भारतातील एक सर्वांत मोठे, अग्रगण्य विद्यापीठ. हे विद्यापीठ तमिळनाडू राज्यातील चिदंबरम, जिल्हा कडलूर (पूर्वीचा अर्काट) येथे स्थित असून विद्यापीठाची स्थापना इ. स. १९२९ मध्ये झाली. दक्षिण भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या विद्यापीठाचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. हे एक ‘एकात्मक’, निवासी आणि बहुविद्याशाखीय विद्यापीठ आहे. चिदंबरम येथील प्रसिद्ध नटराज मंदिराच्या सानिध्यात, अन्नामलई नगर या स्वतंत्र शैक्षणिक वसाहतीत हे विद्यापीठ विस्तारलेले आहे.

इतिहास : अन्नामलई विद्यापीठाची स्थापना शिक्षणतज्ज्ञ राजा सर अन्नामलई चेटियार यांनी केली. ते शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानणारे विचारवंत आणि एक यशस्वी उद्योगपती होते. इ. स. १९२० च्या दशकात दक्षिण भारतात उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादित होत्या आणि त्या प्रामुख्याने विशिष्ट वर्गांपुरत्याच मर्यादित होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन राजा सर अन्नामलाई यांनी चिदंबरम येथे उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी ठोस पावले उचलली. या दृष्टीने त्यांनी प्रथम ‘श्री मीनाक्षी आंग्ल महाविद्यालय’, ‘श्री मीनाक्षी तमिळ महाविद्यालय’ आणि ‘श्री मीनाक्षी संस्तकृ महाविद्यालय’ या तीन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था चिदंबरम येथे स्थापन केल्या. या महाविद्यालयांमधून आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय भाषा, संस्कृती व पारंपरिक ज्ञानशाखांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. कालांतराने या संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, वाढती विद्यार्थीसंख्या आणि समाजातील गरज लक्षात घेता त्यांना एकत्रित स्वरूप देऊन विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. याच पार्श्वभूमीवर इ. स. १९२८ मध्ये तमिळनाडू सरकारने ‘अन्नामलई विद्यापीठ कायदा’ मंजूर केला. त्या कायद्याच्या अधीन राहून १ जानेवारी १९२९ रोजी वरील तिन्ही महाविद्यालयांचे एकत्रीकरण करून ‘अन्नामलई विद्यापीठ’ अधिकृत रीत्या अस्तित्वात आले. स्थापनेच्या काळात हे विद्यापीठ खाजगी मालकीचे निवासी विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व भारतातील, विशेषतः दक्षिण भारतातील, पहिले खाजगी स्वरूपाचे निवासी विद्यापीठ म्हणून त्याची नोंद घेतली जाते. पुढील काळात शासनाच्या धोरणांनुसार या विद्यापीठाचे सार्वजनिक विद्यापीठात रूपांतर झाले. राजा अन्नामलाई यांनी २० लक्ष रूपये शासनास देणगी दिली आणि तमिळनाडू शासन त्यामध्ये २७ लक्ष रूपयांची भर घालून अन्नामलाई यांच्याच नालाने विद्यापीठाची स्थापना केली.

स्वरूप आणि रचना : अन्नामलई विद्यापीठ हे स्थापनेपासूनच एक निवासी आणि एकात्मक स्वरूपाचे विद्यापीठ म्हणून विकसित झाले. प्रारंभी या विद्यापीठाची रचना पूर्णतः निवासी पद्धतीवर आधारित होती. ज्यामध्ये अध्यापन, संशोधन, निवास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम हे सर्व एकाच विस्तीर्ण क्षेत्रामध्ये केंद्रित होते; मात्र २०१३ मध्ये ‘अन्नामलई विद्यापीठ कायदा’ अंमलात येऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय व कायदेशीर स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल घडून आले. या कायद्यांतर्गत अन्नामलई विद्यापीठाचे रूपांतर राज्य सरकारी विद्यापीठ म्हणून करण्यात आले; ज्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासन, निधी व्यवस्थापन व शैक्षणिक नियोजनाला अधिक संस्थात्मक आणि शासकीय अधिष्ठान प्राप्त झाले.

रचनात्मक दृष्टिकोणातून अन्नामलई विद्यापीठ हे बहुविद्याशाखीय स्वरूपाचे असून विविध ज्ञानशाखांचा समन्वय साधणारी विस्तृत शैक्षणिक रचना येथे आढळते. विद्यापीठात ज्ञान-विज्ञानाच्या एकूण १० प्रमुख विद्याशाखा कार्यरत आहेत. या विद्याशाखांमधून पारंपरिक विषयांसोबतच आधुनिक, व्यावसायिक व संशोधनाभिमुख अभ्यासक्रम व शिक्षणक्रम कार्यान्वित केले जातात. कला विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र व सार्वजनिक प्रशासन, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, तत्त्वज्ञान, भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, संगीत (कर्नाटक संगीत), नृत्य, चित्रकला, नाट्यकला इत्यादी आणि विज्ञान विद्याशाखेंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, संगणक विज्ञान, भूगोल, सागरी जीवशास्त्र, सागरी पर्यावरणशास्त्र, मत्स्यशास्त्र, सागरी जैवरसायनशास्त्र, किनारी परिसंस्था अभ्यास, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, कम्युनिकेशन अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी, कृषीशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, दंतशास्त्र इत्यादी शैक्षणिक विभाग कार्यरत असून प्रत्येक विभागांमार्फत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व संशोधन स्तरावरील अभ्यासक्रम व शिक्षणक्रम चालविले जातात. विभागीय रचनेमुळे विषयविशेष अध्ययन, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि नवनिर्मितीला चालना मिळते. सुसंघटित विद्याशाखा-विभाग प्रणाली, निवासी वसतिगृहे, सुविधा आणि राज्य विद्यापीठाचा दर्जा यांमुळे अन्नामलई विद्यापीठ हे शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन विस्तार आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल साधणारे एक अग्रणी व महत्त्वाचे उच्च शिक्षणकेंद्र म्हणून सुपरिचित आहे.

क्षेत्रफळ : अन्नामलई विद्यापीठाचा मुख्य परिसर हा भारतातील सर्वांत विस्तीर्ण आणि अद्ययावत शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज परिसारांपैकी एक मानला जातो. हे विद्यापीठ सुमारे १,००० एकर क्षेत्रफळावर विस्तारलेले असून नियोजनबद्ध आणि स्वयंपूर्ण शैक्षणिक वसाहत म्हणून विकसित करण्यात आले आहे. ‘अन्नामलई नगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात शैक्षणिक, प्रशासकीय, निवासी व सांस्कृतिक सुविधा एकाच ठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध आहेत. परिसरात विविध विद्याशाखांसाठी स्वतंत्र इमारती, अत्याधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध व भव्य मध्यवर्ती ग्रंथालय, सुविधायुक्त देशी व विदेशी क्रीडा संकुले, मैदाने, व्यायामशाळा, मनोरंजन सांस्कृतिक केंद्रे, पोस्ट ऑफिस, बँकिंग सुविधा, आरोग्य केंद्र, ग्राहक भांडार, विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी सुसज्ज वसतिगृहे, अध्यापक व कर्मचारी वृंदांसाठी निवासी संकुले आणि स्वतंत्र अन्नामलई नगर रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहेत.

यांशिवाय, विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्ताराचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पोर्टो नोवो (परंगीपेट्टई) येथे स्थित सागरी विज्ञान केंद्र विशेष उल्लेखनीय आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारी वसलेले हे केंद्र सागरी जीवशास्त्र, मत्स्यविज्ञान, किनारी परिसंस्था, सागरी पर्यावरण संरक्षण आणि सागरी संसाधनांच्या जैव विविधता अभ्यासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनासाठी अनुकूल भौगोलिक स्थान लाभल्यामुळे हे सागरी विज्ञान केंद्र अन्नामलई विद्यापीठाच्या संशोधन परंपरेचा एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घटक ठरले आहे.

उद्देश : अन्नामलई विद्यापीठाची उद्देश पुढील प्रमाणे :

  • उच्च शिक्षणाचा प्रसार करून ग्रामीण आणि मागास भागांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
  • विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या शाखांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करणे.
  • तमिळ भाषा, साहित्य, संगीत आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन, विकास व प्रसार करणे.
  • कौशल्य विकासाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्रदान करणे इत्यादी.

अन्नामलई विद्यापीठाची कार्यपद्धती ही स्थापनेपासूनच निवासी शिक्षणपद्धतीवर आधारित असून हीच विद्यापीठाची प्रमुख ओळख मानली जाते. हजारो विद्यार्थी, संशोधक आणि अध्यापक एकाच विस्तीर्ण परिसरात वास्तव्यास राहून अध्ययन, अध्यापन, संशोधन, विस्तार, मूल्यमापन आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. अशा निवासी व्यवस्थेमुळे सातत्यपूर्ण संवाद, शैक्षणिक चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संशोधनाभिमुख वातावरण निर्माण होते; जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास पोषक ठरते. वर्गाबाहेरील शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रम यांना येथे विशेष महत्त्व दिले जाते.

अन्नामलई विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण संचालनालय आहे. या केंद्रामार्फत विविध विद्याशाखांतील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम व शिक्षणक्रम देश-विदेशांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात. भौगोलिक, आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे नियमित शिक्षण घेणे शक्य नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र उच्च शिक्षणाची दारे उघडणारे महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे. मुद्रित अभ्याससाहित्य, संपर्क सत्रे, दूरस्थ सुविधा आणि मूल्यांकन व्यवस्था यांच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण प्रभावीपणे राबविले जाते.

शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याला आधार देणारी विद्यापीठाची ग्रंथालय व्यवस्थाही अत्यंत समृद्ध आहे. विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय, ‘सर पी. टी. राजन ग्रंथालय’ हे दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शैक्षणिक ग्रंथालयांपैकी एक गणले जाते. या ग्रंथालयात विविध विषयांवरील लाखो ग्रंथसंपदा, नियतकालिके, संशोधन अहवाल, तसेच दुर्मिळ हस्तलिखिते व प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचा मौल्यवान संग्रह उपलब्ध आहे. आधुनिक अंकिय साधनांसह पारंपरिक ग्रंथसंपदेचा संगम या ग्रंथालयात साधलेला असून संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी ते निरंतर ज्ञानाचा अमूल्य स्रोत ठरते.

संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाची ओळख विशेषतः सागरी विज्ञानामुळे दृढ झाली आहे. परंगीपेट्टई येथे असलेले सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन मरीन बॉयोलॉजी हे युनेस्को आणि विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्या मान्यतेने विकसित झालेले प्रगत संशोधन केंद्र आहे. सागरी जैवविविधता, किनारी परिसंस्था, मत्स्यसंसाधन व्यवस्थापन, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदलाचे परिणाम या विषयांवर येथे दीर्घकालीन व क्षेत्राधारित संशोधन केले जाते. बंगालच्या उपसागराच्या सान्निध्यातील भौगोलिक लाभांमुळे प्रत्यक्ष नमुना-संकलन, प्रयोगशाळा विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रकल्प प्रभावीपणे राबविले जातात.

विद्यापीठाच्या कृषी विद्याशाखेने पिक उत्पादनवाढ, मृदा व जलसंधारण, कीड-रोग व्यवस्थापन, बागायती आणि ग्रामीण विकास या विषयांवर अनुप्रयुक्त संशोधन केले आहे. या संशोधनातून विकसित तंत्रज्ञान व शिफारसींचा लाभ स्थानिक शेतकरी समुदायाला झाला असून शाश्वत शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात विद्यापीठाचा हातभार लागला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती व प्रख्यात शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १९८० च्या दशकात येथे एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक होते. त्यांच्या विद्यापीठातील कार्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणात संशोधनाभिमुख दृष्टिकोण आणि प्रेरणादायी शैक्षणिक संस्कृतीला चालना मिळाली. याशिवाय तमिळ भाषा, साहित्य, संगीत आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या संवर्धनातही विद्यापीठाने सातत्याने योगदान दिले आहे.

अन्नामलई विद्यापीठाची स्थापना ही केवळ एका शिक्षणसंस्थेची निर्मिती नव्हती, तर ग्रामीण, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचविण्याच्या व्यापक सामाजिक ध्येयाची सुरुवात होती. स्थापनेपासूनच या विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांवर आधारित वाटचाल केली असून भारतीय उच्च शिक्षणाच्या इतिहासात विद्यापीठाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय मानले जाते.

संदर्भ :

  • https://www.annamalaiuniversity.ac.in
  • https://www.tn.gov.in/highereducation
  • https://www.ugc.ac.in

समीक्षक : विजयकुमार पाईकराव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.