महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. विद्यापीठीय शिक्षणाचे विकेंद्रीकरण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९८९ नुसार १५ ऑगस्ट १९९० रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. पूर्वी हे विद्यापीठ पुणे विद्यापीठात समाविष्ट होते. उत्तर महाराष्ट्र क्षेत्रातील ग्रामीण भागांत, दऱ्या-खोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पुणे विद्यापीठ खूप लांब होते. विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या, तसेच विद्यापीठाशी संपर्क करण्यासाठी गैरसोय होत होती. याचा विचार होऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ‘अंतरी पेटवू ज्ञानज्योत’ हे विद्यापीठाचे ब्रीद वाक्य असून ‘मंत्र असो हा एकच हृदयी जीवन म्हणजे ज्ञान, ज्ञानामधूनी मिळो मुक्ती अन् मुक्तिमधून ज्ञान’ हे विद्यापीठ गीत आहे. हे गीत राजा महाजन या कवींनी लिहिले आहे. विद्यापीठाला २०१५ मध्ये नॅक मूल्यांकनाद्वारा ‘अ’ श्रेणी प्राप्त आहे. डॉ. एन. के. ठाकरे हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

विद्यापीठ परिसर ६६० एकरमध्ये वसले असून परिसरात सुमारे दोन लाख वृक्ष आहेत. ते जळगावपासून ८ किमी., तर महामार्ग क्र. ४६ पासून १.५ किमी.वर पिंप्राळा गावाच्या शिवारात आहे. या विद्यापीठ परिक्षेत्रात धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतात. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी, वंचित ग्रामीण विद्यार्थांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, आदिवासी व ग्रामीण विभागातील समाजाचे जीवनमान उंचावे या हेतूने हे विद्यापीठ कार्य करित आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी विद्यापीठाने आपली उपकेंद्र चालू केली आहेत. त्यात ‘प्रताप प्रादेशिक पदवीधर उपकेंद्र’ अमळनेर, ‘महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र’ धुळे आणि ‘एकलव्य प्रशिक्षण केंद्र’ नंदुरबार यांचा समावेश आहे. अमळनेर उपकेंद्रातून पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. धुळे केंद्रातून महात्मा गांधी विचारधारेचा प्रचार, प्रसार व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. नंदुरबार एकलव्य केंद्रात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व विद्यापीठासंबंधी माहिती देणे या स्वरूपाचे कार्य केले जाते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालय, वाचनकक्ष इत्यादींबाबत प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व विद्यार्थी हित डोळ्यांसमोर ठेवून ही तीन केंद्रे विद्यापीठाला मदत करतात.

ध्येय, दृष्टीकोन व उद्देश : समाज घटकांच्या सशक्त सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरुक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. या विद्यापीठाचे मूळ ध्येय ‘शिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी’ (टीच वन इच वन अँड ट्री वन) असे होते. अध्यापन, संशोधन आणि विस्तार यांमध्ये उत्कृष्टतेद्वारे सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण गुणवत्ता व तांत्रिक शिक्षण देऊन ज्ञानावर आधारित समाज विकसित करणे, हे विद्यापीठाचा दृष्टीकोन असून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व वैज्ञानीकांच्या उन्नतीसाठी अनुकूल वातावरणात दर्जेदार शिक्षण देणे, हे विद्यापीठाचे उद्देश आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सुमारे २२० महाविद्यालये संलग्नित आहेत. अध:संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि संसाधनांच्या उत्तम वापरासाठी शैक्षणिक लवचिकतेसह ‘स्कूल’ ही संकल्पना यशस्वी रीत्या विद्यापीठाने साकारली आहे. त्यात १३ स्कूल आहेत. यांव्यतिरिक्त विद्यापीठाद्वारे मानवविद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरशाखीय अभ्यास या विभागांतर्गत विविध विषयांचे अध्ययन-अध्यापन कार्य चालते. प्रत्येक विभागात दरवर्षी सुमारे २०,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यापीठाद्वारे ६२ पदव्युत्तर विभाग, ३७ पीएच. डी. विभाग आणि एम. फील विभाग आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी म्हणून विद्यापीठाने संशोधन केंद्रे चालू केली आहेत. त्याद्वारे हजारो संशोधक आपले संशोधन कार्य पूर्ण करतात. या विद्यापीठाने वेळो वेळी उच्च शिक्षणातील बदल आपल्या कार्यपद्धतीत समाविष्ट केले आहेत. विद्यापीठाचा ६० : ४० अशी मूल्यमापनाची पद्धती (नमुना) आहे. यात ६० गुण हे बहिस्थ परीक्षेला, तर ४० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाला दिले आहेत. विद्यापीठाद्वारे दर पाच वर्षांनी विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचे पुनर्रचना करण्यात येते. या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्रक तयार करणे, महाविद्यालयांसाठी विविध नियमावली बनविणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सुरळित व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाईन मूल्यनिर्धारण (ऑनलाईन असेस्मेंट) केंद्र देणे इत्यादी कार्य विद्यापीठ सातत्याने करित असते.

विद्यापीठाने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रशिक्षण केंद्रे चालू केली आहेत. त्याचबरोबर दऱ्या-खोऱ्यांत, राना-वनांत राहणारे विद्यार्थी आर्थिक परिस्थिती व इतर कारणांमुळे पदव्युत्तर पदवीपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दूरशिक्षण संस्थांद्वारे (इन्स्टिट्युट ऑफ डिस्टंस एज्युकेशन) विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू केले आहे. जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल आहेत व काही कारणास्तव नियमितपणे महाविद्यालयांत उपस्थित राहू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एकूण १६ विभागांद्वारे खास अभ्यासक्रम चालविले आहेत. त्यात दरवर्षी २,५०० विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करित असतात. विद्यापीठात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे केंद्र देखील यशस्वी रीत्या चालविले जात आहे. विद्यापीठाने माजी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘लॅब टू लँड’ हे नवीन उपक्रम अवलंबिले. त्याद्वारे खानदेशातील शेतकऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. याव्यतिरिक्त विद्यापीठाद्वारे महिला अभ्यास केंद्र, विद्यार्थी कल्याण विभाग, प्रौढ आणि सातत्यपूर्ण शिक्षण व विस्तार विभाग, आदिवासी अकादमी, डॉ. बाबासाहेब स्पर्धा परीक्षा केंद्र, युजीसी रिमेडीयल क्लासेस, डे केअर सेंटर, सेन्ट्रल स्कूल इत्यादी विभाग सातत्याने कार्यरत आहेत. विद्यार्थी कल्याण विभागामार्फत कमवा व शिका या योजनाचा लाभ विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच महिला सशक्तीकरण, राष्ट्रीय सेवा योजना, आसपासच्या गावांतील मजुरांच्या कुटुंबाना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा, वाईट प्रसंगी जळगाव शहराला अँम्बुलंसची सेवा इत्यादी उपक्रम विद्यापीठाद्वारे राबविले जातात. विद्यापीठ सामाजिक आणि शैक्षणिक उद्दिष्टांसाठी अहोरात्र कार्य करित आहे.

विद्यापीठात सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक संशोधन सुविधा, हेल्थ सेंटर, इनडोर स्टेडीयमसह आरोग्य सुविधा, आदिवासी व मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, अतिथी गृह व व्ही. आय. पी. अतिथीगृह, शिक्षक भवन, स्टाफ क्वाटर्स, ग्रंथालय, बँक, ATM, पोस्ट ऑफीस, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेंट्रल स्कूल, शॉपिंग सेंटर इत्यादी विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सर्व गरजा पूर्ण होतील अशा सर्व सोई-सुविधा आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी शिक्षक भवनात राहण्यासाठी अल्प फी आकारले जाते. विद्यापीठाने महाराष्ट्र ज्ञानमंडळ लिमिटेड आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर शैक्षणिक करार करून डिजिटल विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

कुलगुरूंच्या नियंत्रणाखाली विद्यापीठातील विविध विभागाचे विस्तार करून शैक्षणिक कार्यक्रमांसोबत विविध मूल्ये व कौशल्ये विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. मूल्यांत नागरिक भावना, राष्ट्रीय बांधिलकी व वचन भावना, राष्ट्रवाद, देशभक्ती, लोकशाही भावना, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्री-पुरुष समानता व सामाजिक बांधीलकी, व्यावहारिक ज्ञान, संवाद कौशल्ये, सामाजिक पर्यावरण, संस्थापक कौशल्ये, निर्णय घेण्याचे कौशल्ये, वादविवाद गट चर्चा इत्यादी समाज उपयोगी कौशल्यांचे संगोपन केले जाते.

विद्यापीठाच्या स्थापने वेळी विद्यापीठ जळगाव शहरात एका भाड्याच्या इमारतीमध्ये होते. अल्पावधीतच विद्यापीठाची स्वत:ची जागा व इमारत झाली. मुख्य इमारतीमध्ये विद्यापीठाचे

सेंट्रल लायब्ररी

कामकाज तसेच  परीक्षा विभाग व असंश्लेशक विभाग आहेत. विद्यापीठाच्या मध्यभागी भव्य ग्रंथालय आहे. त्यामध्ये संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ, दुर्मिळ हस्तलिखिते, पुरातन वस्तू इत्यादींसह ६० हजारांच्या वर पुस्तके आहेत. ई-बुक सुविधा देखील ग्रंथालयात उपलब्ध आहे. विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता क्रीडा, व्याख्याने, मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन केले जाते.

जानेवारी २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामकरण होऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे झाले. विद्यापीठ शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक या विभागांत मोलाचे योगदान देत आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नवीन सक्षम भारत निर्मितीसाठी विविध क्षेत्रांमधून कार्य करित आहे. सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि समाजातील वंचित व कमकुवत वर्गांना सशक्तीकरण करण्यासाठी विद्यापीठ कार्यरत आहे.

 

समीक्षक : ह. ना. जगताप