भटकी अवस्था सोडून वसाहतींमध्ये स्थिर जीवन जगू लागल्यावर विनिमय व अन्य मानवी जीवन व्यवहारांमध्ये ‘ऋण’ ह्या संकल्पनेचा उद्गम झाला असावा. मानवी व्यवहारांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असल्याने ‘ऋण’ संकल्पनेचे संदर्भ आदिम साहित्यापासून उपलब्ध असलेले दिसतात. ‘पुनर्देयत्वेन स्वीकृत्य यद्गृहीतम्|’ (परत करण्याच्या बोलीवर घेतलेले धन) अशी ‘ऋण’ ह्या संकल्पनेची व्याख्या शब्दकल्पद्रुमामध्ये केलेली आहे. ऋग्वेदामध्ये विविध देवतांना उद्देशून असलेल्या सूक्तांमध्ये (२.२७.४, २.२८.९) आदित्य, वरुण इत्यादी देवतांची स्तुती-प्रार्थना करताना आलेले ऋणमुक्तीचे किंवा त्यासाठीच्या याचनांचे संदर्भ दिसतात. अशा संदर्भांची संख्या पाहता ‘ऋण घेणे-देणे’ हा प्रकार ऋग्वेदकाळात अगदी सर्रास चालत असे असे दिसते. ऋग्वेद (१०.३४) नुसार जुगार खेळण्यासाठी कर्ज घेणाऱ्या (व हरलेल्या) माणसाला कर्ज देणाऱ्याकडे जाऊन सेवकत्व पत्करावे लागत असे. मात्र ‘ऋण’ फेडल्यावर त्या ऋणकोला त्या बंधनातून मुक्तीही मिळे, असे अथर्ववेदात (६.४६.३) स्पष्ट म्हटले आहे.

स्मृतिवाङ्मयामध्येही ऋण ह्या संकल्पनेची चर्चा अधिक विस्ताराने व विविध दृष्टिकोणांतून केली आहे. नारदस्मृतीच्या ‘ऋणादान’ प्रकरणात कुटुंबातील पिता-काका, पितामह, पुत्र इत्यादींनी केलेल्या कर्जाविषयी चर्चा दिसून येते. ऋण फेडण्याचे किंवा वसूल करण्याचे काम पित्याला जमले नाही, तर ते काम पुत्राकडून अपेक्षित असल्याचा निर्णय नारद आपल्या स्मृतीत नोंदवतात.

इच्छन्ति पितर: पुत्रान् स्वार्थहेतोर्यतस्ततः|
उत्तमर्णाधमर्णेभ्यो मामयं मोचयिष्यति||

अर्थ : ऋणकोकडून कर्ज वसूल करून किंवा धनकोचे कर्ज फेडून माझा पुत्र माझी सुटका करेल, अशा स्वार्थनिबद्ध हेतू/आशेमुळे पिता पुत्रप्राप्तीची अपेक्षा करतो.

शिवाय,
न पुत्रर्णं पिता दद्याद्दद्यात्पुत्रस्तु पैतृकम्|

अर्थ : पुत्राचे ऋण पित्याने फेडण्याचे कारण नाही, पण पुत्राने मात्र पित्याने केलेले कर्ज फेडले पाहिजे असेही नारदांनी सांगितले आहे. मनुस्मृती (८.१५९).

प्रातिभाव्यं वृथादानं आक्षिकं सौरिकं च यत्|
दण्डशुल्कावशेषं च न पुत्रो दातुमर्हति|

पित्याने जुगारासाठी (आक्षिकासाठी) अथवा मद्यपानासाठी(सौरिक-सुरापानासाठी) कर्ज काढले असेल, तर ते फेडायचे उत्तरदायित्व पुत्रावर नाही असे स्पष्ट म्हटले आहे. घेतलेल्या ऋणाची परतफेड करण्यासाठी कायिक सेवा करणे (दास्यत्व पत्करून शारीरिक मेहनत करून कर्ज फेडणे), मासिक पद्धतीने व्याज देणे, चक्रवाढ पद्धतीने व्याज देणे अथवा कर्जदाराच्या इच्छेनुरूप व्याज देणे अशा पद्धती मनुस्मृतीमध्ये नमूद केल्या आहेत. व्याज देण्यासंबंधी असलेल्या नियमांप्रमाणे व्याज घेण्यासंबंधीदेखील काही मते व निर्देश स्मृतिकारांनी दिलेले आहेत. व्याज घेताना ऋणकोचे वर्णव्यवस्थेतील स्थान पाहून व्याजाची रक्कम ठरवण्याचा निर्णय मनुस्मृतीने दिलेला आहे. कर्ज घेणारा ठरावीक मुदतीत कर्ज फेडू शकत नसेल, तर कर्जाचा करार पुन्हा करून व्याज फेडण्याची तरतूद व अन्य आनुषंगिक नियममन्वादी धर्मशास्त्रकार व कौटिल्य यांनी बनवलेले आहेत.

मानवी व्यवहारातील ह्या ऋण संकल्पनेचा विस्तार धर्मकल्पनांच्या अनुषंगानेही झाल्याचे दिसून येते. वैदिक संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये सर्व मानवांसाठी ‘ऋणत्रय’ ह्या संकल्पनेची मांडणी केली आहे. जन्माला येणारा माणूस हा ‘ऋषीऋण’, ‘देवऋण’ आणि ‘पितृऋण’ ह्या तीन ऋणांसोबत जन्मतो. ह्यापैकी ‘ऋषीऋण’ हे ब्रह्मचर्य-स्वाध्यायादी कर्तव्यांच्या पालनाने फेडावे; ‘देवऋण’ हे यज्ञादी विधींद्वारे फेडावे; व पितरांचे ऋण हे वंशवृद्धीद्वारे फेडावे असे ब्राह्मणग्रंथांत म्हटले आहे. व्यावहारिक अथवा भौतिक ऋणकल्पनेचा विस्तार असलेली ही कल्पना नीतिशास्त्र व श्रद्धाधिष्ठित धार्मिक कल्पनांशी जोडली गेल्याने ‘ऋण’ ह्या संकल्पनेच्या विस्ताराला वेगळाच आयाम मिळाल्याचे दिसून येते. ‘ऋणत्रयां’च्या संकल्पनेचा साक्षात संबंध भारतीय समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेल्या आश्रमव्यवस्थेशी आपसूकच जोडला गेला. समाजातील गरजू व्यक्तींना ऋण देणे ही समाजातील आर्थिक-भौतिक व्यवहार विश्वाची अपरिहार्यता आहे, हे लक्षात घेऊन स्मृतिकारांनी त्यानुसार नियम बनवले. पुढे धर्मकल्पनांची व्याप्ती जसजशी वाढत गेली, त्यासोबतच नैतिक व श्रद्धाविषयक कर्तव्यांची व कल्पनांची सांगड घालून समाज-नियमन व व्यक्तिनिष्ठ नीतिनियमांद्वारे नैतिक नियमनदेखील ह्या संकल्पनांतून साधले गेले. ईश्वरविषयक संकल्पनांतून व्यक्त होणारी कृतज्ञता, ज्ञान देणाऱ्या ज्ञाननिर्मात्या ऋषींविषयीचा ऋणिभाव, आणि वंशवृद्धी व मानवजातीची वृद्धी यांच्या रक्षणाचा वारसा व शिकवण हस्तांतरित करणाऱ्या आपल्या पूर्वजांविषयीची कृतज्ञता हे तीन कृतज्ञभाव अभिव्यक्त करणारी ‘ऋणत्रय’ ही उदात्त संकल्पना मानवी इतिहासाच्या आदिम कल्पनाविश्वातील श्रेष्ठ आविष्कारांपैकी एक म्हणावी लागेल.

संदर्भ :

  •  Kane, P. V. History of Dharmashastra : Ancient and Medieval Civil and Religious Law, Pune, 1930.
  •  Olivelle, Patrick, Dharmasūtras : The law codes of Āpastamba, Gautama, Baudhayana and Vasiṣṭ, New York, 1999.

समीक्षक – ललिता नामजोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा