वामन केंद्रे

केंद्रे, वामन माधवराव : (१७ जानेवारी १९५७). महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्यदिग्दर्शक, नाट्यअभ्यासक, नाट्यप्रशिक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात दरडगाव (जिल्हा बीड) येथे झाला. त्यांचे वडील माधवराव हे भारूडकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी बीड येथील महाविद्यालयातून बी. ए.ची पदवी घेतली (१९७८). त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) येथून एक वर्षाचा नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला (१९७९). पुढे ते नाट्यशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी नवी दिल्ली येथे गेले. तेथे त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एन.एस.डी.) या संस्थेमधून नाट्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली (१९८२). एन.एस.डी.ने त्यांना केरळमधील स्थानिक लोकनाट्य आणि धार्मिक कर्मकांड व रंगभूमी यांच्या संशोधनार्थ दोन वर्षांची अधिछात्रवृत्ती (१९८२-८४) दिली. पुढे ते मुंबईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेत सहसंशोधक (रिसर्च असोशिएट) म्हणून सुमारे नऊ वर्षे कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी नाट्यदिग्दर्शन सुरू केले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील ती फुलराणी, लागी नजरिया, टेम्प्ट मी नॉट, दुसरा सामना, नातीगोती  आदी पन्नासहून अधिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ते नवी दिल्लीच्या एन.एस.डी. या राष्ट्रीय संस्थेत संचालक म्हणून कार्यरत होते.

वामन केंद्रे यांनी नेहमीच विविध सामाजिक विषय, समस्या त्यांच्या नाटकांतून हाताळल्या आहेत आणि आपल्या कलाकृतींतून अनेक अस्पर्शित, दुर्लक्षित असे जगण्याचे विविध पैलू प्रेक्षकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचवले आहेत. झुलवा (देवदासी आणि जोगत्यांच्या जगण्याचं चित्रण) आणि हिंदीतील जानेमन (तृतीयपंथीयांच्या जगण्याचे चित्रण) ह्या नाट्यकृती त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. वामन केंद्रेंनी ‘इप्टा’, मुंबई या संस्थेसाठी हिेंदीत मनोज मित्र लिखित राजदर्शन (अनुवाद : प्रतिभा अग्रवाल) याचे दिग्दर्शन केले. त्यांनी भासलिखित मध्यम व्यायोग  या नाटकाचे पिया बावरी (मराठी), मोहे पिया (हिंदी ) व माय लव्ह (इंग्रजी) अशा तीन प्रकारे रूपांतर केले. त्यांनी भारत व भारतेतर देशात सु. २५० नाट्य कार्यशाळांद्वारे व्यावसायिक रंगकर्मी आणि हौशी रंगकर्मीना नाट्यकलेविषयी प्रशिक्षण दिले. हे त्यांचे कार्य गेली पंधरा-वीस वर्षे सातत्याने चालू आहे. या प्रशिक्षणातून सुबुद्ध अभिनेत्यांची, दिग्दर्शकांची, नाट्य लेखकांची (नाटककारांची) आणि अभिकल्पकाची पिढीच निर्माण झाली असून त्यांनी प्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावरील रंगभूमीवर ठसा उमटविला आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क, न्यूजर्सी, बॉस्टन, होस्टन, फिलाडेल्फिया आदी शहरात कार्यशाळा आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना खास निमंत्रित केले होते. त्यांनी केवळ नाट्यशास्त्राच्या मुख्य प्रवाहावर स्वामित्व प्रस्थापिले नाही; तर समांतर रंगभूमीवरही वर्चस्व मिळविले आणि राष्ट्रीय रंगभूमी तसेच भारतीय रंगभूमी यांत नावीन्यपूर्ण प्रवतर्नाने एक निरंतर विशेष स्थान प्राप्त केले. त्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून एक बलशाली व्यासपीठ निर्माण करून संवेदनशीलतेने समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकांच्या (लोकांच्या) वेदना त्याद्वारे प्रक्षेपित केल्या, मांडल्या.

वामन केंद्रे यांच्या गौरी केंद्रे या पत्नी असून त्याही नाट्यकर्मी आहेत. त्यांना ऋत्विक हा मुलगा आहे.

केंद्रे यांना अनेक मानसन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२), मनोहर सिंग स्मृती पुरस्कार (राष्ट्रीय) (२००४), महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्य गौरव पुरस्कार, एम्. जी. रांगणेकर पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, रंग दर्पण पुरस्कार, नाट्य परिषद पुरस्कार, अल्फा गौरव सहयोग फाउंडेशन पुरस्कार, म. टा. सन्मान (२००६), दया पवार स्मृती पुरस्कार, भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार (२०१९), राष्ट्रीय नाट्य विद्यालयाकडून बी. व्ही. कारंथ पुरस्कार (२०१९) आदींचा समावेश होतो.

अलीकडे १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने निदेशक वामन केंद्रेच्या मार्गदर्शनाखाली ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या संकल्पनेवर आधारित आठवे थिएटर ऑलिंपिक २०१८मध्ये प्रथमच भारतात आयोजित केले होते. फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप संकल्पनेचा उद्देश रंगमंचाच्या माध्यमातून जगभरातील विभिन्न संस्कृतीच्या जनसमुदायास-विचारधारांना एकत्र आणणे हा होता. या रंगमंचीय ऑलिंपिकमध्ये तीस देशांच्या नाट्यकृतींचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये भारतातील सतरा शहरांमध्ये ४५० नाटके आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आणि २५० युवा-मंचाचे नाट्यप्रयोग झाले. या महोत्सवात सु. २५,००० कलाकार सामील झाले होते आणि तो जवळजवळ ५१ दिवस चालला होता.

समीक्षक : सु. र. देशपांडे