या शिखराला शिखर ५८ असेही संबोधले जाते. हे काराकोरम पर्वतरांगेतील एक शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ७,४०९ मी. असून जगातील सुप्रसिद्ध अतिउंच पर्वत शिखरांपैकी ते एक आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये असलेल्या हारमोश खोऱ्यात असलेले हे शिखर गिलगिट शहराच्या पूर्वेस सुमारे ६५ किमी. अंतरावर आहे. गिलगिटमधून ते सहज दृष्टीपथास पडते. काराकोरम पर्वताची उप-रांग असलेल्या रकपोशी-हारमोश पर्वतश्रेणीच्या दक्षिण-मध्य भागात, ३५° ५०′ २४″ उ. अक्षांश आणि ७४° ५३′ ५१″ पू. रेखांशावर हे शिखर स्थित आहे. सिंधू व गिलगिट या नद्यांच्या संगमस्थानापासून वरच्या बाजूस थोड्याच अंतरावर हे शिखर असून सिंधू नदीच्या उत्तर काठापासून त्याची उंची एकदम सरळ उंच वाढत गेलेली दिसते. या शिखराच्या पायथ्यालगतच्या भागात ३,३०० मी. उंचीवर कुतवाल (कोतवाल) सरोवर पसरले आहे. हारमोशच्या एका बाजूला पायथ्यालगत सस्सी हे ठिकाण, तर दुसऱ्या बाजूला कुतवाल हे ठिकाण आहे. स्कार्डू या शहराकडे जाणारा मार्ग हनुचल आणि सस्सी या दोन ठिकाणांच्या मधून जातो.

हारमोश शिखर हे काराकोरम पर्वतातील ४१ व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. रकपोशी-हारमोश पर्वतरांगेतील या शिखराचा स्थलाकृतिक समुन्नतपणा (टोपोग्राफिक प्रॉमिनन्स) सुमारे २,२७७ मी. आहे. ही उंची अशी आहे की, त्यामुळे ते जगातील प्रमुख शिखरांमध्ये गणले जाते. सामान्यत: ज्या शिखराची आसपासच्या भूभागापेक्षा १,५०० मी. पेक्षा जास्त उंचीने वाढ असते, त्यांना प्रमुख शिखरे म्हणतात. त्यामुळे या शिखराचे भूप्रदेशातील स्वतंत्र आणि ठळक स्थान अधोरेखित होते. तसेच त्याचे इतर भागापासूनचे विलगीकरण सुमारे १८ किमी. आहे. हे शिखर रकपोशी-हारमोश पर्वतरांगांतील हारमोश गिरिपिंडाचा भाग आहे. या गिरिपिंडामध्ये मुख्यत: दोन शिखरे समाविष्ट आहेत. एक, हारमोश शिखर आणि त्याच्या शेजारी असलेले दुसरे हारमोश कुतवाल, ज्याला सामान्यत: लैला शिखर असेही म्हणतात. याची उंची अंदाजे ६,९८५ मी. आहे. हा गिरिपिंड सिंधू नदीच्या खोऱ्यातून अचानक उंचावलेला दिसतो. शिखराचा पाया सुमारे २,५०० मी. उंचीवर असून अल्प आडव्या अंतरातच सुमारे ४,९०० मी. पेक्षा अधिक उभा उंच फरक निर्माण होतो. त्यामुळे या शिखराचा तीव्र आणि भव्य उतार विशेषत्वाने जाणवतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या हारमोश शिखर प्रामुख्याने ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहे. हे खडक काराकोरम बॅथोलिथ या मोठ्या भूवैज्ञानिक संरचनेचे वैशिष्ट्य आहेत. यात अंतर्वेशी ग्रॅनाइट आणि त्यासोबत पेग्मटाइट खडक आढळतात. भारतीय व यूरेशियन भूपट्टांच्या एकमेकांवरील आघातामुळे झालेल्या भूभ्रंशमूलक प्रक्रियांदरम्यान या खडकांची निर्मिती झाली आहे. शिखराच्या वरच्या भागात वर्षभर हिम आणि बर्फाचे आच्छादन असते. या बर्फातून हारमोश आणि कुतवाल हिमनद्या तयार होतात आणि त्या खाली दऱ्यांकडे वाहत जातात.

पिरॅमिडसारख्या आकर्षक आकारामुळे हारमोश शिखर अत्यंत प्रसिद्ध आहे. सिंधू खोऱ्यातून दिसणारी त्याची ठळक रूपरेषा परिसरातील इतर भूभागांच्या तुलनेत विशेष उठून दिसते. त्यामुळे गिर्यारोहणाच्या वर्णनांमध्ये आणि दृश्यात्मक सौंदर्याच्या दृष्टीने या शिखराला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघातील हेनरीख रॉइस, स्टीफन पॉर आणि फ्रान्झ मंडल यांनी ४ ऑगस्ट १९५८ रोजी ईशान्येकडील मार्गाने पहिल्यांदा यशस्वीरित्या हे शिखर सर केले. त्याआधी इ. स. १९४७ मध्ये एका स्विस संघाला पहिल्यांदा हे शिखर दृष्टीस पडले होते. त्यानंतर १९५५ मध्ये जर्मन संघाने ईशान्येकडून या शिखरावर जाण्यायोग्य मार्ग शोधून काढला. १९५७ मध्ये  इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून हारमोश शिखरावर गेलेली मोहीम मात्र गिर्यारोहकांच्या जीवावर बेतली. या गिर्यारोहण संघात सहभागी असलेले अधिकारी टोनी स्ट्रेदर, जॉन एमरी, बर्नार्ड जिलोट आणि राय कल्बर्ट यांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना एकामागून एक आलेल्या दुर्दैवी संकटांचा सामना करावा लागला. या मोहिमेत बर्नार्ड जिलोट व राय कल्बर्ट यांना आपला प्राण गमवावा लागला. एमरी व स्ट्रेदर हे जीवंत राहिले; परंतु त्यांच्यापैकी एमरी यांना गंभीर हिमबाधा झाली व त्यात त्यांना आपली हातापायाची सर्व बोटे गमवावी लागली. या मोहिमेचे वीररसात्मक वर्णन राल्फ बार्कर यांच्या द लास्ट ब्लू मौंटन या महाकाव्यात केलेले आढळते. हिमालय पर्वताच्या सुचीनुसार त्यानंतर हे शिखर सर करण्याचे १९७८, १९७९ व १९८८ मध्ये असे तीन प्रयत्न झाले.

संदर्भ : Barker, Ralph, The Last Blue Mountain, UK, March 2020

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.