काराकोरम पर्वतश्रेणीतील भारत व चीन या दोन देशांच्या सरहद्दीवरील एक इतिहासप्रसिद्ध खिंड. भारताचा लडाख हा केंद्रशासित प्रदेश आणि चीनचा शिनजियांग हा स्वायत्त प्रदेश यांच्या सीमारेषेवर ही खिंड स्थित आहे. ही खिंड समुद्रसपाटीपासून ५,५४० मी. उंचीवर आहे. मध्य आशियाला जोडणाऱ्या अनेक खिंडी काराकोरम पर्वतश्रेणीत आहेत. त्यांपैकी काराकोरम ही एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीतील दोन पर्वत शिखरांच्या दरम्यान सुमारे ४५ मीटर रुंदीची ही एक ग्रीवाखिंड किंवा खिंड आहे. काराकोरामचा तुर्की भाषेतील अर्थ ‘काळी रेव’ किंवा ‘रेती’ असा आहे. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या रांगेचे ‘कृष्णगिरी’ असे नाव आढळते. प्राचीन काळापासून लडाखमधील लेह आणि तिबेटच्या पठारावरील तारीम खोऱ्यातील यार्कंद यांदरम्यानच्या प्रवासासाठी या खिंडीतून जाणाऱ्या घाटमार्गाचा वापर केला जात होता.

भारत, चीन आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्या आंतरराष्ट्रीय सीमांलगत ही खिंड असल्याने तिला भौगोलिक तसेच भूराजनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. काराकोरम खिंड आणि आसपासचा प्रदेश भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील काही भूप्रदेश परस्पर चीनला दिला आहे. काराकोरम खिंडीच्या दक्षिणेस गलवान खोरे, तसेच दौलत बेग ओल्डीसारखी महत्त्वाची लष्करी ठाणी आहेत. पश्चिमेकडे सियाचीन हिमनदीचा प्रदेश आहे. संपूर्ण सियाचीन हिमनदी प्रदेश आणि तेथील सालतोरो कटक व सर्व प्रमुख खिंडी (उदा., सिआ ला, बिलाफाँड ला, ग्याँग ला, यार्मा ला व चुलुंग ला इत्यादी) हा पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे. सियाचीन हिमनदी परिसराच्या ताब्यावरून भारत-पाकदरम्यान वाद आहे. हा भूप्रदेश जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखला जातो.  सियाचीन हिमनदीच्या उत्तरेस असलेल्या खुंजेराब खिंडीमार्गे पाकिस्तान आणि चीन यांच्या दरम्यान व्यापार चालतो. या खिंडमार्गेच चीनने त्यांचा चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपेक) हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्पमार्ग सियाचीनपासून केवळ ८ किमी. वर असल्याने चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर वचक ठेवण्यासाठी काराकोरम खिंड आणि सियाचीन प्रदेश अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत.

या अतिउंच खिंडीत वनस्पतीजीवन अजिबात आढळत नाही. चारा किंवा गवताच्या अभावाने इतिहासकाळात या मार्गावरून वाहतुकीसाठी वापरले जाणारे असंख्य प्राणी मृत्युमुखी पडत असत. त्यामुळे त्या मृत प्राण्यांची असंख्य हाडे या खिंडमार्गावर विखुरलेली आढळत असत. या भागात नेहमीच वेगवान वारे आणि तीव्र हिमवादळे (ब्लिझर्ड) आढळतात. वेगवान वाऱ्यांमुळे या खिंडमार्गात बर्फाच्छादन आढळत नाही. खिंडीच्या दोन्ही बाजूंनी क्रमाक्रमाने वाढत जाणारी उंची आणि वर्षातील बहुतांश काळ हिमविरहित अशा भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतुकीसाठी हा खिंडमार्ग तुलनेने सोपा आहे. त्यामुळे वर्षातील अधिकांश काळ ही खिंड वाहतुकीसाठी खुली असते; परंतु खिंडीतून मोटारगाडी रस्ता नाही. सध्याच्या परिस्थितीत ही खिंड सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात आली आहे.

समीक्षक : वसंत चौधरी