(व्हीस्यूव्हिअनाइट). एक दुर्मीळ खनिज. नेसोसिलिकेट [SiO4] आणि सोरोसिलिकेट [Si2O7] रचना या खनिजात एकत्रित असतात. या खनिजाला १७९६ मध्ये हॉय (Haüy) या फ्रेंच खनिजवैज्ञानिकाने ‘आयडोक्रेज’ नाव दिले. परंतु १७९५ मध्ये जर्मन भूवैज्ञानिक ए. जी. व्हेर्नर यांना इटलीतील व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या प्राचीन उद्रेकांमध्ये ते प्रथम सापडले, म्हणून त्यांनी या खनिजाला ‘व्हीस्यूव्हिअनाइट’ (Vesuvianite) असे नाव दिले. हेच नाव जागतिक स्तरावर अधिकृत शास्त्रीय नाव म्हणून वापरले जाते.

गुणधर्म : आयडोक्रेजची रासानिक संरचना Ca10(Mg,Fe)2Al4[Si2O7]2[SiO4]5(OH,F)4. त्याच्या संरचनेत इतर घटकांना सामावून घेण्याची आणि रासायनिक बदलांची कमालीची लवचीकता असते. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, मँगॅनीज, बोरॉन, टायटॅनियम, फ्ल्युओरीन आणि पाण्याचे प्रमाण बदलत्या स्वरूपात आढळते. साधारणत: ते हिरव्या रंगात आढळते. परंतु खनिजांच्या उपलब्धनुसार ते पिवळसर तपकिरी, निळा आणि गुलाबी लाल रंगाचेसुद्धा असते. चतुष्कोनीय स्फटिक प्रणालीत ते खनिज स्तंभ आकारात, सामान्यत: प्रचिनाकार, कधीकधी प्रसूच्याकार अथवा भरीव स्वरूपात सापडते. पुष्कळदा प्रचिनाच्या फलकांवर उभ्या रेखा असतात. अनेक प्रचिनांचे व प्रसूच्यांचे संयोग असलेले स्फटिकही आढळतात. ते कित्येक इतर खनिजांचे विविध फलक एकत्र जुळून झाल्यासारखे दिसतात, म्हणून आकार व मिश्रण या अर्थांच्या दोन ग्रीक शब्दांवरून आयडोक्रेज असे नाव दिले गेले. कधीकधी ते कणांच्या किंवा संपुंजित स्वरूपातसुद्धा आढळतात. त्याचे काठीण्य ६-७ असून विशिष्ट गुरुत्व ३.४ आहे. कमी शंकूकार ते अनियमित तुटणारे ते ठिसूळ खनिज काचेसारखी अथवा राळेसारखी (रेझीनस) चमक दाखवते. दुधी काचेप्रमाणे पारभासी. कमी प्रतीचे भंजन दाखवणाऱ्या यावरील रेषा रंगहीन अथवा पांढऱ्या असतात. प्रकाशकीय दृष्ट्या ते एकाक्ष असून ऋण चिन्हाचे आहे.

तांब्याच्या अशुद्धीने फिकट निळा किंवा निळा-हिरवा प्रकार म्हणजे सायप्रिन, मँगॅनीजच्या अशुद्धीने पिवळसर-तपकिरी प्रकार म्हणजे झॅंथाइट, कॅलिफोर्निया जेड म्हणजेच हिरव्या रंगाचे नेफ्राइट (गडद हिरव्या रंगाचा प्रकार जो हुबेहूब ‘जेड’ खनिजासारखा दिसतो) हे सर्व आयडोक्रेजच्या खनिजांमधील विविधता दाखवतात.
भूवैज्ञानिक उत्पत्ती : भूशास्त्रीय दृष्ट्या आयडोक्रेज हे संपर्क रूपांतरित खडकांचे (Contact Metamorphism) एक मुख्य निदर्शक खनिज आहे. जेव्हा गरम मॅग्मा (ज्वालामुखीचा रस) चुनखडी (Limestone) किंवा डोलोमाइट (Mg Limestone) सारख्या खडकांमध्ये शिरतो, तेव्हा उष्णता व खडकांच्या आंतरिक घटकांच्या रासायनिक प्रक्रियेतून त्याची निर्मिती होते. स्कार्न व चुनखडीच्या संसर्गी आणि प्रादेशिक रूपांतरित खडकात ते ग्रोसुलर गार्नेट, डायोप्साइड आणि वोलॅस्टोनाइट इ. खनिजांसह निसर्गात आढळते.
उपयोग : या सर्व खनिजांचा उपयोग दुर्मीळ रत्न म्हणून सगळ्यात जास्त होतो. काही प्रमाणात कोरीव शोभेच्या वस्तूही बनविल्या जातात.
आढळ : आताही इटलीतील व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीजवळ ते खनिज सापडते. याव्यतिरिक्त कॅनडा, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, केनिया, टांझानिया आणि रशियातील उरल पर्वतामध्येही ते सापडते. भारतामध्ये याचा आढळ अत्यल्प आहे.
संदर्भ :
- Deer, Howie and Zussman, Rock-Forming Minerals, 2ndedition By M.E. Fleet,The Geological Society, London, 2003.
- Read, H. H., Rutley’s Elements of Mineralogy, 24thedition, Londan, 1947.
समीक्षक : वडगबाळकर, श्रीनिवास कृष्णाजी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
