गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ. परंपरेने कृष्णचरित्राशी जोडले गेलेले हे बेट ‘बेट शंखोधरʼ या नावानेही ओळखले जाते. हे स्थळ द्वारकेपासून तीस किमी. अंतरावर खंबातच्या आखाताच्या मुखाशी आहे. या चिंचोळ्या बेटाची लांबी आठ किमी. असून सर्वांत उंच भाग समुद्रसपाटीपासून १५ ते २० मी. उंचीवर आहे. समुद्रात पाच किमी. अंतरावर असलेल्या या बेटावर ओखा बंदरातून होड्यांनी जाता येते. बेटावर श्रीकृष्णाचे विलासगृह असल्याने परंपरेनुसार त्याना रमणद्वीप म्हणतात, तर भागवत पुराणात त्या विषयीची एक कथा आहे. इ.स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या ग्रंथात याचा उल्लेख ’बराका’ (Baraca) असा आहे, तर टॉलेमीच्या जिओग्राफीया  या इ.स. दुसऱ्या शतकातील ग्रंथात ’बराके’ (Barake) असा उल्लेख आहे.

उत्तर हडप्पा कालखंडातील मुद्रा, बेट द्वारका, गुजरात.

शंखोधर बेटावरील पुरातत्त्वीय संशोधनाला सन १९६९-७० मध्ये सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातील पुरातत्त्वज्ञांना तेथे आद्य ऐतिहासिक, ऐतिहासिक व मध्ययुगीन कालखंडांतील अवशेष मिळाले. सन १९८१ पासून एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानातर्फे केलेल्या सर्वेक्षणात उत्तर हडप्पा कालखंडातील शंखापासून बनवलेली एक मुद्रा व सिंधु संस्कृतीची लिपी कोरलेला खापराचा तुकडा मिळाला.

सन २००२ मध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानच्या पुरातत्त्वज्ञांना खुदादोस्त दर्गा या ठिकाणाजवळ पाण्यात अनेक दगडी नांगर व ऐतिहासिक काळातील वसाहतीचे अवशेष मिळाले. बेटावर काही लोख्ंडी तोफा अत्यंत गंजलेल्या स्थितीत आढळल्या. तसेच त्यांना ५ ते ८ मी. खोलीवर बुडालेल्या एका जहाजाचे अवशेष मिळाले. हे बहुधा भारत-रोम व्यापाराच्या काळातील जहाज होते. त्याच वर्षी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने बेटावरील पार या गावाजवळ केलेल्या उत्खननात उत्तर हडप्पा काळातील वसाहतीचे पुरावे मिळाले. बेटावर इतरत्र केलेल्या उत्खननात प्रारंभिक ऐतिहासिक काळातील विविध पुरावस्तू प्राप्त झाल्या.

पाण्यातील दगडी नांगर, बेट द्वारका, गुजरात.

बेट द्वारकेच्या समुद्रात सन १९९७-१९९८ व पुन्हा २०००-२००१ या काळात पाण्याखालील अवशेष शोधण्याची मोहिम गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने हाती घेतली होती. ज्या ठिकाणी अगोदर आद्य ऐतिहासिक काळातील अवशेष मिळाले होते, त्याच्याजवळ आठ मी. खोलीपर्यंतच्या सागरतळाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शिसाचे तीन नांगर, मध्यभागी भोक असलेला गोल दगड आणि रोमन अंफोराचे (मद्यकुंभ) (इ.स.पू. पहिले शतक) सहा तुकडे मिळाले. तसेच भरती-ओहोटी येण्याच्या भागात ५ ते ७ मी. खोलीवर बारा दगडी नांगर मिळाले.

भूपुरातत्त्वीय संशोधनात आजच्या समुद्र पातळीच्या खाली ६५ सेंमी.च्या थरात कुषाणांची नाणी (इ.स. पहिले-दुसरे शतक) मिळाली. इ.स.पू. पहिल्या व इ.स. पहिल्या शतकात समुद्राची पातळी आजच्यापेक्षा किमान एक मीटरने कमी होती, हे दिसून आले.

या बेटावर उत्खनन केलेल्या एका खड्ड्यातील स्तरांमध्ये एक वाळूचा जाड थर स्तरक्रमात अनपेक्षित जागी आढळला. हा प्राचीन काळातील एखाद्या भूकंपाच्या अथवा भूस्तरातील हालचालीच्या घटनेशी संबंधित असल्याने त्याबद्दल विस्तृत संशोधन करण्यात आले; तथापि अशा भूस्तरातील हालचालीचे केंद्र (Epicentre) व काळ यांच्यासंबंधी निश्चित अनुमाने काढणे शक्य झाले नाही. एस. आर. राव यांनी बेट द्वारकेच्या पूर्व किनाऱ्यावर आढळलेल्या दोन दगडी भिंती ’महाभारत काळातील’ असल्याचे व महाभारतात उल्लेख असलेली ’द्वारावती’ ही नगरी समुद्रात १० मी. खाली असल्याचे म्हणले होते. तथापि या भिंती साध्यासुध्या मातीने सांधलेल्या असून त्या मासेमारीसाठीच्या असल्याचे इतर संशोधकांचे मत आहे. तसेच पाण्याखालील झालेल्या उत्खननात हे नगर समुद्रात बुडल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.

बेट द्वारकेतील विविध अवशेषांचे रेडिओकार्बन व तप्तदीपन पद्धतीने कालमापन करण्यात आले आहे. या तिथी इ.स.पू. १८८०-१६९० आणि इ.स.पू. २२०-१० या दरम्यान असून त्यांच्यावरून बेटावर दीर्घकाळ वसाहत होती, हे स्पष्ट झाले.

संदर्भ :

  • Gaur, A. S.; Sundaresh & Vora, K. H.  Eds., Archaeology of Bet Dwaraka Island, Aryan Books International, New Delhi, 2005.
  • Gaur, A. S.; Sundaresh; Gudigar, P. & Tripati,  Sila, Protohistoric ceramics of Dwarka and Bet Dwarka, Recent Advances in Marine Archaeology, (Ed., S. R. Rao), pp. 165-171, NIO, Goa, 1994.
  • Tripati, Sila, ‘An Overview of Maritime Archaeological Studies in Indiaʼ, Maritime Contacts of the Past, pp. 729-765, G.B. Books, Delhi, 2015.

                                                                                                                                                                                   समीक्षक : श्रीनंद बापट