संयुक्त संस्थानांच्या पूर्व भागात असलेल्या अॅपालॅचिअन पर्वतप्रणालीमधील पश्चिमेकडील विच्छेदित पठारी प्रदेश. न्यूयॉर्क राज्याचा पश्चिम व मध्य भाग, पेनसिल्व्हेनिया राज्याचा उत्तर व पश्चिम भाग, ओहायओ राज्याचा पूर्व भाग आणि वेस्ट
व्हर्जिनिया राज्याच्या उत्तर व पश्चिम भागांत या पठाराचा विस्तार झालेला आहे. उत्तरेकडील न्यूयॉर्कमधील मोहॉक नदीखोऱ्यापासून दक्षिणेस वेस्ट व्हर्जिनियाच्या दक्षिण भागातील कंबर्लंड पठारापर्यंत साधारणपणे ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत हे पठार पसरलेले आहे. पठाराची लांबी सुमारे ८०० किमी. असून क्षेत्रफळ सुमारे १,६२,००० चौ. किमी. आहे. वेस्ट व्हर्जिनियातील सर्वोच्च शिखर असलेल्या स्फ्रूस नॉब येथे पठाराची उंची १,४८० मी. इतकी आहे. त्याचा उतार सामान्यपणे वायव्येस आहे. अॅलेगेनी पठारी प्रदेशात प्रामुख्याने आद्र खंडीय हवामान आढळतो. या ठिकाणचा उन्हाळा सामान्यतः उबदार असून सरासरी तापमान २०° ते २८° दरम्यान असते. हिवाळा अत्यंत कडक आणि थंड असून येथील तापमान बऱ्याचदा उणे शुन्य अंशापर्यंत जाते. पठाराच्या उंचावरील भागांत, तसेच न्यूयॉर्क आणि पेनसिल्व्हेनियाच्या उत्तर भागात हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते. येथे वर्षभर नियमित पाऊस पडत असल्यामुळे हा प्रदेश सदाहरित आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
अॅलेगेनी पठाराची निर्मिती इ. स. सुमारे ३०० ते ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी झाल्याचे संशोधकांचे मत आहे. त्यावेळी हा भाग एका प्राचीन समुद्राचा तळ असून येथे गाळाचे खडक (वाळूचा खडक व शेल) साचत गेले. कालांतराने आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या भूखंडांची टक्कर होऊन जेव्हा अॅपालॅचिअन पर्वतरांग तयार झाली, तेव्हा या पठाराचा भाग वर उचलला जाऊन हा भाग एका सपाट छतासारखा वर आला.
अॅलेगेनी फ्रंटला लागूनच पश्चिमेस उंच उंच कटकांचा अॅलेगेनी पर्वत असून तेथेच अॅलेगेनी पठारी प्रदेश संपतो. अॅलेगेनी फ्रंट हा आग्नेय किंवा पूर्वाभिमुखी भृगु प्रदेश (तुटलेल्या कड्यांचा प्रदेश) आहे. अॅलेगेनी फ्रंट ही पूर्वेकडील रिज-अॅन्ड-व्हॅली अॅपालॅचिअन्स हा प्राकृतिक प्रांत आणि पश्चिमेकडील अॅलेगेनी पठार यांदरम्यानची सीमारेषा आहे. या अॅलेगेनी फ्रंटचा विस्तार मध्य पेनसिल्व्हेनियापासून पुढे मेरिलंड आणि पूर्व वेस्ट व्हर्जिनियापर्यंत झालेला आहे. उत्तरेकडील हिमाच्छादित आणि दक्षिणेकडील हिमाच्छादनविरहित अशी या पठाराची दोन भागांत विभागणी केली जाते. पठाराच्या उंचीत बरीच प्रादेशिक भिन्नता आहे. हिमाच्छादित भागातील उंची ३० मी. किंवा त्यापेक्षाही कमी असून हिमाच्छादनविरहित प्रदेशात ती ६० ते १२० मी. च्या दरम्यान आढळते.
अॅलेगेनी पठाराचा वेस्ट व्हर्जिनियापासून पुढे दक्षिणेकडे केंटकी व टेनेसी या राज्यांतील जो विस्तारित भाग आहे, त्याला कंबर्लंड पठार या नावाने ओळखले जाते. भूप्रदेशाच्या उत्थानामुळे अॅलेगेनी पठाराची निर्मिती झालेली झालेली आहे. हे मोठ्या प्रमाणावर विच्छेदन झालेले पठार असून नद्या व प्रवाहांच्या झीज कार्यामुळे उंच व तीव्र उताराच्या टेकड्या, उंच कटक, घळया, दऱ्या, सरोवरे अशा भूविशेषांची निर्मिती झालेली आढळते. वेगवेगळ्या कारकांच्या विच्छेदन कार्यामुळेच तेथे कॅटस्किल, अॅलेगेनी व इतर पर्वतरांगांची निर्मिती झालेली आहे. अॅलेगेनी, डेलावेअर व सस्क्वेहॅना या नद्यांनी या पठाराच्या उत्तर भागाचे, तर ओहायओ नदीप्रणालीने दक्षिण भागाचे जलवाहन केलेले आहे. वसाहतकाळात या पठारी प्रदेशात कोळशाचे साठे सापडल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वसाहतकरी आले. त्यामुळे अॅपालॅचिअनमधील या प्रदेशाचा पूर्वीचा एकाकी व दुर्गमपणा कमी झाला. पठारावर नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात असून या प्रदेशाचे अर्थकारण प्रामुख्याने दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर अवलंबून आहे. अॅलेगनी पठार प्रामुख्याने कठीण लाकडाच्या दाट अरण्यांनी आच्छादलेले आहे. अॅलेगेनी राज्य उद्यान, अॅलेगेनी राष्ट्रीय वन ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. या प्रदेशात गिरीभ्रमण, स्कीइंग (बर्फावरील खेळ), हौशी मासेमारी इत्यादींचा मनमुराद आनंद घेता येतो.
संदर्भ :
- Jedrziewski, Edward W., Life on the Allegheny Plateau, 2022.
- https://csmgeo.csm.jmu.edu/geollab/vageol/vahist/cumberland.html
- https://www.britannica.com/place/Allegheny-Plateau
समीक्षक : संतोष ग्यानिदास गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
