मेक्काँकी, आल्फ्रेड थीओडोर : (१८६१ — १७ मे १९३१).

ब्रिटीश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मेक्काँकी नावाचे आगर विकसीत केले. मेक्काँकी आगर हे निवडक माध्यम आतड्यातील रोगजंतूंच्या निदानाकरिता वापरले जाते. त्यांच्या जन्मावेळी मेक्काँकी असे आडनाव होते परंतु १८८१ पासून त्यांच्या कागदपत्रांवरून व प्रकाशित पेपरवरून मेक्काँकी असे आडनाव झाल्याचे दिसून येते.

मेक्काँकी यांचा जन्म वेस्ट डर्बीया गावात झाला. त्यांचे वडील अँड्र्यू हे चर्चमधे मिनिस्टर होते. त्यांच्या आईचे नाव मार्गारेट होते. मेक्काँकी लिव्हरपूलमधल्या शाळेत मॅट्रिक झाले (१८८०). शालेय शिक्षणानंतर त्यांनी केंब्रिजमधे वैद्यकीय पदवी घेतली (१८८९). सुरवातीला त्यांनी बर्मिंगहॅमया गावात दवाखाना सुरू केला. तेथे प्रकृती साथ देईनाशी झाल्यावर त्यांनी गाईज रुग्णालयात (Guy’s Hospital) जीवाणुशास्त्रात विशेष प्राविण्यासाठी प्रवेश केला (१८९७). तेथे त्यांनी आतड्यांना रोगबाधा करणाऱ्या जीवाणूंची वाढ करण्यासाठी माध्यम विकसित करायला सुरवात केली. हे माध्यम त्यांच्या नावाने ओळखले जाते. नंतर त्यांची लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटीव्ह मेडिसीनमधे नेमणूक झाली (१९०१). तेथे त्यांचे माध्यमावरचे (medium) काम पूर्ण झाले. आतड्यातील पेशींवर जीवाणूंचा हल्ला झाल्याने कॉलरा, बॅसिलरी डिसेंट्री यांसारखे आजार होतात. या आजाराचे निदान वेळीच होऊन लवकर उपचार झाले नाहीत तर रोगी दगावण्याची शक्यता असते. रोगाचे कारण शोधण्यासाठी जुलाबातील जीवाणूंना प्रयोगशाळेतील पोषक माध्यमांवर वाढवावे लागते. मेक्काँकी यांनी अतिशय कल्पकतेने आणि जीवाणूंच्या विविध रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करून मेक्काँकी आगर हे माध्यम विकसित केले. या माध्यमातील लॅक्टोज ही शर्करा जीवाणूंनी फर्मेंट केली तर त्यापासून आम्ल तयार होते. माध्यमात असलेल्या न्यूट्रल रेड या रंजक द्रव्यामुळे आम्लाच्या सान्निध्यात जीवाणूंच्या वसाहती गुलाबी रंगाच्या दिसतात. जे जीवाणू लॅक्टोज फर्मेंट करत नाहीत ( उदा. कॉलरा, हगवण) त्यांच्या वसाहती गुलाबी रंगाच्या नसतात.

पहिल्या महायुद्धात घोड्यांचा वापर तोफा ओढण्यासाठी आणि सैनिकांचे वाहन म्हणून केला जात असे. युद्धात जखमी झालेल्या घोड्यांना धनुर्वात (Tetanus) होणे ही एक मोठी समस्या होती. मेक्काँकी यांनी धनुर्वाताचा बंदोबस्त करणारं अँटीसीरम (Antiserum) तयार केले. या अँटीसीरमचा वापर करून ब्रिटीश फौजांनी घोड्यांचे जीव वाचवले. अँटीसीरम तयार करण्यासाठी मेक्काँकी यांनी एक पागा तयार केली होती. तेथे ते घोड्यांची आपल्याच कुटुंबातली व्यक्ती असल्याप्रमाणे सेवा करत असत. त्यांना उत्तम बागकाम येत असे. जातीवंत गुलाब वाढवण्यात त्यांचा हातखंडा होता.

मेक्काँकी यांनी काहीही हातचे राखून न ठेवता घरी व प्रयोग शाळेत येणारे अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधकांना मुक्त हस्ताने आपले ज्ञान आणि माहिती दिली.

मेक्काँकी यांचे सरे परगण्यात निधन झाले.

कळीचे शब्द : #मेक्काँकीआगर #धनुर्वात #अँटीसीरम #

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे