जैन तत्त्वज्ञानातील एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण विचारप्रवाह. हा स्वतंत्र किंवा वेगळा नसून, जैन दर्शनाचा प्राण असलेल्या ‘स्याद्वाद’ वा ‘अनेकान्तवाद’ या सिद्धांताचाच एक भाग आहे. अव्यक्तवादाचे प्रवर्तक आषाढ (इ.स.पू. २५१) यांच्या मते, जेव्हा एखाद्या वस्तूचे, घटनेचे, तत्त्वाचे निश्चित स्वरूप स्पष्टपणे सांगता न येणे म्हणजेच अव्यक्तवाद होय. जैन तत्त्वज्ञानात ‘अव्यक्त’ म्हणजे जे स्पष्टपणे व्यक्त करता येत नाही किंवा निश्चितपणे सांगताही येत नाही. म्हणजेच कोणत्याही वस्तू किंवा घटनेबद्दलचे अंतिम सत्य केवळ एका दृष्टिकोनातून समजू शकत नाही, तर ते अनेक दृष्टिकोनांतून पाहिले पाहिजे. जैन आचार्यांनी अशा एकांगी किंवा अनिश्चित मतांचे परीक्षण करून अनेकान्तवाद वा स्याद्वादाच्या आधारे सत्याचे बहुआयामी स्वरूप मांडले. महावीरांच्या काळात विविध तत्त्वप्रवाह अस्तित्वात होते. काही जण नित्यवादी होते, काही उच्छेदवादी, तर काही अज्ञेयवादी. या सर्वांच्या विरोधात महावीरांनी मध्यममार्गी अनेकान्तवादी भूमिका मांडली. वस्तू आहेही आणि नाहीही; ती एका दृष्टीने व्यक्त आहे, तर दुसऱ्या दृष्टीने अव्यक्त आहे. यामुळे जैन तत्त्वज्ञानात ‘अवक्तव्य’ किंवा ‘अव्यक्त’ ही संकल्पना उदयास आली.

‘अव्यक्त’ म्हणजे अप्रकट, अनिर्दिष्ट, स्पष्ट न सांगता येणारे आणि ‘वाद’ म्हणजे तत्त्वज्ञानात्मक मत किंवा सिद्धांत. ‘अव्यक्त’ हा शब्द संस्कृतमधील ‘व्यक्त’ या शब्दाला ‘अ’ हा नकारार्थी उपसर्ग लावून तयार झाला आहे. अव्यक्तवाद हा पूर्णपणे स्वतंत्र जैन पंथ नसून, जैन तत्त्वज्ञानातील ज्ञान, भाषिक अभिव्यक्ती आणि सत्याच्या मर्यादांशी संबंधित एक विचारप्रवाह म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. जैन तत्त्वज्ञानानुसार वस्तूचे स्वरूप अनंतधर्मी असल्यामुळे कोणतेही एक विधान अंतिम सत्य मांडू शकत नाही; म्हणूनच काही प्रसंगी वस्तू ‘अव्यक्त’ राहते. अव्यक्तवादाची हीच मध्यवर्ती कल्पना आहे.

जेव्हा आपण एखाद्या वस्तूमध्ये ‘अस्तित्व’ (आहे) आणि ‘नास्तित्व’ (नाही) या दोन्ही परस्परविरोधी गुणांचा एकाच वेळी (सिमल्टेनिअसली) विचार करतो, तेव्हा ती वस्तू शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणे अशक्य होते. अशा स्थितीला जैन दर्शनात ‘अव्यक्त’ किंवा ‘अवाच्य’ (इनएक्स्प्रेसिबल) म्हटले जाते. उदा., एक घट किंवा माठ आपल्या स्वतःच्या द्रव्याच्या (मातीच्या) दृष्टीने ‘आहे’ (अस्ति), पण दुसऱ्या द्रव्याच्या (उदा., सोन्याच्या) दृष्टीने ‘नाही’ (नास्ति). जर कोणी विचारले की, तो घट किंवा माठ एकाच वेळी ‘आहे’ आणि ‘नाही’ असे कसे असू शकते? माठ हा ‘आहे’ असे म्हणणे योग्य आहे; कारण तो अस्तित्वात आहे. पण तो ‘नाही’ असेही म्हणता येते; कारण पूर्वी तो नव्हता आणि भविष्यात नष्ट होईल. त्यामुळे वस्तूचे स्वरूप सापेक्ष ठरते. याच ठिकाणी ‘अव्यक्त’ संकल्पना उदयास येते. वस्तूचे सर्व पैलू एकाच वेळी आणि पूर्णपणे व्यक्त करणे अशक्य असल्यामुळे ती काही प्रमाणात अव्यक्त राहते.

जैन स्याद्वादानुसार कोणतेही विधान सापेक्ष असते. म्हणून एका दृष्टीने वस्तू व्यक्त आहे, तर दुसऱ्या दृष्टीने अव्यक्त आहे. जैन दर्शनानुसार ‘सप्तभंगी’ सिद्धांत या विश्वातील प्रत्येक वस्तूला अनंत पैलू (धर्म) असतात. सामान्य माणूस सर्व पैलू एकाच वेळी पाहू किंवा सांगू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही सत्याचा पूर्ण बोध करून घेण्यासाठी स्याद्वाद अंतर्गत सात प्रकारची विधाने (सप्तभंगी नय) सांगितली आहेत. या सात प्रकारांपैकी अव्यक्तव्यम प्रकाराचे उपप्रकार खालीलप्रमाणे :

१. स्याद अव्यक्तव्यम : कोणत्यातरी प्रकारे अनिर्वचनीय. म्हणजे ‘कदाचित तो साप आहे’ आणि ‘कदाचित तो साप नाही’. असे पहिल्यांदा स्वतंत्रपणे आणि नंतर एकत्रितपणे म्हटल्यामुळे ‘ते नेमके काय आहे, हे सांगता येत नाही’, असे केलेले कथन म्हणजे स्याद अव्यक्तव्यम होय.

२. स्याद अस्ति अव्यक्तव्यम : कोणत्यातरी प्रकारे अस्तित्वात असलेला आणि अनिर्वचनीय. म्हणजे या कथनात ‘स्याद अस्ति’ हे कथन प्रधान आहे. पण त्यानंतर ‘स्याद नास्ति’ आणि ‘स्याद अस्ति नास्ति’ हे कथन आल्यामुळे ‘कदाचित तो साप आहे, पण कशा प्रकारे? हे सांगता येत नाही’. असे कथन केले जाते. यालाच स्याद अस्ति अव्यक्तव्यम म्हणतात.

३. स्याद नास्ति अव्यक्तव्यम : कोणत्यातरी प्रकारे अस्तित्वात नसलेला आणि अनिर्वचनीय. म्हणजे या कथनात ‘स्याद नास्ति’ हे कथन प्रधान आहे. पण त्यापूर्वी ‘स्याद अस्ति’ आणि त्यानंतर ‘स्याद अस्ति नास्ति’ हे कथन आल्यामुळे ‘कदाचित तो साप नाही. पण कशा प्रकारे? हे सांगता येत नाही’. असे कथन केले जाते. यालाच स्याद नास्ति अव्यक्तव्यम म्हणतात.

४. स्याद अस्ति-नास्ति अव्यक्तव्यम : कोणत्यातरी प्रकारे अस्तित्वात असलेला व नसलेला आणि अनिर्वचनीय. म्हणजे या कथनात ‘स्याद अव्यक्तव्यम’ हे कथन प्रधान आहे. पण त्यापूर्वी ‘स्याद अस्ति’, ‘स्याद नास्ति’ आणि ‘स्याद अस्ति-नास्ति’ हे तीन कथन असल्यामुळे ‘कदाचित तो साप आहे आणि कदाचित तो साप नाहीसुद्धा, पण कशा प्रकारे हे सांगता येत नाही’. असे कथन केले जाते. यालाच स्याद अस्ति-नास्ति अव्यक्तव्यम म्हणतात.

सृष्टी अनादी-अनंत आहे. कोणत्याही वस्तूचे पूर्ण सत्य एकाच वेळी शब्दांत न मांडता येणे म्हणजे ‘अव्यक्त’. अव्यक्त ही ज्ञानाची आणि भाषेची मर्यादा दर्शवणारी एक सापेक्ष पद्धत (स्याद्वाद) आहे.

संदर्भ :

  • Banarsidass, Motilal, Jain Philosophy of Non-Absolutism, Delhi, 1978.
  • Jaini, J. L. Outlines of Jainism, Cambridge, 1940.
  • Jaini, J. L. The Philosophy of the Jaina, Lucknow, 1916.
  • L. D. Institute of Indology, The Central Philosophy of Jainism, Ahmedabad, 1981.
  • कुलकर्णी, स. अ. ‘भारतीय दर्शनसंग्रह’, नागपूर, २०१२.
  • जोशी, ग. ना. ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास’ पुणे, २०१०.
  • ढाके, कृ. भा. ‘जैन तत्त्वज्ञान परिचय’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  • दीक्षित, श्रीनिवास हरी, ‘भारतीय तत्त्वज्ञान’, कोल्हापूर, २००६.
  • देशपांडे, दि. य. ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, पुणे, २००८.
  • पाटील, म. प. ‘अनेकांतवाद आणि स्याद्वाद’, औरंगाबाद, २०१५.
  • मेहता, मोहनलाल, ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २००२.

समीक्षक : सुनिलदत्त गवरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.