अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणाऱ्या मिसिसिपी नदीची एक महत्त्वाची उपनदी. तिची लांबी १,५४६ किमी., तर जलवाहन क्षेत्र ५,२८,१०० चौ. किमी. आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराजवळील ॲलेगेनी व मनाँगहीला या दोन नद्यांच्या संगमानंतरचा संयुक्त प्रवाह ओहायओ या नावाने ओळखला जातो. ओहायओ नदीच्या उगमाजवळची समुद्रसपाटीपासूनची उंची ३११ मी., तर मुखाजवळ ती ८९ मी. आहे. पेनसिल्व्हेनियातून प्रथम वायव्येस, त्यानंतर अलिक्वीपा (पेनसिल्व्हेनिया) ते हंटिंग्टन (वेस्ट व्हर्जिनिया) नैर्ऋत्येस, हंटिंग्टन ते सिनसिनॅटी (ओहायओ) पश्चिमेस आणि सिनसिनॅटीपासून नैर्ऋत्येस वाहत जाऊन कैरो (इलिनॉय) येथे ती पूर्वेकडून मिसिसिपी नदीला मिळते. आहायओ, इंडियाना, इलिनॉय या राज्यांच्या दक्षिण सरहद्दीवरून, तर वेस्ट व्हर्जिनिया आणि केंटकी राज्यांच्या उत्तर सरहद्दीवरून ही नदी वाहते. ओहायओ-वेस्ट व्हर्जिनिया यांदरम्यानची तसेच केंटकी राज्याची ओहायओ, इंडियाना आणि इलिनॉय या राज्यांशी असलेली सरहद्द या नदीच्या प्रवाहमार्गाला अनुसरून आहे. मिसिसिपीला इतर कोणत्याही उपनदीपेक्षा ही नदी अधिक पाणी पुरविते. पिट्सबर्ग ते व्हीलिंग (वेस्ट व्हर्जिनिया) यांदरम्यान नदीची दरी अरुंद असून तेथे तिची सरासरी रुंदी ०.८ किमी.पेक्षा कमी आहे. सिनसिनॅटी ते लूइसव्हिल (केंटकी) यांदरम्यानची तिच्या पात्राची रुंदी १.६ किमी.पेक्षा थोडी अधिक असून लूइसव्हिलच्या खाली ती त्यापेक्षा थोडी वाढलेली आढळते. उगमापासून मुखापर्यंत ही नदी फक्त २२२ मीटरने खाली उतरते. ओहायओ नदीला दक्षिणेकडून टेनेसी, कंबर्लंड, ग्रीन, केंटकी, लिकींग, बिगर सँडी, कनाव्हा या प्रमुख उपनद्या, तर उत्तरेकडून ग्रेट मिआमी, सामोटो, मस्किंगम या प्रमुख उपनद्या येऊन मिळतात.

ओहायओ नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ऋतूनुसार पाण्याच्या पातळीत होणारा चढउतार, तसेच अधूनमधून निर्माण होणारी पूरस्थिती यांमुळे जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात. इ. स. १७७२, १७७३, १८८९, १९१३, १९२७, १९३७, १९४५, १९६३ यावर्षी ओहायओ नदीला आलेल्या विनाशकारी महापुरांत नदीखोऱ्यात फार जीवित आणि वित्तहानी झाली होती. पूरनियंत्रण करण्यासाठी अमेरिकन शासनाने ठिकठिकाणी नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंती बांधल्या असून मार्गात वीस धरणे बांधून कालवे काढले आहेत. कालव्यांत जलपाशांचा उपयोग केला जात असल्यामुळे आवश्यकतेनुसार नदीतील पाण्याची पातळी वाढविली जाते किंवा कमी केली जाते. तसेच पाण्याची पातळी जलवाहतूकयोग्य अशी तीन मीटर ठेवली जाते. त्यामुळे अखंड नदीचा जलवाहतुकीसाठी उपयोग करणे शक्य झाले आहे. लूइसव्हिल येथील ओहायओ जलप्रपात (Falls of the Ohio) हे या जलमार्गातील प्रमुख अडथळे होते; परंतु तेथील चार किमी. लांबीच्या मार्गात जलपाशांची उभारणी करून पाण्याची पातळी सात मीटरपर्यंत नियंत्रित केली जाते. संयुक्त संस्थानांतील व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्या जाणाऱ्या नद्यांत मिसिसिपीनंतर आोहायओ नदीचा दुसरा क्रमांक लागतो. ओहायओ नदीच्या खोऱ्यात प्रमुख कोळसाक्षेत्रे आणि महत्त्वाची पोलादनिर्मिती केंद्रे आहेत. देशातील गजबजलेल्या औद्योगिक प्रदेशातून तसेच समृद्ध कृषिक्षेत्रातून ही नदी वाहते. दगडी कोळसा, खनिज तेल उत्पादने, पोलाद, निर्मिती वस्तू, कृषी उत्पादने, रसायने, फोडलेले दगड, रेती, वाळू इत्यादींची वाहतूक या नदीमार्गाने केली जाते. पिट्सबर्ग, अलिक्वीपा, सिनसिनॅटी, लूइसव्हिल, हंटिंग्टन, माउंट व्हर्नान (इंडियाना), कैरो ही ओहायओ नदीकाठावरील प्रमुख बंदरे आणि शहरे आहेत.

ओहायओ नदी – पिट्सबर्ग शहर

एकोणिसाव्या शतकात अ.सं.सं.च्या मध्य-पश्चिम भागाकडील प्रवासासाठीचा ओहायओ-मिसिसिपी हा प्रमुख अंतर्गत जलमार्ग होता. त्यावेळी सपाट तळाच्या होड्या (Barge) खालच्या दिशेने, तर बाष्पनौका दोन्ही दिशांनी वाहतूक करायच्या. पडाव ढकलण्यासाठी कर्षक नावेचा (Tug boat) वापर केला जाई. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत ओहायओ नदीमधून प्रदर्शन बोटी (Show boats) वारंवार चालविल्या जात.

रेने-रॉबर्ट कॅव्हेलियर आणि स्यूर दे ला सॉली या यूरोपीय समन्वेषकांनी १६६९ मध्ये पहिल्यांदा ही नदी पाहिल्याचे मानले जाते. उगमापासून खाली लूइसव्हिल येथील धबधब्याचा अडथळा येईपर्यंत त्यांनी या नदीपात्रातून प्रवास केलेला असावा. त्यावेळी शावनी व इतर इंडियन्स या नदीकाठावर राहत होते. अमेरिका खंडाच्या अंतर्गत भागाचा ताबा घेण्यासंदर्भात फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात १७५० च्या दशकात जो संघर्ष चालू होता, त्यावेळी डावपेचांच्या दृष्टीने या नदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. फ्रेंच आणि इंडियन यांच्यात १७६३ मध्ये झालेल्या  तहानुसार युद्ध समाप्त होऊन अंतिमत: या नदीकाठावरील प्रदेशाचा इंग्रजांनी निर्विवाद ताबा मिळविला. १७८७ च्या कायद्यानुसार हा प्रदेश वसाहतींसाठी खुला करण्यात आला. बहुतांश वसाहतकारांनी  नदीच्या खालच्या टप्प्यात वसाहती केल्या. १८२० मध्ये ओहायओ नदीत साठपेक्षा अधिक बाष्पनौका वाहतुकीसाठी कार्यरत होत्या. १८६५ मध्ये अमेरिकी नागरी युद्ध संपुष्टात आल्यानंतर कच्चा माल आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी ओहायओ नदी हा प्रमुख जलमार्ग बनला. एकोणिसाव्या शतकात हळूहळू बाष्पनौकांची जागा अधिक शक्तिशाली पडावांनी आणि कर्षक होड्यांनी घेतली.

ओहायओ नदीच्या खोऱ्यात दाट वनश्री आणि विविध वन्य प्राणिजीवन आढळते. नदीतील पाण्यात मासेमारी केली जाते. नागरी आणि औद्योगिक अपशिष्टे, शेतीसाठी वापरली जाणारी रसायने इत्यादींमुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण होताना दिसून येते. त्याचा परिणाम नदीतील परिसंस्थांवर होतो. प्रदूषण कमी करण्यासाठी ‘दि ओहायओ रिव्हर व्हॅली वॉटर सॅनिटेशन कमिशन’ ही संस्था कार्यरत आहे.

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा