जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये जम्मू व काश्मीर या नावाने स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाचे १९६९ मध्ये विभाजन होऊन जम्मू आणि काश्मीर अशी दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली. त्यांपैकी जम्मू येथे जम्मू विद्यापीठ, तर श्रीनगर येथे काश्मीर विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्याचे राज्यपाल नरींदर नाथ व्होरा हे विद्यापीठाचे कुलपती, तर खुर्शिद इक्बाल अंद्राबी हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

काश्मीर विद्यापीठाचा परिसर श्रीनगरमधील हझरतबल येथे सुमारे २४७ एकर क्षेत्रांवर विस्तारलेला असून त्याच्या पूर्वेस जगप्रसिद्ध दाल सरोवर आणि पश्चिमेस निगीन सरोवर आहे. विद्यापीठालगतच अमर सिंग बाग, नसीम बाग व मिर्झा बाग ही उद्याने आहेत. सुरुवातीला विद्यापीठाचे काही पदव्युत्तर विभाग तसेच संशोधन व इतर काही केंद्रे नसीम बागेमध्ये होती; परंतु ही बाग वारसा स्थळ म्हणून विकसित करण्याचा शासनाच्या निर्णयामुळे विद्यापीठाने तेथील सर्व विभागांचे हझरतबल परिसरात स्थलांतर केले. त्यानंतर २०१३ मध्ये हझरतबल परिसरालगतच झाकुरा हा परिसर विद्यापीठासाठी नव्याने विकसित करण्यात आला आहे. मिर्झा बाग किंवा युनिव्हर्सिटी टाऊन परिसरात विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या अनेक इमारती आहेत.

विद्यापीठाने २००८ मध्ये अनंतनागमधील फतेहगढ येथे साऊथ कँपस आणि २००९ मध्ये बारामुल्लामधील देलिना येथे नॉर्थ कँपस ही विद्यापीठाची दोन उपग्रह कँपसची स्थापना केली आहे. तसेच काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा, कारगिल आणि लेह या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना  अधिक सुकरपद्धतीने उच्च शिक्षण घेता यावे, या हेतूने विद्यापीठामार्फत या तीन ठिकाणीसुद्धा नव्याने  कँपसची स्थापन करण्यात आली आहे. काश्मीर बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याकरिता विद्यापीठाने जम्मू येथे एक उप कार्यालय स्थापन केले आहे.

विद्यापीठामार्फत राज्यातील शैक्षणिक, आर्थिक, शास्त्रीय, व्यावसायिक व सांस्कृतिक वातावरणाला अनुसरून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी संख्येचा विचार करता हे राज्यांतील सर्वांत मोठे विद्यापीठ ठरते. काश्मीर विद्यापीठांतर्गत १२ विद्याशाखा, ४७ शैक्षणिक विभाग, २१ विद्याविषयक (Academic) केंद्रे, ३६ महाविद्यालये आणि राज्यभर विस्तारलेल्या ६ मान्यताप्राप्त खाजगी संस्था आहेत. विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने विधी विद्याशाखा आणि व्यवसाय विद्यालय हे दोन विभाग सर्वांत मोठे आहेत. विधी विभाग उच्च दर्जाचा आणि सर्वांत जुन्या विभागांपैकी एक असून त्यात पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सुविधा आहेत. पर्यटन आणि आतिथ्य व्यवस्थापन शिक्षणात विद्यापीठ महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विद्यापीठाने २०१४ पासून झाकुरा परिसरात अभियांत्रिकी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली आहे. विद्यापीठातील ग्रंथालय समृद्ध असून त्यात सुमारे ६ लाख पुस्तके उपलब्ध आहेत.

काश्मीर विद्यापीठात कला, व्यवसाय व व्यवस्थापनशास्त्र, शिक्षण, विधी, उपयोजित विज्ञान व तंत्रविद्या, जीवविज्ञान, भौतिकशास्त्र, सामाजिक विज्ञान, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, प्राच्यविद्या, संगीत व ललित कला या विद्याशाखा आहेत. काश्मीर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांत ७ घटक महाविद्यालये, ७ खाजगी व्यवस्थापन असलेली उच्च व्यवसाय शिक्षण महाविद्यालये आणि ३१ कायमस्वरूपी संलग्न शासकीय महाविद्यालये आहेत. संलग्न शासकीय महाविद्यालयांपैकी ६ महिला महाविद्यालये आहेत.

विद्यापीठ अनेक वर्षांपासून विविध उत्कृष्ठ शैक्षणिक कार्यक्रम व उपक्रम राबवीत आहे. २०११ मध्ये ‘नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रेडीटेशन काउंसीलʼ (NAAC) या संस्थेने विद्यापीठाला ‘अʼ श्रेणीचे मानांकन दिले आहे. उच्च दर्जाचे शिक्षण व संशोधन यांमुळे विद्यापीठाचे नावलौकिक आहे.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा