गोलोम्बेक, दिएगो आन्द्रे : (२२ नोव्हेंबर १९६४). अर्जेंटिनियन जीवशास्त्रज्ञ व विज्ञान प्रसारक. त्यांनी ब्वेनस एअरीझ येथे विज्ञान सांस्कृतिक केंद्राची स्थापन केली आहे. ते संगीतातील पदवीधर असल्याने विज्ञान आणि कला यांचा मिलाफ व्हावा या दृष्टीने मुलांसाठी, मुलांच्याच मदतीने वैज्ञानिक साधने तयार करण्याचा आणि मुलांच्या मनात वैज्ञानिक संकल्पनांचे आकृतिबंध तयार होतील यासाठी विज्ञान सांस्कृतिक केंद्रात प्रयत्नशील आहेत.
गोलोम्बेक यांचा जन्म अर्जेंटिनाच्या ब्वेनस एअरीझ शहरात झाला. त्यांनी ब्वेनस एअरीझच्या नॅशनल कॉलेज ऑफ सान इसिद्रो विद्यापीठातून जीवशास्त्र विषयात विशेष प्राविण्यासह पदवी संपादन केली (१९८८). पुढे डॅनियल कार्डीनाली यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. मेलॅटोनिन संप्रेरकाचा जैविक घड्याळांवरील प्रभाव आणि केंद्रीय चेतासंस्थेतील गॅमा अॅमिनो ब्युटिरिक आम्लनिर्मिती (जीएबीए; GABA) प्रणालीशी संबंधीत त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पीएच.डी. पश्चात त्यांनी कॅनडातील टोरांटो विद्यापीठात तीन वर्षे संशोधन केले. त्यानंतर ब्राझीलच्या सान पाब्लो विद्यापीठात सहअध्यापक, सहप्राध्यापक, अतिथी प्राध्यापक व पुढे पूर्ण प्राध्यापक पदावर ते कार्यारत होते आणि समांतर संशोधन करीत राहिले. स्मिथ कॉलेज मॅसॅच्यूसेट्समध्ये संशोधक, शरीरक्रियाशास्त्राची प्रात्यक्षिके दाखवणारे प्रयोगशाळा अध्यापक, कालांतराने कोनीसेटमध्ये प्रमुख संशोधक अशी क्रमाने मोठी पदे आणि वाढत्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
गोलोम्बेक यांचे सस्तन प्राण्यांतील जैविक लयबद्धतेचे आकलन, संबंधित ग्रंथी आणि स्रावांचा अभ्यास यांवर संशोधन आहे. दृष्टिपटलावर प्रकाशाचा अभाव असला म्हणजे रात्र झाली ही संवेदना निर्माण होऊन तसा संकेत मेंदूकडे जातो. त्यामुळे पिनिअल ग्रंथीतून (तृतीयनेत्री ग्रंथी) मेलॅटोनिन संप्रेरक स्रवते. रात्री त्याचे जास्त प्रमाणात वाढून झोप येते. मेंदूतून स्रवणाऱ्या संप्रेरकांचा झोपेसारख्या नियमित काळानंतर पुन:पुन्हा होणाऱ्या क्रियांचाही त्यांनी अभ्यास केला. लहान शाळकरी मुलांना किमान आठ-नऊ तास झोपेची गरज असते, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच ते विद्यार्थी, युवा आणि प्रौढ जनसामान्यांमध्ये विज्ञान प्रसाराचे कामही करत असतात.
गोलोम्बेक यांचे जर्नल ऑफ सर्काडियन रिद्म्स, जर्नल ऑफ न्युरोसायन्स रिसर्च, फिजिऑलॉजिकल रिव्ह्यू, क्रोनोबायॉलॉजी इंटरनॅशनल, प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, जर्नल ऑफ पिनिअल रिसर्च यांसारख्या नियतकालिकांमध्ये लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांची सेक्सो, ड्रोग्स इ बायोलॉजिया, डीएनए : सारख्या युगप्रवर्तक शोधाचा परिणाम समजण्यासाठी पन्नास वर्षे म्हणजे काहीच नाही. (डीएनए : सिन कुएन्ता आन्योस नो एस नादा) अशी स्पॅनिश भाषेत बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या सर्व पुस्तकांच्या किमान दोन ते कमाल अठरा आवृत्त्या निघाल्या आहेत. ला नॅसिऑन या वृत्तपत्राच्या रविवार आवृत्तीत ते नियमितपणे विज्ञानविषयक स्तंभ लिहितात. त्यांना विज्ञान प्रसारासाठीचा कलिंग पुरस्कार आणि अर्जेन्टीनाचा कोनेक्स पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना जैविक घड्याळ आणि मेलॅटोनिन संप्रेरकासंबंधीच्या शोधांसंदर्भात दोन स्वामित्वहक्कही प्राप्त झाले आहेत.
गोलोम्बेक सध्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ किल्मीसमध्ये शरीरक्रियाशास्त्र आणि औषधशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच ते कोनीसेटमध्येही (नॅशनल सायंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च कौन्सिल) प्रमुख संशोधक पदावर कार्यरत आहेत. कोनीसेट ही अर्जेंटिनाची सरकारी विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील शीर्षस्थ संस्था असून ती अर्जेंटिनातील सर्व सार्वजनिक विज्ञान संस्थांचे, तसेच विद्यापीठांतील विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन कार्याचे नियंत्रण करते. तसेच ते मेलिना फर्मन फॉरवर्डिंग सायन्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत.
कळीचे शब्द : #जैविक लयबद्धता
संदर्भ :
- https://www.fundacionkonex.org/b2917-diego-golombek
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1887561/
- https://en.wikipedia.org/wiki/Diego_Golombek
- https://m-partners.facebook.com/CulturaNacionAr/videos/diego-golombek-en-tecn%C3%B3polis/4101968713248557/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
