महाराणी जिजाबाई (करवीर) : (१७१८ ? – १७ फेब्रुवारी १७७३). कोल्हापूर (करवीर) छत्रपती घराण्याच्या धुरंधर प्रशासक, मुत्सद्दी आणि करवीर राज्याच्या ‘राजप्रतिनिधी’ म्हणून प्रसिद्ध. मराठा साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्यानंतर, करवीर राज्याचे सार्वभौमत्व आणि स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यात महाराणी जिजाबाई यांचे योगदान अतुलनीय मानले जाते. करवीरकर जिजाबाईंचा जन्म तोरगल (बेळगाव, कर्नाटक) येथील पराक्रमी शिंदे (नेवसेकर) घराण्यात झाला. तोरगल जहागिरीचे अधिपती नरसोजीराव शिंदे हे त्यांचे वडील आणि सीतांबा या त्यांच्या मातोश्री होत. जिजाबाईंच्या जन्माच्या अधिकृत तारखेची ऐतिहासिक दप्तरांमध्ये नोंद नाही. तथापि, इ. स. १७३१ मधील वारणा तहाच्या वेळी त्या १२ वर्षांच्या होत्या, या उल्लेखावरून त्यांचा जन्म साधारणपणे इ. स. १७१८-१९ च्या सुमारास झाला असावा.
तोरगलकर शिंद्यांनी कोल्हापूरच्या गादीला नेहमीच लष्करी व राजकीय सहकार्य केले होते. जिजाबाईंचे काका जिवाजीराव शिंदे हे मनोळी ठाण्याचे बलाढ्य सरदार होते. हा विश्वासाचा संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी आपली पुतणी जिजाबाईंचा विवाह इ. स. १७२६ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (१६९८-१७६०) यांच्याशी लावून दिला. हा विवाह मनोळी येथे संपन्न झाला. जिजाबाई या छत्रपतींच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांच्या अंगी असलेला तडफदारपणा आणि राजकीय प्रगल्भता यांमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारात आणि खाजगी जीवनात त्यांना अग्रस्थान लाभले. ‘शंभुसहस्रनाम’ या संस्कृत ग्रंथात त्यांचा गौरव ‘कांत्या कोटी सुभानूबिंब दुचिरम राणी जिजासेवेतम्’ (कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे दिव्य असणारी राणी) असा करण्यात आला आहे.
इ. स. १७३० मध्ये वारणाकाठच्या लढाईत कोल्हापूरच्या सैन्याचा सातारच्या सैन्याकडून पराभव झाला आणि संभाजी महाराजांचे कुटुंब सातारकरांच्या हाती सापडले. या परिस्थितीनंतर १३ एप्रिल १७३१ रोजी दोन्ही राज्यांत ऐतिहासिक ‘वारणेचा तह’ झाला. या तहाच्या अत्यंत क्लिष्ट वाटाघाटीत राणी जिजाबाईंनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. या तहानुसार दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित होऊन कोल्हापूरच्या स्वतंत्र अस्तित्वाला साताऱ्याने अधिकृत मान्यता दिली.
इ. स. १७४० मध्ये कोल्हापूरच्या सीमांवरील पाळेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि सातारकरांशी सलोखा वाढवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि राणी जिजाबाई साताऱ्यास गेले. याच काळात पुण्यात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली होती. या मुक्कामात पेशवे नानासाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात एक ‘१२ कलमी गुप्त करार’ झाला. सातारचे छत्रपती शाहू महाराज यांना संतती नसल्याने, त्यांच्या निधनानंतर सातारा व कोल्हापूर या दोन्ही गाद्या एकत्र करून संभाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे एकछत्र स्वामी करावे आणि पेशव्यांनी त्यांचे सेवक म्हणून काम करावे, अशी या करारातील मुख्य अट होती. जिजाबाईंनी पेशवे नानासाहेबांना आपला ‘भाऊ’ मानून या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला होता.
इ. स. १७४९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या निधनासमयी सातारचा वारसाप्रश्न गंभीर बनला. महाराणी ताराबाईंनी रामराजे यांचे नाव पुढे केले, तर शाहू महाराजांच्या राणी सकवारबाई यांनी कोल्हापूरच्या संभाजी महाराजांना साताऱ्याचे तख्त काबीज करण्यासाठी गुप्त आमंत्रण दिले. संभाजी महाराज साताऱ्याला जाण्यास निघाले, परंतु राणी जिजाबाईंनी पेशव्यांच्या लष्करी पाठिंब्याशिवाय पाऊल टाकणे धोक्याचे ठरेल, हे ओळखून त्यांना रोखले. पुढे जिजाबाईंचाच अंदाज खरा ठरला. पेशवे नानासाहेबांनी संभाजी महाराजांबरोबरचा गुप्त करार धुडकावून ४ जानेवारी १७५० रोजी रामराजे यांना सातारच्या गादीवर बसवले. कारण मरतेसमयी शाहू महाराजांनी नानासाहेबांना दोन सनदा दिल्या होत्या. त्यात दत्तकाच्या बाबतीत ‘कोल्हापूरचे करू नये’ अशी एक महत्त्वाची अट होती, त्यामुळे पेशव्यांनी कराराकडे दुर्लक्ष केले. या विश्वासघातानंतर जिजाबाईंनी पुण्याच्या दरबारातील अंतर्गत मतभेदांचा (नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ यांच्यातील वाद) फायदा उठवला. त्यांनी सदाशिवरावभाऊंना कोल्हापूर राज्याच्या पेशवाईची वस्त्रे देण्याची राजकीय खेळी खेळली. यामुळे पुण्याच्या पेशवाईत फूट पडण्याच्या भीतीने नानासाहेब पेशवे गडबडले आणि त्यांनी भाऊसाहेबांची समजूत काढून कोल्हापूरकरांना ‘आम्ही दोन्ही राज्यांचे पेशवे असून आपल्या आज्ञेबाहेर वागणार नाही’ असे लेखी आश्वासन दिले.
छत्रपती संभाजी महाराजांचे २० डिसेंबर १७६० रोजी टोपनजीकच्या माळावर (टोप संभापूर, ता. हातकणंगले) निधन झाले. संभाजी महाराजांच्या निधनानंतर पंचगंगा नदीच्या काठावर त्यांची छत्री (स्मारक) उभारण्याच्या जागेवरून करवीर पीठाचे शंकराचार्य आणि महाराणी जिजाबाई यांच्यात वाद झाला. तेव्हा जिजाबाईंनी कणखरपणा दाखवत तेथे स्मारक उभे केले. निधनाच्या वेळी छत्रपतींना संतती नव्हती. केवळ त्यांची सर्वांत धाकटी राणी कुसाबाई या गरोदर होत्या. कोल्हापूरची गादी रिक्त असल्याचे पाहून, पानिपतच्या युद्धात व्यग्र असलेल्या पेशवे नानासाहेबांच्या मनात कोल्हापूर राज्य पुणे दरबाराला जोडण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्यांनी इ. स. १७४० च्या कराराला हरताळ फासून कोल्हापूर राज्य जप्त करण्याचे आदेश दिले. विसाजी नारायण, सदाशिव अवधूत आणि उमाजी भोसले मुंगीकर यांच्या नेतृत्वाखाली ५ ते ६ हजार सैन्याचा वेढा कोल्हापूरला घालण्यात आला. राणी जिजाबाईंना केवळ पन्हाळा व रांगणा किल्ले देऊन दूरवर नजरकैदेत ठेवण्याचा पेशव्यांचा बेत होता. या संकटात महाराणी जिजाबाईंनी विलक्षण धैर्याने राज्याची सूत्रे हाती घेतली आणि स्वतःला ‘राजप्रतिनिधी’ घोषित केले. त्यांनी कारभारासाठी स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यावर खालील श्लोक होता :
“शंभू राजस्य भार्यायां जिजादेव्यां धरातले । बालेंदुरिववरद वर्धिष्णु मुद्रा भद्राविराजते ॥”
जिजाबाईंनी सुरुवातीला पेशव्यांची बहीण अनुबाई घोरपडे यांच्यामार्फत मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरल्यावर त्यांनी लष्करी आक्रमणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी जप्तीसाठी आलेल्या पेशव्यांच्या सैन्याशी वाटाघाटीचे नाटक करून त्यांना गाफील ठेवले आणि इ. स. १७६१ च्या सुरुवातीला अचानक आपल्या फौजेनिशी हल्ला चढवून पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याचा पराभव केला. पेशव्यांना शह देण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या निजामाशीही गुप्त संधान साधले. दरम्यान, राणी कुसाबाईंना मुलगी झाली, परंतु राज्य खालसा होऊ नये म्हणून जिजाबाईंनी राज्याला ‘पुत्र’ झाल्याची घोषणा केली. याच काळात २३ जून १७६१ रोजी पानिपतच्या धक्क्याने पेशवे नानासाहेबांचा मृत्यू झाला, ज्यामुळे कोल्हापूर जप्तीचा पेशव्यांचा डाव पूर्णपणे अपयशी ठरला.
पुढे राज्याला कायदेशीर वारस देण्यासाठी जिजाबाईंनी खानवटकर भोसले घराण्यातील शहाजी भोसले यांच्या बालकाला दत्तक घेण्याचे ठरवले, ज्यांचे नाव ‘शिवाजी’ (दुसरे) ठेवण्यात आले. या दत्तकविधानाला पुण्याचे नवीन पेशवे थोरले माधवराव यांची मंजुरी मिळवणे आवश्यक होते. इ. स. १७६२ मध्ये जिजाबाईंनी ‘तीर्थयात्रे’च्या निमित्ताने आपल्या सशस्त्र फौजेसह कोल्हापूर सोडले आणि त्या थेट जेजुरीस पोहोचल्या. याची माहिती मिळताच पेशवा माधवराव आणि रघुनाथराव (राघोबा) जेजुरीला आले. या भेटीत जिजाबाईंनी अत्यंत करारी बाणा दाखवत पेशव्यांना ठणकावले की, “जर तुम्ही माझ्या दत्तक पुत्राला आणि करवीरच्या गादीला मंजुरी देणार नसाल, तर मी कोल्हापूरला परत न जाता थेट काशीला निघून जाईन आणि तिथेच देह अर्पण करेन.” पानिपतनंतरच्या अस्थिर परिस्थितीत कोल्हापूरशी नवीन वैर पतकरणे परवडणारे नसल्याने माधवराव पेशव्यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि जिजाबाईंना पुण्यास येण्याचे आमंत्रण दिले. पुण्यात जिजाबाईंचा राजेशाही पाहुणचार झाला आणि वाटाघाटी यशस्वी झाल्या. २२ सप्टेंबर १७६२ रोजी पन्हाळगडावर शिवाजी (दुसरे) यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी म्हैसूरच्या हैदरअलीनेही नूतन छत्रपतींना ‘बाळसुंदर’ नावाचा हत्ती आणि वस्त्रभूषणे पाठवून मान्यता दिली.
राज्याभिषेकानंतरही सीमेवरील पटवर्धन, रास्ते आणि इचलकरंजीकर सरदारांचा उपद्रव सुरूच होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन पेशवा माधवरावाने कोल्हापूरच्या दरबारात पुण्याचा एक ‘कायमचा कारभारी’ नेमण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, जिजाबाईंनी राज्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हा प्रस्ताव ठामपणे फेटाळून लावला. कर्नाटकातील सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी चिकोडी आणि मनोळी या ठाण्यांवर पकड मजबूत केली आणि पेशव्यांशी इ. स. १७६१, १७६३ आणि १७६४ मध्ये महत्त्वाचे करार केले. कोकण किनारपट्टीवर सक्रिय असलेल्या ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच सत्तेच्या हालचालींवरही त्यांनी गुप्तहेरांद्वारे लक्ष ठेवले. पानिपत युद्धानंतर पोर्तुगीजांनी मराठ्यांचे सामर्थ्य कमी झाल्याचे पाहून १७६३ मध्ये मर्दनगड काबीज केला आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला, पण मराठ्यांच्या शिबंदीने त्यांचा यशस्वी प्रतिकार केला. इंग्रजांनी चाचेगिरीचे निमित्त पुढे करून २८ जानेवारी १७६५ रोजी सिंधुदुर्गला वेढा दिला. या अणीबाणीत जिजाबाईंनी पेशवे व पटवर्धनांकडे लष्करी मदत मागितली, परंतु अंतर्गत फंदफितुरी आणि दारूगोळ्याच्या कोठाराला लागलेल्या आगीमुळे पुरेशा शस्त्रबळाअभावी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. जिजाबाईंना इंग्रजी सत्तेच्या धोक्याची पूर्ण जाणीव होती. पुढे जिजाबाईंच्या विनंतीवरून पोर्तुगीज व्हाईसरॉय कौंट द एग यांनी इंग्रजांशी मध्यस्थी केली. १६ जानेवारी १७६६ रोजी १४ कलमी तहानुसार इंग्रजांनी कोल्हापूरकरांना हा किल्ला परत केला.
महाराणी जिजाबाई यांनी आपल्या राज्यात प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या म्हणून अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी लोककल्याणकारी सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या प्रशासनाचा मुख्य केंद्रबिंदू हा जनतेचे सुख आणि समृद्धी हाच राहिलेला दिसतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर, सतीसाठी जबरदस्ती करणाऱ्यांवर आणि सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या गुन्हेगारांवर त्यांनी कठोर कायदेशीर निर्बंध लादले. गरीब व गरजू कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी थेट राजकोषातून आर्थिक मदत देण्याची अभिनव प्रथा सुरू केली. याशिवाय, कृषी व्यवस्थेचा विकास आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण करवीर प्रांतात ठिकठिकाणी नवीन विहिरी, तळी आणि पाण्याचे मोठे तलाव खोदण्याचे महत्त्वाकांक्षी लोककार्य हाती घेतले. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अनेक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांचा भव्य जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे, राजकीय संकटाच्या व अणीबाणीच्या काळात करवीरच्या छत्रपती गादीशी अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावान सरदारांना नवीन इनाम, जहागिरी व अधिकृत सनदा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. लोककल्याण, न्याय आणि लोकसंग्रह या गुणांच्या बळावर त्यांनी प्रजेच्या मनात मातृवत् स्थान निर्माण केले.
किल्ले पन्हाळगड (कोल्हापूर) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- आठल्ये, वि. अ., ‘कोल्हापूर राज्याचे सातारा व पुणे दरबाराशी संबंध’, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, २००७
- गावडे, बा. ग., ‘जिजाबाईकालीन कोल्हापूर राज्य’, शिवाजी विद्यापीठ, (एम. फिल. प्रबंध), कोल्हापूर, २००८.
- पवार, आप्पासाहेब., ‘जिजाबाईकालीन कागदपत्रे’, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, १९७८.
- श्रीखंडे, क. वि., ‘कोल्हापूर छ्त्रपती दुसरे शिवाजी’, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, द्वितीय आवृती, २०२०
समीक्षक : राहुल मगर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
