कस्तुरे, श्रीधर हरिदास  (९ मे १९३६ – ३ जुलै २०१४).

भारतीय वैद्यक. कस्तुरे यांनी महर्षी यूरोपियन रिसर्च युनिव्हार्सिटीद्वारे (एमयूआरयू; MERU) अमेरिकेत पंचकर्माचा प्रचार केला. तसेच त्यांनी परदेशात भिषक परीक्षेचा (फिजिशियन) अभ्यासक्रम सुरू करून नवी दिल्ली, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी काम केले. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रीय आयुर्वेद पुरस्कार दिला.

कस्तुरे यांनी आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथील महाविद्यालयातून आयुर्वेदामध्ये पदवी घेऊन (१९६८) जामनगरच्या गुजरात आयुर्वेद विश्वविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अध्यापक असतानाच बी.ए., एम.ए. (संस्कृत) तद्वत संस्कृत काव्यतीर्थ असेही शिक्षण त्यांनी घेतले.

वैद्य कस्तुरे यांनी गुजरात आयुर्वेद विश्वविद्यालयात कायाचिकित्सा आणि पंचकर्म या विषयांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. तसेच त्यांनी स्वित्झर्लंड मधील सेलीबर्ग येथील महर्षी यूरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटीद्वारे जगातल्या डॉक्टरांना व्याख्याने देऊन पंचकर्म शास्त्रामध्ये प्रशिक्षित केले. त्यांची जगभरात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणारी आयुर्वेदिक रोगप्रतिबंधक केंद्रे अनेक शहरातून कार्य करू लागली. आरोग्यतज्ज्ञांना तसेच वैद्यकशास्त्रातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून प्रकृती परीक्षण, पथ्यापथ्य संकल्पना व विशेष म्हणजे अवस्थानुरुप व व्याधीनुसार पंचकर्म चिकित्सा इत्यादीसंबंधी यशस्वी प्रयोग केले.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि अहमदाबादच्या शासकीय अखंडानंद आयुर्वेदिक रुग्णालयात वैद्य कस्तुरे कार्यरत होते.

महर्षी महेश योगी यांनी अमेरिकेमध्ये पंचकर्म चिकित्सालय सुरू करण्याची जबाबदारी १९८० च्या दशकात वैद्य कस्तुरे यांच्यावर सोपवली. आजही महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आयोवा (अमेरिका) येथे आयुर्वेदाचे शिक्षण देत आहे. वैद्य कस्तुरे यांनीच परदेशातील डॉक्टरांसाठी भिषकचा (फिजिशियन) अभ्यासक्रम सुरू केला. फिलिपीन्समधील मानिला शहरात झालेल्या महर्षी महेश योगींच्या संस्थेच्या जागतिक परिषदेमध्ये, अमेरिका, फिलिपीन्स, जपान व इतर देशांत त्यांनी आयुर्वेदावर व्याख्याने दिली.

वैद्य कस्तुरे यांना २००३ साली भारताचे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, पंडित रामनारायण शर्मा राष्ट्रीय आयुर्वेद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वैद्य कस्तुरे यांनी अहमदाबादेत स्वतःचे व्यवसायिक पंचकर्म केंद्र स्थापन केले व विविध वातव्याधी, पक्षाघात, बालपक्षाघात इ. अनेक वातव्याधींवर अभ्यंग, पिण्डस्वेद इत्यादींचे उपयोग अनेक रुग्णांवर यशस्वीपणे केले.

वैद्य कस्तुरे यांनी रुग्णालय अधीक्षक अधिष्ठाता तसेच गुजरात आयुर्वेद विश्वविद्यालयाच्या विविध समित्यांमध्ये कार्य केले. नंतर ते गुजरात शासनात आयुर्वेद संचालक होते. गुजरात राज्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि योग, निसर्गोपचार पद्धती यांचे निदेशक पद त्यांनी भूषविले. त्यांनी पंचकर्मातील आयुर्वेदिय पंचकर्म विज्ञान  हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथासाठी त्यांना मध्यप्रदेश आयुर्वेद अॅलकेडमी व उत्तरप्रदेश आयुर्वेद अॅगकेडमी यांनी ग्रंथ पुरस्कार प्रदान केले.

वैद्य कस्तुरे यांनी त्यांनी नाशिकच्या आयुर्वेद पत्रिकेत सातत्याने केलेले लिखाण विविध अंगी होते. वैद्य कस्तुरे यांचे हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती व इंग्रजी या पाच भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांनी या सर्व भाषांद्वारे आपले विचार मांडले. इतकेच नाही तर, १९६० ते १९७० या दहा वर्षांमध्ये ४० रहस्यमय कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. वैद्य कस्तुरे हे आयुर्वेद क्षेत्रातील व्यासंगी वक्तेसुध्दा होते.

 

संदर्भ :

समीक्षक – आशिष फडके