मनुष्याच्या निरोगी स्थितीत श्वासपटलाखालील उदरपोकळीत असलेल्या द्रवाचे प्रमाण त्याहून अधिक वाढल्यास जलोदर झाला असे म्हणतात. उदर पोकळीला दोन च्छद (स्तर) असतात : उदर पोकळीस चिकटलेले पाश्र्व उदरच्छद व इंद्रियांना चिकटलेले आंतरांग उदरच्छद. या दोन्ही आवरणांमध्ये असलेल्या द्रवाचे प्रमाण वाढल्यास जलोदर होतो. हा द्रव पारदर्शक असून सर्वसाधारणपणे ४०― ५० मिलि. असतो. जलोदरात या द्रवाचे प्रमाण वाढून ते ३-४ लि. होते. हा द्रव दोन प्रकारचा असू शकतो : (१) पारस्राव (रक्तवाहिन्यांमधून अतिरिक्त दाबामुळे बाहेर पडलेला कमी घनतेचा आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असलेला द्रव) आणि (२) नि:स्राव (दुखापत किंवा दाह यांमुळे रक्तवाहिन्या फुटून बाहेर पडताना गळलेला द्रव). केशवाहिन्यांमधून बाहेर पडलेला रक्तद्रव (प्लाझ्मा) लसीका वाहिन्यांमार्फत पुन्हा रक्ताभिसरण संस्थेमध्ये आणला जातो. मात्र, जलोदरात लसीका वाहिन्यातील अडथळ्यांमुळे हा रक्तद्रव उदरपोकळीत साठवला जातो.
जलोदर झालेल्या व्यक्तीचे पाय

प्रामुख्याने यकृताच्या गंभीर विकारामुळे जलोदर होतो. त्यामुळे आतड्यापासून यकृतापर्यंत असलेल्या रक्तवाहिन्यांत (प्रवेशिका नीला) अतिरिक्त रक्तदाब निर्माण होतो. त्यावेळी रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. या रक्तवाहिन्यांतून होणारा पारस्राव उदरपोकळीत पाणी साठावे तसा साठला जातो. काही वेळा प्रथिनांच्या अभावी कुपोषणामुळे जलोदर होतो.

जलोदराचे दोन प्रकार आहेत :

(१) स्थानिक जलोदर : यात लसीका वाहिन्यांचा क्षय होतो. तसेच यकृत, मोठे आतडे, अंडाशय यांना कर्करोग झाल्यामुळे या प्रकारचा जलोदर होतो.

(२) सार्वदेहिक जलोदर : यकृत, हृदय आणि वृक्क यांच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे सार्वदेहिक जलोदर उदभवतो. यकृताला विषाणुसंसर्ग झाल्यास तसेच अतिरिक्त मद्यपान केल्यास यकृताकडे येणाऱ्या शीरेमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. काही वेळा यकृतकाठिण्यामुळे (लिव्हर सिर्होसीस) यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. हृदयविकारामध्ये रक्ताभिसरणात कमजोरता होऊन हृदयात अधिक रक्त साचले जाते, हृदयाभोवती असलेले आवरण कठीण होऊन हृदय आवळू लागते. त्यामुळेही जलोदर होतो. वृक्कविकारात रक्तातील प्रथिने मूत्रावाटे बाहेर पडून रक्तातील परासरणदाब कमी होतो व त्यामुळे वृक्कातून स्राव बाहेर पडतो आणि जलोदर होतो.

जलोदर झालेल्या व्यक्तीची शारीरिक स्थिती

जलोदरात उदरद्रव पिवळट असतो, क्वचित मारक अर्बुदामुळे तो लाल व रक्तमिश्रित असू शकतो. जलोदरामुळे पोट फुगलेले दिसते. पोटाप्रमाणे चेहरा, हाताची बोटे व पाय सुजलेले दिसतात. डोळे कावीळ झाल्याप्रमाणे पिवळे दिसतात. थकवा जाणवतो व माफक हालचालींनंतर श्वसनास त्रास होऊन धाप लागते. शारीरिक तपासणीमध्ये पोटावर टिचकी मारल्यास द्रवात निर्माण झालेल्या तरंगांमुळे रोगनिदान होते. सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनद्वारे तसेच द्रवाची जीवोतक परीक्षा करून जलोदर झाल्याची चाचणी करता येते.

जलोदर झाल्यावर वेगवेगळे उपचार केले जातात. अन्नातील मिठाचे प्रमाण कमी करतात, मूत्रल औषधे दिली जातात. स्रावाचे प्रमाण अधिक वाढल्यास सिरींजचा (अंत:क्षेपक सूईचा) वापर करून उदरपोकळीतील द्रव काढून टाकले जाते. मद्यपी रुग्णांना मद्यपान पूर्णपणे थांबविण्याचा सल्ला दिला जातो. या सर्व उपायांनी फरक न पडल्यास आणि रोगाची तीव्रता वाढत गेल्यास अशा रुग्णात ‘यकृत रोपण’ हा एकमेव उपाय असतो.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा