आयझॅक, ॲलेक (१७ जुलै १९२१ – २६ जानेवारी १९६७).
ब्रिटिश (स्कॉटिश) विषाणुशास्त्रज्ञ. आयझॅक यांनी झां लिंडनमन या स्वीस शास्त्रज्ञांसोबत इंटरफेरॉनचा (म्हणजे नैसर्गिक रित्या विषाणूंविरुद्ध लढणाऱ्या तत्वाचा घटकाचा) शोध लावला (१९५७). इंटरफेरॉन हा प्रथिनांचा एक संच असून प्रतिकारशक्तीच्या नियमनात व विषाणूंच्या विरुद्ध संरक्षणात त्याची महत्त्वाची भूमिका असते. इंटरफेरॉनचा उपयोग आता कितीतरी विषाणूं विरुद्ध होतो. उदा., हेपटायसिस-सी (Hepatitis C), मल्टीपल स्क्लेरोसिस (कर्कशीभवन; Multiple sclerosis) लढण्यासाठी तसेच कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो.
आयझॅक यांचा जन्म ग्लासगो, स्कॉटलँड येथे झाला. त्यांनी वैद्यकीय विषयातील पदवी ग्लासगो विद्यापीठातून घेतली मिळविली (१९५४). त्यांनी प्रशिक्षण झाल्यानंतर आपली कारकीर्द विषाणुशास्त्रात सुरू केली. प्रथम त्यांनी शेफील्ड विद्यापीठातील प्रा. स्टुअर्ट हॅरिस यांच्याबरोबर सुरुवात केली व नंतर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील वॉल्टर आणि एलिझा हॉल संस्थेमध्ये काम केले. ऑस्ट्रेलियामध्ये असताना त्यांनी विषाणूंच्या हस्तक्षेपा/व्यतिकरण संदर्भात अभ्यास केला. ऑस्ट्रेलियामधून इंग्लंडमधील उत्तर भागात परत आल्यावर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (एनआयएमआर – NIMR) मध्ये काम केले. एनआयएमआर ही ब्रिटनमधील एक प्रमुख संशोधन प्रयोगशाळा होती. पुढे त्यांनी लंडन येथील वर्ल्ड इन्फ्लुएंझा सेंटर मध्ये काम केले आणि पुढे ते या संस्थांचे संचालक झाले. आयझॅक यांनी इन्फ्लुएंझाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास करायला सुरुवात केली व एन्फ्लुएंझाचा शरीराने दिलेला प्रतिसाद याचाही त्यांनी अभ्यास केला.
शरीरातील कोणतीही पेशी इंटरफेरॉन बनवू शकते आणि विषाणू विरुद्ध प्रतिपिंड तयार व्हायच्या अगोदर ते विषाणूंचा सामना करतात.
पेशींमध्ये एका विषाणूंची (Interfering virus) वाढ दुसऱ्या विषाणूंमुळे (challenge virus) थांबते, ही गोष्ट बरीच वर्षे माहीत होती. ही प्रतिकारक्षमता वाढल्याची घटना नव्हती. परंतु उष्णतेने निष्प्रभ झालेले इन्फ्लुएंझा विषाणू हे संसर्गजन्य इन्फ्लुएंझा विषाणू किंवा वेगळ्या संबंध नसलेल्या व्हॅक्सिनी यांसारख्या विषाणूंवर परिणामकारक होते. एका प्रकारच्या विषाणूंनी दुसऱ्या प्रकारच्या विषाणूंना अडथळा आणण्याचे हे तंत्र तोपर्यंत माहीत नव्हते.
आयझॅक याना इन्फ्लुएंझा विषाणूंवरील संशोधनासाठी बेलाहाऊस्टन सुवर्ण पदक देण्यात आले. त्यांना १९६६ साली त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.
आयझॅक यांचे लंडन येथे निधन झाले.
संदर्भ :
- The Discovery of Interferon by A. Isaacs and J. Lindenmann .., http://brainimmune.com/the-discovery-of-interferon-the-first-cytokine-by-alick-isaacs-and-jean-lindenmann-in-1957/
- Alick Isaacs, From Wikipedia, The free encyclopedia, https://en.wikipedia.org/wiki/Alick_Isaacs
- Jean Lindenmann, From Wikipedia, The free encyclopedia, https://en.wikipedia.org/wiki/Jean_Lindenmann
- Joanna lyall, Jean Lindenmann (1924 – 2015), Obituary, the Pharmaceutical Journal, 3 March 2015,http://www.pharmaceutical-journal.com/opinion/obituary/jean-lindenmann-19242015/20067980.article
- Andrea Gawrylewski, Fifty Years With Interferon, April 1, 2007, The Scientist, http://www.the-scientist.com/?articles.view/articleNo/24878/title/Fifty-Years-with-Interferons/
समीक्षक – रंजन गर्गे