सॅपिंडेसी कुलातील या सदापर्णी वृक्षाचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सिस आहे. तो मूळचा चीनमधील असून भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देशांत लागवडीखाली आहे.
लिचीचा वृक्ष डेरेदार असून तो १०–१५ मी. उंच वाढतो. खोडाची साल राखाडी व फांद्या तपकिरी असतात. पाने एकाआड एक, संयुक्त, १०–२५ सेंमी. लांब असून पर्णिकांच्या २–४ जोड्या असतात. पर्णिका लंबगोल असून वरचा पृष्ठभाग चकचकीत व गुळगुळीत, तर खालचा भाग निळसर हिरवा असतो. फुलोरा परिमंजरी प्रकारचा असतो. या परिमंजऱ्या १० किंवा त्यापेक्षा जास्त असतात. फुलोऱ्याचा व्यास १०–४० सेंमी. असतो. त्यावर १०० पेक्षा अधिक पांढरी, पिवळी किंवा हिरवट पांढरी व लहान फुले येतात. काही फुले एकलिंगी, तर काही द्विलिंगी असतात. निदलपुंज पाच व संयुक्त दलांचा असतो. दलपुंजात पाच मुक्त दले असून फूल उमलताच ती गळून जातात. नर-फुलात ७–९ मुक्त पुंकेसर असून ते मंडलावर रचलेले असतात. यात जायांग नसते. द्विलिंगी फुलांमध्ये जायांग दोन व ऊर्ध्वस्थ अंडपीचे बनलेले असते. या फुलांमधील पुंकेसरांचे परागकोश उघडत नाहीत. फळे घोसांमध्ये येतात. ती सु. २.५ सेंमी. लांब, हृदयाच्या आकाराची, गोल किंवा लंबगोल व आठळीयुक्त असतात. फळांची साल सुरुवातीला हिरवी असून नंतर लाल किंवा गर्द तपकिरी होते. साल पातळ, खरबरीत व काटेरी असते. फळांत पांढरा, सुवासिक व मांसल गर असतो. गर चवीला आंबट-गोड असतो. बी आठळीसारखी, एक व तपकिरी असते.
लिचीची पिकलेली रसाळ फळे खातात. फळाच्या १०० ग्रॅ. गरात सु. १५ ग्रॅ. शर्करा, ०.५–१ ग्रॅ. आम्ल, १–१.५ ग्रॅ. प्रथिने, ७२ मिग्रॅ. क जीवनसत्त्व, १५ ग्रॅ. ब-समूह जीवनसत्त्वे आणि १७० मिग्रॅ. पोटॅशियम इ. घटक असतात. यांशिवाय त्यात फॉस्फरस व आयर्न (लोह) असते. फळांतील गरापासून प्रतिऑक्सिडीकारके उपलब्ध होतात. मूळ, साल व फुलांचा काढा घशाच्या विकारावर गुळण्या करण्यासाठी वापरतात. फळे हवाबंद डब्यांतून पाठविता येत असल्यामुळे सर्वत्र उपलब्ध होतात.
लिची वृक्षाच्या तीन उपजाती आहेत. फुलांची रचना, फांद्यांची जाळी, फळांची वैशिष्ट्ये आणि पुंकेसरांच्या संख्येवरून या उपजाती केल्या आहेत. लिची चायनेन्सिस उपजाती चायनेन्सिस हिची व्यापारी लागवड करतात. तिला सामान्यपणे लिची म्हणतात. या वृक्षाच्या फांद्या पातळ व बारीक असतात. फळांवरील साल पातळ व काटेरी असते. ही जाती दक्षिण चीन, व्हिएटनाम आणि कंबोडिया येथे वन्य स्थितीत आढळते. लिची चायनेन्सिस उपजाती फिलिपीन्स ही फिलिपीन्समध्ये वन्य स्थितीत असून क्वचितच तिची लागवड करतात. तिच्या फांद्या पातळ व बारीक असतात. फळ लंबगोल असून त्यावर काटे असतात. लिची चायनेन्सिस उपजाती जावेन्सिस या जातीची केवळ मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत लागवड करतात. तिच्या फांद्या जाडसर असतात. फळाची साल पातळ, काटेरी असते.