जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक उपशाखा. प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या सांस्कृतिक अवशेषांमध्ये प्राण्यांचे अवशेष सर्वांत जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे वनस्पतींप्रमाणे मानवी जीवनामध्ये प्राण्यांनाही महत्त्व आहे. माणसाची अन्नाची गरज भागविणे हा तर प्राण्यांचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग आहेच; पण त्याशिवाय मानवी जीवनात अनेक प्रकारे प्राणी उपयोगी पडतात. पुरातत्त्वीय स्थळी मिळालेल्या प्राणि-अवशेषांचा वापर करून मानव व प्राणी यांच्यामधील सहसंबंधांचा अभ्यास पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानात केला जातो.

सिंधू संस्कृतीच्या स्थळावरील गेंड्याचे हाड, करणपुरा, (राजस्थान).

उत्खनन करताना सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचे अवशेष निरनिराळ्या स्वरूपांमध्ये सापडतात. काही अवशेष जळालेले असतात, तर काही अवशेषांवर कापल्याचा खुणा आढळतात. बहुसंख्य वेळा प्राणि-अवशेष तुटक्याफुटक्या अवस्थेत असतात. जमिनीत गाडलेल्या अवस्थेत काही काळ राहिल्यावर प्राण्याच्या शरीरात असलेल्या मऊ भागांचा बहुतेक वेळा नाश होतो. फक्त हाडे, दात, शंखशिंपले व शिंग हे कठीण भाग टिकू शकतात. त्यांच्या स्वरूपातही काळानुसार बदल होतात. एके काळी जिवंत असणारा प्राणी मृत होतो अथवा माणसांनी मांस खाल्ल्यावर उरलेले भाग फेकून दिल्याने प्राण्यांची हाडे व दात जमिनीच्या थरांमध्ये समाविष्ट होतात. उत्खनन करताना बाहेर काढलेल्या प्राणि-अवशेषांमध्ये काही बदल घडले होते का, यांचा अधिक तपशिलात जाऊन मागोवा घेतला जातो.

मानवेतर प्राणी व मानव यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणे हा पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानाचा मुख्य गाभा आहे. मानव व प्राणी यांच्यातील परस्परसंबंधांविषयी काही विधान करण्यापूर्वी अवशेषांमध्ये आढळणाऱ्या गोष्टी या ते अवशेष निव्वळ हजारो वर्षे जमिनीत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या नाहीत याची अगोदर खात्री करून घेणे आवश्यक असते. याविषयीच्या सखोल अभ्यासाला जैवपुरातत्त्वविज्ञानात टॅफॉनॉमी असे म्हणतात. अश्मीभवन व जीवाश्मनिर्मितीच्या प्रक्रियेतील सर्व नैसर्गिक घटकांचा तपशीलवार अभ्यास टॅफॉनॉमीमध्ये केला जातो. अशा विशेष व मूलभूत संशोधनामुळे प्राचीन संस्कृतीबद्दल महत्वाचे निष्कर्ष काढण्यासाठी प्राणि-अवशेष उपयुक्त ठरतात. जमिनीत राहिल्यामुळे अथवा विवक्षित परिस्थितीत दीर्घकाळ राहिल्याने हाडांवर निर्माण होणाऱ्या विशिष्ट खाणाखुणा ओळखून त्यांनुसार कारणमीमांसा केली जाते.

शिकार करणे व अन्न गोळा करणे, वनस्पतींवर हुकूमत मिळविणे (शेती) व प्राण्यांना माणसाळविणे (पशुपालन) या प्रत्येक टप्प्यावर मानवी संस्कृतीची प्रगती होताना प्राणी वेगवेगळ्या प्रकारे माणसाच्या आयुष्याशी निगडित झाले होते. मानव म्हणून उत्क्रांत होत असल्यापासून लक्षावधी वर्षे प्राण्यांचा अन्न म्हणून वापर होत आहे. काही प्राणी आपण सोबतीसाठी अथवा आपल्या मानसिक गरजेपोटी जवळ बाळगतो. कुत्रा, पोपट, मांजर यांसारखे प्राणी आपल्या जीवनामध्ये विरंगुळ्याचे चार क्षण निर्माण करतात. तसेच बैल, रेडा, उंट, घोडा, गाढव अशा काही प्राण्यांच्या ताकदीचा आपण आपल्या कामांसाठी वापर करून घेतो. प्राचीन काळात यंत्रशक्ती नव्हती, तेव्हा या प्राण्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते, हे सहज लक्षात येते. माणसाच्या अवतीभवती वावरणाऱ्या या सर्व प्राण्यांचे अवशेष प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी मिळतात. अर्थात प्राण्यांचा जो काही उपयोग असेल, त्यानुसार अवशेषांचे स्वरूप असते. अन्नासाठी मारलेल्या पशूंच्या हाडांवर तीक्ष्ण शस्त्रांच्या खुणा आढळतात. जर हाडांचा, शिंगांचा अथवा दातांचा उपयोग अलंकार, हत्यारे अथवा निरनिराळी अवजारे बनविण्यासाठी केला असेल, तर तसे दर्शविणाऱ्या खुणा पुरातत्त्वीय प्राणिवैज्ञानिकांना मिळतात. या खुणांचा सखोल अभ्यास करून पुरातत्त्वीय संशोधनात फार महत्त्वाची माहिती मिळविता येते.

पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानामध्ये अनेक गोष्टींवर सविस्तर संशोधन केले जाते. तथापि यातील मुख्य भाग हा प्राचीन आहाराविषयी असतो. पुरातत्त्वीय स्थळाच्या ठिकाणी मिळणाऱ्या हाडांवरून तेथे कोणते पाळीव प्राणी व वन्य प्राणी मारून खाल्ले जात होते, ते सांगता येते. या प्राण्यांची संख्या, विशिष्ट प्राणिजातींचे प्राचीन संस्कृतीमधील महत्त्व, प्राणी नेमके कोणत्या कारणासाठी (मांस, लोकर, दूध, चामडी, कामकरी पशू) व कशा प्रकारे वापरले गेले, प्राण्यांचा तत्कालीन धार्मिक रितीरिवाजामधील सहभाग, प्राचीन काळातील अन्न व त्याच्याशी निगडित चालीरिती अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. तसेच एखाद्या प्राचीन ठिकाणी केलेली वसाहत ही वर्षाच्या कोणत्या काळात केली गेली होती, यावर पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान प्रकाश टाकू शकते. त्यासाठी प्राण्यांच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील कवठे या ताम्रपाषाण युगातील (इ. स. पू. २२०० ते १८००) ठिकाणी वसाहत फक्त मोसमी पावसाच्या काळात झाली असावी, असा पुरातत्त्वीय सिद्धांत होता. या ठिकाणी केलेल्या उत्खननात तीन-चार महिने वयाच्या रानडुकरांच्या पिलांची हाडे मिळाली. रानडुकरांमध्ये पिलांचा जन्म मे-जुलै महिन्यांत होतो. यावरून कवठे येथे सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात वसाहत होती, असे निश्चितपणे म्हणता आले.

मानव सोडून कोणताही प्राणी जरुरीपेक्षा जास्त किंवा मौजेखातर शिकार करीत नाही. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहता असे दिसते की, निव्वळ माणसाच्या हातून प्राण्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आणि आजही हे अव्याहतपणे चालूच आहे. त्यामुळे काही प्राणी विशिष्ट प्रदेशातून कायमचे लुप्त होतात. आज भारतात एकशिंगी गेंडा फक्त नावापुरता ईशान्य भारतात उरला आहे. परंतु सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो सर्व भारतभर असावा, असे दिसते. ओरिसामधील गोपालपूर या नवाश्मयुगीन ठिकाणी तसेच राजस्थानमधील करणपुरा आणि गुजरातमधील शिकारपूर या सिंधू संस्कृतीच्या स्थळामध्ये एकशिंगी गेंड्याची हाडे मिळाली. अशा प्रकारे पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानातील पुराव्यांचा वापर करून प्राचीन काळातील वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेता येतो.

संदर्भ :

  • Joglekar, P. P. ‘Humans and Animals – Archaeozoological Approachʼ, Gayatri Sahiyta, Pune, 2015.
  • Joglekar, P.P. & Goyal, Pankaj Animal Husbandry and Allied Technologies in Ancient India from Prehistorical to Early Historical Times, New Delhi, 2015.
  • Reitz, E. & Wing, E. Zooarchaeology, Cambridge, 2008.
  • जोगळेकर, प्रमोद आणि थॉमस, पी. के. ‘पुरातत्त्वीय प्राणिशास्त्र : एक उपयुक्त ज्ञानशाखाʼ, संशोधक, १९९३.

समीक्षक : सुषमा देव