व असून कदाचित ते १.४८ दशलक्ष वर्षांपर्यंत (आद्य प्लाइस्टोसीन काळ) प्राचीन असू शकतात. यावरून असे दिसते की, ज्ञात स्रोतांनुसार कॅलिओ येथील दगडी हत्यारे सुलावेसी बेटावरील प्राचीन मानवांच्या अस्तित्वाचा सर्वांत जुना पुरावा आहे. कॅलिओ येथे अजूनपर्यंत कोणतेही मानवी जीवाश्म सापडलेले नाहीत, त्यामुळे ही हत्यारे कोणत्या मानवप्रजातीने (इरेक्टस/ फ्लोरेन्स मानव/ लुझोन मानव) तयार केली, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

एकूणच, दक्षिण सुलावेसी मधील कॅलिओ, लिआंग बुलू बेट्टू आणि तालेपू ही पुरातत्त्वीय स्थळे आग्नेय आशियातील बेटांवरील प्रारंभिक आणि आधुनिक मानवांचे स्थलांतर तसेच सांस्कृतिक विकास, मानवी वर्तनातील विविधता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यांवरून प्राचीन मानवांनी वॉलेसिया प्रदेशातील बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी आद्य प्लाइस्टोसीन काळापासून समुद्र ओलांडण्याची क्षमता विकसित केली होती, हे निर्विवादपणे दिसते.

संदर्भ :

  • Burhan, Basran; Budianto Hakim; Iwan Sumantri; Suryatman; Andi Muhammad Saiful & Others, ‘A near-continuous archaeological record of Pleistocene human occupation at Leang Bulu Bettue, Sulawesi, Indonesia’, PLoS One, 20 (12): 1-51, 2025. https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0337993
  • Hakim Budianto; Unggul Prasetyo Wibowo; Gerrit D. van den Bergh; Dida Yurnaldi; Renaud Joannes-Boyau & Others, ‘Hominins on Sulawesi during the Early Pleistocene’, Nature, 646 (8084) : 378–83, 2025. https://www.nature.com/articles/s41586-025-09348-6
  • Van den Bergh, Gerrit D.; Bo Li; Adam Brumm; Rainer Grün & Others ‘Earliest hominin occupation of Sulawesi, Indonesia’, Nature, 529 : 208-211, 2016.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.