लुकास, जॉर्ज वॉल्टन ज्युनियर : (१४ मे १९४४). जागतिक चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे नामांकित अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक. लुकास यांचा जन्म कॅलिफोर्नियातील मोडेस्टो या शहरात झाला. त्यांचे वडील जॉर्ज वॉल्टन लुकास सीनियर हे शालेय व कार्यालयीन साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय चालवत असत.
बालपणापासूनच लुकास यांना गाड्यांची जबरदस्त आवड होती आणि एकेकाळी त्यांचे स्वप्न व्यावसायिक रेसर बनण्याचे होते. मात्र शालेय शिक्षणाच्या अखेरीस झालेल्या एका गंभीर अपघातामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले आणि त्यांनी चित्रकला, चित्रपट व इतर सर्जनशील क्षेत्रांकडे वळण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी मोडेस्टो ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि साहित्याचा अभ्यास केला. याच काळात त्यांना सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफीमध्ये गती निर्माण झाली. पुढे त्यांनी सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स या शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना चित्रपटनिर्मितीचा सखोल अभ्यास करायला मिळाला.
विद्यार्थीदशेत लुकास यांनी ‘इलेक्ट्रॉनिक लॅबिरिंथ : THX 1138 4EB (१९६७)’ हा लघुपट तयार केला, ज्याला १९६७-६८ च्या नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिले पारितोषिक मिळाले. हीच कल्पना पुढे ‘THX 1138’ या त्यांच्या पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचा पाया ठरली. १९६७ मध्ये पदवी मिळाल्यानंतर लुकास यांनी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांच्यासोबत ‘अमेरिकन झोएट्रोप’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीचा उद्देश पारंपरिक हॉलिवुड पद्धतीला आव्हान देणे आणि कलाकार केंद्रित चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे असा होता. या कंपनी मार्फत तयार केलेला पहिला चित्रपट होता ‘THX 1138 (१९७१)’ हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही, परंतु लुकास यांना एक प्रतिभावान आणि प्रयोगशील चित्रपट निर्माता म्हणून ओळख मिळवून देण्यात यशस्वी ठरला. यानंतर कोपोला यांनी ‘द गॉडफादर’ (१९७२) या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटावर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे लुकास यांनी स्वतःची ‘लुकास फिल्म लिमिटेड (१९७१)’ ही चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन केली.
लुकास यांना पहिले मोठे व्यावसायिक यश ‘अमेरिकन ग्राफिटी (१९७३)’ या चित्रपटामुळे मिळाले. हा चित्रपट १९६० च्या दशकाच्या सुरुवातीतील किशोरवयीन जीवनावर आधारित अर्ध-आत्मचरित्रात्मक कथा सांगतो. या चित्रपटाला पाच अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली आणि त्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. अमेरिकन ग्राफिटीच्या यशामुळे लुकास यांना पुढील मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक आणि औद्योगिक पाठबळ मिळाले. १९७३ ते १९७४ दरम्यान लुकास यांनी ‘स्टार वॉर्स : एपिसोड IV – अ न्यू होप (१९७७)’ या अंतराळविज्ञानाशी निगडित काल्पनिक चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली. या चित्रपटातील अद्भुत दृश्य प्रभावांसाठी त्यांनी ‘इंडस्ट्रियल लाईट अँड मॅजिक’ ही कंपनी स्थापन केली. तसेच ध्वनी संरचनेसाठी बेन बर्ट यांना नेमले, ज्यांनी पुढे त्यांच्या ‘स्कायवॉकर साउंड’ या संस्थेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. स्टार वॉर्सच्या निर्मितीमध्ये अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी आल्या; पण तरीही त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. प्रदर्शित झाल्यानंतर तो अभूतपूर्व लोकप्रिय ठरला. हा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आणि त्याला सहा अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. स्टार वॉर्सने लुकास यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली आणि त्यांना आधुनिक चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख मिळाली. ‘अ न्यू होप’च्या यशानंतर लुकास यांनी ‘द एम्पायर स्ट्राइक्स बॅक (१९८०)’ आणि ‘रिटर्न ऑफ द जेडाय (१९८३)’ या पुढील भागांचे (सिक्वेल्स) निर्माता आणि सहलेखक म्हणून काम केले, ज्यामुळे स्टार वॉर्सचे विश्व अधिकच विस्तारले. १९८० मध्ये लुकास यांनी ‘रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’ या चित्रपटाच्या कथेचा लेखक आणि चित्रपट निर्मितीमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम केले. इंडियाना जोन्स या पुरातत्त्वशास्त्रज्ञाच्या साहसावर आधारित चित्रपटही खूपच यशस्वी ठरला. या चित्रपटाने पाच अकादमी पुरस्कार पटकावले. १९८६ मध्ये लुकास यांनी ‘कॅप्टन ईओ या ३-डी म्युझिकल स्पेस अॅडव्हेंचर’च्या निर्मितीत सहभाग घेतला. हा १७ मिनिटांचा चित्रपट फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांनी दिग्दर्शित केला आणि त्यात ‘मायकेल जॅक्सन’ मुख्य भूमिकेत होते. १९९७ मध्ये लुकास यांनी स्टार वॉर्स त्रयीच्या विशेष आवृत्त्या (स्पेशल एडिशन्स) प्रकाशित केल्या. त्यात नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने दृश्य-प्रभाव सुधारले गेले होतेआणि काही दृश्ये पुन्हा चित्रित केली गेली होती. लुकास यांनी स्टार वॉर्स प्रीक्वेल या त्रयीचे दिग्दर्शन केले, ज्यात ‘द फँटम मेनेस (१९९९)’, ‘अटॅक ऑफ द क्लोन्स (२००२)’ आणि ‘रिव्हेंज ऑफ द सिथ (२००५)’ हे चित्रपट होते. या चित्रपटांनी स्टार वॉर्सच्या कथेचा पूर्वेतिहास उलगडला आणि नवीन पात्रे व घटना सादर केल्या, ज्यांनी या मालिकेच्या विश्वाला नवे पैलू दिले. २००४ आणि २०११ मध्ये चित्रपटांत आणखी काही तांत्रिक बदल आणि सुधारणा करण्यात आल्या.
२०१२ मध्ये लुकास यांनी त्यांची ‘ द लुकास फिल्म लिमिटेड’ ही संस्था डिस्नेला ४.१ अब्ज डॉलर्सचे स्टॉक आणि रोख रकमेच्या मोबदल्यात विकली. त्यानंतरही लुकास यांनी ‘रेड टेल्स (२०१२)’ या दुसऱ्या महायुद्धातील टस्केगी एअरमेनवर आधारित चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम केले तसेच ‘स्ट्रेंज मॅजिक (२०१५)’ या संगणक-ऍनिमेटेड संगीतमय चित्रपटाची कथा लिहिली.
लुकास यांचे योगदान केवळ तांत्रिक आणि सर्जनशील नव्हे, तर शिक्षण, कला आणि परोपकाराच्या (फिलांथ्रोपी) क्षेत्रातही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी १९९१ मध्ये ‘जॉर्ज लुकास एज्युकेशनल फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली जी नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी आहे. २००५ मध्ये लुकास यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथील नॅशनल मॉलवर अमेरिकन नागरी हक्क नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या सन्मानार्थ मेमोरियल बांधण्यासाठी १ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. १९ सप्टेंबर २००६ रोजी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाला लुकास यांच्याकडून त्यांच्या फिल्म स्कूलचा विस्तार करण्यासाठी १७५-१८० दशलक्ष डॉलर्स मिळाले. त्या आधीही त्यांनी विद्यापीठाच्या ‘जॉर्ज लुकास इंस्ट्रक्शनल बिल्डिंग’ आणि ‘मार्सिया लुकास पोस्ट-प्रॉडक्शन बिल्डिंग’ यांना निधी दिला होता. २०१३ मध्ये लुकास आणि त्यांची पत्नी मेलोडी हॉबसन यांनी शिकागोस्थित ना-नफा संस्था, आफ्टर स्कूल मॅटर्सला, २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. १५ एप्रिल २०१६ रोजी लुकासने हॉबसन/लुकास फॅमिली फाउंडेशनद्वारे ओबामा फाउंडेशनला जवळजवळ १ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. २०२१ मध्ये त्यांनी मार्टिन स्कॉर्सेसी इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल सिनेमॅटिक आर्ट्सची स्थापना करण्यासाठी एनवाययूला देणगी दिली.
संदर्भ :
- https://www.lucasfilm.com/who-we-are/our-story/
- https://achievement.org/achiever/george-lucas/
समीक्षक : संतोष पाठारे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.