ओडिशामधील एक आदिवासी जमात. या जमातीला तानला गौडा म्हणूनही ओळखले जाते. ही जमात प्रामुख्याने कंधमाल, बोलांगीर, नवरंगपूर आणि सुंदरगड या जिल्ह्यांमध्ये आढळते. २०११ च्या जनगणनेनुसार जमातीची एकूण लोकसंख्या २६,४०३ होती. कंधा गौडा हे नाव ‘कंधा’ (जमात) आणि ‘गौडा’ (गुरे राखणारा) या शब्दांपासून आले आहे. जमातीत प्रामुख्याने प्रधान, बेहरा, नायक, भोई इत्यादी आडनावे आढळतात. व्यक्तीचा वंश तिच्या आडनावावरून ओळखला जातो. या वंशगटांमध्ये कोणताही उच्च-नीच भेद पाळला जात नाही.
कंधा गौडा जमातीतील लोक द्रविड भाषाकुलातील ‘कुई’ ही भाषा बोलतात. कुई ही कंधमाल जिल्ह्यातील कंधा जमातीची मातृभाषा असून ते आपल्या समुदायात ती वापरतात. इतरांशी संवाद साधण्यासाठी ते ओडिया भाषा वापरतात.
गुरांची राखण करणे हा या जमातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्या बदल्यात कंधा मालक त्यांना दिवसातून दोन वेळचे जेवण आणि दरवर्षी प्रत्येक गायीमागे धान्याच्या स्वरूपात मोबदला देत. आजही जमातीची उपजीविका पशुपालन आणि शेतीवर अवलंबून असल्याचे दिसून येते. हे लोक पारंपरिक झूम प्रकारची शेती करतात आणि गहू, भात ही मुख्य पिके घेतात. सोबतच ते मजुरी, वनउपज गोळा करणे, मासेमारी करणे इत्यादी कामे करतात. अलीकडे या जमातीतील लोक औद्योगिक कारखाने आणि खाणीमध्ये मजूर म्हणूनही काम करतात. तसेच शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्येही या जमातीचे लोक कार्यरत आहेत.
कंधा गौडा पुरुषांची पारंपरिक वेशभूषा धोती, गमछा आणि लुंगी अशी असते. अलीकडे बाहेर जाताना ते सदरा, पायजमा असे आधुनिक प्रकारचे कपडेही वापरतात. विशेष प्रसंगी ते डोक्यावर पागोटे (फेटा) बांधतात. महिला पारंपरिक जाड हातमागाच्या साड्या, पोलक्यासह किंवा पोलक्याशिवाय परिधान करतात; कानातले, नथ, हार, चांदीचे व काचेच्या मण्यांचे दागिने तसेच केसांमध्ये पिन वापरतात.

कंधा गौडा लोक मुख्यत: आयताकृती आकाराच्या लाकडी, कमी उंचीच्या, उतरत्या छपराच्या घरामध्ये राहतात. घरांच्या भिंती लाकडी फळ्या किंवा बांबूंच्या बनवून त्यावर मातीचा लेप दिलेला असतो. घरामध्ये सामान्यतः पुढे आणि मागे ओसरी, मधोमध एक झोपण्याची खोली आणि एक लहान स्वयंपाकघर असते. तसेच घरात धान्य साठवण करण्यासाठी माळा तयार केलेला असतो. घरांमध्ये घरगुती वस्तू अत्यंत साध्या असतात; जसे की, भोपळ्याची भांडी, लाकडाच्या, बांबूच्या व दगडी वस्तू, टोपल्या, मातीची व ॲल्युमिनियमची आणि लोखंडी भांडी. मुख्यत: त्यांच्या घरांची रचना मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सरळ रेषेत याप्रमाणे असते. गावात घर बांधण्यापूर्वी जमात प्रमुखाची परवानगी घेणे आवश्यक असते.
कंधा गौडा जमातीचे लोक शाकाहारी व मांसाहारी असून भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. ते ‘पेजा’ नावाचा रागीपासून बनवलेला पातळ पदार्थ सकाळच्या न्याहारीसाठी घेतात. तसेच तहान भागवण्यासाठी ‘साळप’ (ताड/खजूरसदृश वृक्ष) रस पितात.
कंधा गौडा जमातीमध्ये विवाहसबंधी नियम कडक पाळले जातात. रक्तसंबंधातील विवाह निषिद्ध असून एकसारखे आडनावे असलेल्या कुटुंबात विवाह होत नाही. त्यांच्यात एक पत्नीत्वाची प्रथा रूढ असून विशिष्ट परिस्थितीत पहिल्या पत्नीच्या परवानगीने दुसरे लग्न केले जाते. लग्नाचा विधी वराच्या घरी पार पडतो. समाजातील पुजारी विवाह विधी करतो. दोन्ही बाजूंनी मेजवानी दिली जाते; ज्यामध्ये म्हशीचे मांस आणि पारंपरिक मद्याचा समावेश असतो. विवाहित स्त्रिया विवाहाचे प्रतीक म्हणून ‘कैंचा’ (मण्यांचा एक प्रकार) पासून बनवलेली माळ घालतात. जमातीत वधूमूल्यास मान्यता असून ‘जौतुक’ (हुंडा) ही प्रथा प्रचलित आहे. हे रोख तसेच वस्तूरूपाने दिले जातात. गावपंचायतीच्या नियमांनुसार घटस्फोट होतो.

कंधा गौडा लोक पारंपरिक निसर्गदेवतांची पूजा करतात. ‘धरणी पेनू’ (धरणीमाता) ही त्यांची मुख्य देवता आहे. ‘बोद्राबली’ नावाच्या सामुदायिक देवतेचीही ते पूजा करतात. तसेच ग्रामदेवता, ठाकुराणी, ग्रामसेनी, बाराल देवी, शिव, विष्णू, त्रिनाथ, लक्ष्मी, पार्वती इत्यादी ग्राम आणि प्रादेशिक देवतांचीही ते पूजा करतात. पौष महिन्यात (डिसेंबर–जानेवारी) ते वर्षातून एकदा बाराल देवीची पूजा करतात. केंडू आणि पटुली या दोन झाडांच्या काठ्यांना देवत्व देऊन ते त्यांची पूजा जमातीमधीलच ‘देहुरी’ नामक पुजाऱ्याकडून किंवा त्याच्या अनुपस्थितीत घरातील प्रमुख व्यक्तीकडून करतात. केंडूची काठी पुरुष आणि पटुलीची काठी स्त्री मानली जाते. या काठ्या दरवर्षी अलौकिक शक्तीमुळे लांबीने वाढतात अशी त्यांची श्रद्धा आहे.
इतर धार्मिक विधींसाठी ब्राह्मण समाजातील पुजारी, तसेच देहुरी, झाकर, जानी यांसारखे धार्मिक कार्य करणारे लोक असतात. ‘दिशारी’ हा वैद्य आणि ज्योतिषी म्हणून काम करतो, तर ‘कालिसी’ हे शमन म्हणून ओळखले जातात. कंधा गौडा लोक दशहरा, नुआखाई, दोला पौर्णिमा, लक्ष्मीपूजा, गम्हा पौर्णिमा इत्यादी सण साजरे करतात. समाजात पूर्वजपूजेची परंपरा असून पूर्वजांचे आत्मे जेव्हा पूजेसाठी इच्छित असतात, तेव्हा ते स्वप्नात प्रकट होतात असे मानले जाते.
गाव आणि प्रादेशिक पातळीवर सर्व समाजांच्या प्रतिनिधींनी बनलेली एक पारंपरिक पंचायत व्यवस्था असते, तिला ‘समाज’ म्हणतात. पंचायतीच्या निर्णयांचे पालन समाजातील प्रत्येकजण करत असतो. प्रादेशिक पंचायत वर्षातून एकदा भरते. त्यामध्ये विविध बाबींवर चर्चा होते आणि पारंपरिक पद्धतीने न्यायनिवाडा केला जातो. दोषींना दंड म्हणून रोख किंवा वस्तूरूपात शिक्षा दिली जाते. गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी व्यक्तीला समाजातून बहिष्कृत केले जाते.
कंधा गौडा जमातीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुमारे एका तासाने मृतदेह घराबाहेर नेऊन त्याला पूर्ण स्नान घातले जाते. हे कार्य महिला नातेवाईक करतात. मृतदेहाच्या डोक्यावरील केस काढले जातात आणि त्यावर एरंडेल तेल लावून नवीन कापड गुंडाळले जाते. पुरुष आणि महिला दोघेही अंत्ययात्रेत सहभागी होतात. मृताला अग्नी दिली जाते. अंत्यविधीवरून परतताना नदी किंवा ओढ्यात स्नान केले जाते. मृत्यूनंतर अकरा दिवस दु:ख (सुतक) पाळले जाते. पहिल्या दहा दिवसांत दररोज मृत आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आणि अन्न-पाण्याचे अर्पण केले जाते. अकराव्या दिवशी मृत आत्म्याच्या शांततेसाठी कोंबडी किंवा बोकडाचा बळी देऊन अंतिम अर्पण केले जाते. पूर्वजांचे आत्मे (डुंबा) पुजाऱ्याकडून पूजले जातात. अंत्यसंस्कार विधीचा शेवट सर्व उपस्थितांच्या पायावर पाणी शिंपडून घराला मृत्यूच्या अशुद्धतेपासून मुक्त केल्याने होतो. संध्याकाळी मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून मोठा जेवणाचा कार्यक्रम केला जातो, ज्यात समाज आणि गावकरी सहभागी होतात.
संदर्भ :
- Ota, A. B.; Mohanty, Sarat Chandra; Mohanty, Sangita, Kandha Gauda, Bhubaneswar: Scheduled Castes & Scheduled Tribes Research and Training Institute, 2018.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
