आधुनिक योगासनाचा एक प्रकार. ग्रीवा म्हणजे मान आणि आसन म्हणजे स्थिर व सुखकर स्थिती. यामध्ये संपूर्ण शरीराचा भार हा डोके आणि तळपायांवर असतो, ज्यामुळे मानेचा भाग कमानीसारखा (Cervical) उंचावला जातो. हे आसन मानेला मजबूत बनवण्यासाठी मदत करते. ग्रीवासन आणि सेतुबंधासन या दोन आसनांत थोडे साम्य दिसते, परंतु ती दोन वेगळी आसने आहेत. योगासनाचा हा एक आधुनिक प्रकार असल्याने या आसनाचा उल्लेख योगाच्या पारंपरिक ग्रंथांमध्ये आढळत नाही. स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या ‘आसन प्राणायाम मुद्रा बंध’ या पुस्तकात या आसनाचे वर्णन आले आहे.

कृती : पाठीवर सरळ झोपून दोन्ही गुडघे दुमडून पायाच्या टाचा नितंबाजवळ आणल्या जातात. दोन्ही पायात थोडेसे अंतर ठेवावे. दोन्ही हात कोपऱ्यामध्ये दुमडून पंजे कानाजवळ जमिनीवर ठेवावे. दोन्ही पावले जमिनीवर दाबून व हातांच्या पंजांच्या आधाराने कंबर वर उचलून डोक्याचा वरचा भाग जमिनीवर ठेवावा. दोन्ही हात घडी करून छातीवर ठेवावेत. या स्थितीमध्ये डोके आणि पायाच्या पंजाच्या साहाय्याने शरीराचे संतुलन साधायचा प्रयत्न करावा. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. या आसनाच्या सुरुवातीला दीर्घ श्वसन करत शरीर वर उचलावे व श्वास आत रोखून धरावा. अंतिम स्थितीत सामान्य श्वसन ठेवावे. आसन सोडताना श्वास सोडत कंबर खाली आणावी व पूर्वस्थितीत यावे. या आसनाच्या अंतिम स्थितीत आपले लक्ष मान, त्रिकास्थी (Sacrum), डोक्याचा वरचा भाग आणि श्वासावर केंद्रित करावे, जेणेकरून शरीराच्या भागांवर पडणारा दाब आणि ताण अनुभवता येईल. हे आसन पूर्ण झाल्यानंतर पूरक आसन म्हणून पश्चिमोत्तानासन किंवा पुढे झुकून करता येणारी अन्य आसने करावीत.
लाभ : ग्रीवासनामुळे मानेचे स्नायू, पाठ व मांड्या मजबूत होण्यास मदत होते. तसेच या आसनामुळे मानदुखी व खांदेदुखी यांमध्ये आराम मिळतो.
विधिनिषेध : या आसनात मानेसारख्या नाजूक भागावर जास्त जोर येतो, त्यामुळे मानेच्या भागाचे आजार, कशेरु संधिशोथ (Spondylitis), चक्रभ्रंश (Slip disc), उच्च रक्तदाब, हृदयविकार, डोळ्यांच्या गंभीर समस्या आणि अंतर्गळ (Hernia) इत्यादी विकारांत हे आसन करू नये. तसेच डोक्याचा वरचा भाग व दोन्ही पावले या आधारावर तोल सांभाळणे कठीण जात असल्यास हे आसन करू नये. हे आसन शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
संदर्भ :
- Swami Satyananda Saraswati, Asana Pranayama Mudra Bandha, Bihar School of Yoga, Munger, Bihar, 1993.
- https://worldyogaforum.com/yoga-poses/grivasana/
समीक्षक : विनोद जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.