(एंझाइम्स). सजीवांमधील रासायनिक अभिक्रियांचा (प्रक्रियांचा) वेग वाढवणाऱ्या संयुगांना विकरे किंवा वितंचके म्हणतात. सर्व सजीवांच्या पेशी विकरे तयार करतात. विकरांचे रेणू दुसऱ्या रेणूंमध्ये बदल घडवून आणतात. अशा रूपांतरित रेणूंबरोबर विकरे संयोग करून जटिल संरचना तयार करतात, अशा अभिक्रियांमधील विकरांमध्ये कोणताही बदल होत नाही आणि ती तयार झालेल्या उत्पादितापासून वेगळी होतात. अशा प्रकारे विकरे उत्प्रेरकांचे कार्य करतात. विकराचा एक रेणू एका मिनिटात त्याची सर्व कार्ये लाखो वेळा करू शकतो. विकरांद्वारे रासायनिक अभिक्रियांचा वेग हजार ते लाख पटीने वाढतो. बहुतांशी विकरे प्रथिने आहेत. मात्र काही रिबोन्यूक्लिइक आम्लांचे रेणूही विकरे म्हणून कार्य करतात. विकरे नसल्यास सजीवांतील रासायनिक अभिक्रिया एकतर खूप सावकाश घडतील किंवा घडणार नाहीत. विकरांशिवाय जीवन शक्य होणार नाही.

मनुष्याच्या शरीरात विकरांचे हजारो प्रकार असतात. प्रत्येक प्रकारची विकरे विशिष्ट कार्य करतात. विकराशिवाय एखादी व्यक्ती पाहू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, श्वसन करू शकत नाही किंवा अन्नपचन करू शकत नाही. वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण ही प्रक्रिया विकरांमुळे घडून येते. अनेक विकरे जटिल संयुगांचे रूपांतर लहान-लहान तुकड्यात करतात, तर इतर काही विकरे लहान-लहान संयुगांपासून जटिल संयुगे तयार करतात. अनेक विकरे पेशींमध्ये तयार होतात आणि पेशींमध्ये कार्य करतात. परंतु काही विकरे अन्यत्र पोहोचून कार्य करतात. उदा., स्वादुपिंडाद्वारे लायपेज नावाचे विकर स्त्रवते, पण ते लहान आतड्यात वाहत येते आणि मेद पदार्थांचे विघटन करते.

जेम्स बी. समनर या अमेरिकन वैज्ञानिकाने विकर प्रथम स्फटिकांच्या स्वरूपात मिळवले. त्यांनी १९२६ साली घेवड्यांपासून युरियेज विकराचे निष्कर्षण केले आणि विकरे ही प्रथिनांचे रेणू असतात हे दाखवून दिले. १९६९ साली वैज्ञानिकांनी रिबोन्यूक्लिएज हे विकर ॲमिनो आम्लांपासून संश्लेषित केले. हे विकर रिबोन्यूक्लिइक आम्लाचे विघटन ॲमिनो आम्लांच्या रेणूंमध्ये करते. सध्या वैज्ञानिक निसर्गात न आढळणाऱ्या अभिक्रिया करू शकतील, अशी विकरे तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संरचना : विकरांचे रेणू अतिशय सूक्ष्म असतात. मात्र, वेगवेगळ्या संशोधनातून असे आढळले आहे की विकरांचे आकार व आकारमान वेगवेगळे असते. निरनिराळ्या वनस्पती व प्राणी यांच्यातील विकरांच्या प्रथिनांची संरचना वेगवेगळी असली, तरी त्यांची कार्यपद्धती सारखीच असते. विकरांची संरचना अशी असते की ते जेव्हा दुसऱ्या अभिक्रियाकारक रेणूशी जोडले जातात तेव्हा त्या रेणूची अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते. परिणामी अभिक्रियेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो. वैज्ञानिक काही वेळा विकरांच्या रेणूंच्या संरचना बदलतात आणि असे रूपांतरित विकर कसे कार्य करते किंवा असे विकर वेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात का? याचा अभ्यास करतात. विकरांची संरचना उष्णता, आम्ल किंवा अल्कली इ. घटकांमुळे नष्ट होऊ शकते. अनेक जहाल विषे महत्त्वाच्या विकरांची हानी घडवून आणतात.

काही व्यक्तींच्या शरीरात जन्मापासूनच विशिष्ट विकरे नसतात. अशा व्यक्तींमध्ये गॅलॅक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, इ. मेंदूशी संबंधित आनुवंशिक विकृती आढळून येतात. उदा., गॅलेक्टोसेमिया विकारात दुधातील गॅलेक्टोज शर्करेचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणारे विकर शरीरात तयार होत नाही. त्यामुळे नवजात बालकांना पाजलेल्या दुधातील गॅलेक्टोज त्यांच्या रक्तात साचले जाते. परिणामी बालकांना मोतीबिंदू होतो, यकृताची कार्यक्षमता कमी होते आणि मानसिक वाढ खुंटते. फेनिल किटोनमेह विकारात फेनिल ॲलानाइन या ॲमिनो आम्लाचे चयापचय करणारे विकर तयार होत नाही. परिणामी या आम्लाचे प्रमाण वाढून त्वचेतील रंगद्रव्यावर परिणाम होतो, तसेच मानसिक वाढ खुंटते. विकरांच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या विकृती, व्यंग, मानसिक मंदत्व किंवा मृत्यू टाळण्यासाठी आहाराद्वारे आणि औषधांद्वारे अशा व्यक्तींवर उपचार केले जातात.

बहुधा सर्व विकरे प्रथिने असली, तरी काही विकरांचे रेणू बिगर प्रथिनांच्या रेणूंना जोडून घेतल्याशिवाय कार्यच करू शकत नाहीत. अशा काही बिगर प्रथिनांच्या रेणूंमध्ये तांबे (कॉपर), लोह (आयर्न) किंवा मॅग्नेशियम इ. धातू असतात. ते आपल्या शरीरात सूक्ष्मपोषक मूलद्रव्यांच्या स्वरूपात असतात. अन्य काही बिगर प्रथिने कार्बनी संयुगांच्या स्वरूपात असतात, त्यांना ‘सहविकरे’ म्हणतात. सहविकर हे विकरातील प्रथिनाच्या भागाला घट्ट जुळलेले असेल, तर अशा भागाला ‘युक्तविकर गट’ म्हणतात. युक्तविकर गटातील केवळ सहविकराचा भाग किंवा विकराचा भाग स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही. अनेक सहविकरांमध्ये जीवनसत्त्वांचा, खासकरून, ब-समूह जीवनसत्त्वांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीच्या आहारात अशा जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असल्यास विकरांचे कार्य नीट घडून येत नाहीत. परिणामी निरनिराळे विकार उद्भवू शकतात.

उपयोग : विकरांचे शरीरातील कार्यापलिकडे अनेक उपयोग आहेत. विकरांचा वापर प्रतिजैविके, बीर, पाव, चीज, कॉफी, साखर, शिर्का (व्हिनेगार), जीवनसत्त्वे, अपमार्जके (डिटर्जंट) इ. उत्पादनांच्या निर्मितीत केला जातो. उत्पादक विविध स्वरूपाची उत्पादिते बनविण्यासाठी विकरांचा वापर करतात. उदा., काही अपमार्जकामध्ये विकरे असतात, जी प्रथिनमय किंवा तेलकट पदार्थांचे अपघटन करतात आणि त्यामुळे कपड्यांवर पडलेले डाग जातात. वैद्यकक्षेत्रात जखमा साफ करण्यासाठी, रक्तातील गुठळ्या विरघळण्यासाठी, पांढऱ्या पेशींच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी, तसेच पेनिसिलीनमुळे उद्भवलेल्या अधिहर्षतेवर इलाज करण्यासाठी विकरांचा वापर करतात. पांडुरोग, कर्करोग, पांढऱ्या पेशींचा कर्करोग तसेच यकृत, हृदय यांचे काही रोग विकरांशी संबंधित असल्याने अशा रोगांचे निदान होण्यासाठी शरीरात विकरांचे प्रमाण किती आहे याची चाचणी वैद्यक करतात.