संगीत विषयक प्रशिक्षण देणारे भारतातील एक प्रमुख स्वायत्त विद्यापीठ. याला ‘भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालय’ या नावानेही ओळखले जाते. या संस्थेची स्थापना लखनऊ येथे १६ एप्रिल १९२६ रोजी झाली. हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातील एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक पंडित विष्णु नारायण भातखंडे यांनी संगीतप्रेमी राय उमानाथ बली आणि तत्कालीन हिंदुस्थानातील संयुक्त प्रांताचे शिक्षणमंत्री राजराजेश्वर बली यांच्या सहकार्याने या संस्थेची स्थापना ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ या नावाने केली. पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी या संगीतविद्यालयाची स्थापना केली. घराणेशाहीच्या मक्तेदारीतून भारतीय संगीताला मुक्त करून संगीत शिक्षण अधिक व्यापक करणे तसेच भारतीय संगीत विकासाला चालना देणे, भारतीय संगीताशी संबंधित नृत्य, कला, संस्कृती, परंपरा याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणे हा ही या संस्थेच्या स्थापनेमागील संस्थापकांचा हेतू होता. २६ मार्च १९६६ रोजी उत्तर प्रदेश राज्य सरकारने या संस्थेला आपल्या आधिपत्याखाली घेऊन ‘भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालय’ असे नामकरण केले. संस्थेला २५ ऑक्टोबर २००० रोजी मानद विश्वविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला व २०२२ मध्ये स्वायत्त विद्यापीठ म्हणून याला घोषित करण्यात आले.

जगभरातील संगीत साधकांना नृत्य, नाट्य व गायन इत्यादी संगीतविषयक कलांचे प्रशिक्षण देऊन त्यांची प्रतिभा उंचावणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘नादाधीनम् जगत्’ (हे विश्वविद्यालय नाद आणि संगीताच्या आधीन आहे) हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. भारतासहित भारतीय उपखंडातील संगीत साधक येथे संगीत कलेच्या साधनेसाठी प्रवेश घेतात.

संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, कर्नाटकी संगीत, वाद्य संगीत आणि आधुनिक संगीताचे प्रशिक्षण दिले जाते. यासंबंधी विविध अभ्यासक्रम संस्था राबवते. ज्यामध्ये स्वर संगीत, ताल संगीत, नृत्य, संगीतशास्त्र, संशोधन आणि उपयोजित संगीत यांचा समावेश आहे. या विषयांतून पदविका, संगीत विशारद, संगीत अलंकार व संगीताचार्य या पदवी येथे दिल्या जातात. पदव्युत्तर संशोधक म्हणून शिक्षण घेण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावा लागतात. या संस्थेचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संगीतविषय सैद्धांतिक ज्ञानाचे आणि तांत्रिक कौशल्यांचे संतुलित शिक्षण देतात. जेणेकरून या क्षेत्रात पुढे व्यावसायिक रीत्या कारकीर्द घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. संगीत क्षेत्रातील विविध व्यावसायिक कंपन्या येथील विद्यार्थ्यांची योग्यता आणि कौशल्य पारखून त्यांना काम देतात.

संस्थेची ऐतिहासिक इमारत लखनऊ येथील कैसर बाग येथे आहे. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपहारगृह, वसतीगृह, अतिथींसाठी विश्रांतीगृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेच्या आवारात कलामंडपम् या नावाने सुसज्ज असे ५०० आसनक्षमता असलेले सभागृह आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, तमिळ, बंगाली आणि गुजराती इत्यादी विविध भाषांमधील ग्रंथांचा संग्रह आहे. प्रथितयश संगीतसाधकांच्या व कलाकारांच्या दुर्मीळ ध्वनिमुद्रिकांचा व ध्वनिचित्रफीतींचा संग्रहही संस्थेत उपलब्ध आहे. नृत्य प्रशिक्षणार्थींसाठी विस्तृत व सर्व सोयींनी युक्त निर्मितीगृह आहे.

या संस्थेमध्ये अनेक संगीताशी संबंधित सांस्कृतिक महोत्सव, कार्यशाळा, वैविध्यपूर्ण कार्यक्रम व चर्चासत्रे आयोजित केले जातात. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होतो. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशविदेशातील सुप्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण पाहण्याची संधी मिळते. तसेच त्यांच्याशी संवादही साधता येतो. विद्यार्थ्यांनाही या कलाकारांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळते. ‘भातखंडे संगीत समारोह’ हा संस्थेचा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे.

या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन अनेक प्रतिभावान कलाकारांनी आपली कारकीर्द घडवली आहे. त्यामध्ये नौशाद अली, तलत मेहमूद, अनूप जलोटा, व्ही.जी. जोग, के. जी. शिंदे, अमित मिश्रा, पहाडी संन्याल, सी.आर. व्यास, सुमती मुटाटकर, बेगम अख्तर, सरस्वती देवी इत्यादी प्रसिद्ध भारतीय गायक व संगीतकार तसेच नंदा मालिनी, सुजाता अत्तानायके, एडवर्ड जयकोडी, सुनील संथा, सनथ नंदसिरी इत्यादी प्रसिद्ध श्रीलंकन गायक व संगीतकार इत्यादींचा समावेश आहे.

सध्या भातखंडे संस्कृति विश्वविद्यालयाची धुरा कुलपती मांडवी सिंह, कुलसचिव सरोजिनी श्रीवास्तव आणि विभागाध्यक्ष (नृत्य) ज्ञानेंद्र दत्त वाजपेयी सांभाळत आहेत. या संस्थेत एस.एन. रातंजनकर, मोहनराव कल्लियानपुरकर, अहमद जान थिरकवा, बेगम अख्तर, पुरु दाधीय, श्रुती सडोलीकर, पूर्णिमा पांडे इत्यादी संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी आपले योगदान मार्गदर्शक स्वरूपात दिलेले आहे.

भारताचा सांस्कृतिक वारसा कलेच्या माध्यमातून जपण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी संस्था सातत्याने कार्यशील आहे.

संदर्भ : 

  • https://www.bhatkhandeuniversity.ac.in/hi/page/history

समीक्षण : वर्षा देवरुखकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.