आर्यांच्या पूर्वी भारतात स्थायिक झालेल्या द्रविड, ऑस्ट्रिक इ. वैदिकेतर लोकांच्या धार्मिक परंपरेतून हिंदुधर्मात मूर्तिपूजा, देवळे, उत्सव, सणवार इ. अनेक गोष्टी दाखल झाल्या, तसेच विविध धार्मिक संप्रदायही निर्माण झाले. त्यांत वैष्णव, शैव व शाक्त हे मुख्य होत.
वैदिक धर्माला ज्याप्रमाणे आधारभूत असे संहिता, ब्राह्मणे, उपनिषदे इ. साहित्य आहे, त्याप्रमाणे या पंथांनी आपापल्या आचार-विचारादी मार्गांना आधार म्हणून जे साहित्य रचले त्यांत ‘आगम’ हे महत्त्वाचे साहित्य समजले जाते. वैदिक धर्माच्या साहित्यास ‘निगम’ असेही क्वचित म्हणतात. आगम हा शब्द प्राचीन बौद्ध साहित्यात (उदा., मिलिंदपञ्ह, महावस्तु इ.) प्रथा किंवा रूढी या अर्थाने आढळतो. पाचव्या शतकानंतर हा शब्द सुत्तपिटकाच्या पूर्वी ‘निकाय’ म्हटल्या जाणाऱ्या विभागासाठी वापरलेला आहे. तेव्हापासून ‘आगम’ शब्दाला ‘त्या त्या पंथाचे आधारभूत साहित्य’, असा अर्थ प्राप्त झाला असावा.
आगम साहित्याचे मुख्यत्वे चार विषय आहेत : ज्ञान, योग, क्रिया व चर्या. यांतील क्रिया-विभागात मुख्यत्वे मंदिरांची रचना, मूर्तींची स्थापना यांचे नियम आणि चर्चा-विभागात पूजाविधीचे नियम दिलेले आढळतात. यावरून मूर्तिपूजा व मंदिरांची उभारणी ज्या भारतीय संस्कृतीच्या अवस्थेत सुरू झाली, त्या काळात आगमांची रचना झाली असावी, असा अंदाज आहे. तमिळ कवी तिरुमूलर व माणिक्कवाचगर यांनी शैव आगमांच्या केलेल्या उल्लेखांवरून व काश्मीर शैव संप्रदायाच्या अभ्यासावरून आगमांची रचना नवव्या शतकाच्या सुमारास झाली असावी, असे जे. सी. चतर्जी यांचे मत आहे.
वैष्णव, शैव व शाक्त असे आगमांचे तीन भेद करण्यात येतात, तसेच वैदिक व अवैदिक अशीही आगमांची विभागणी करण्यात येते. जैन–बौद्धादी आगम अवैदिक, तर वेद, तंत्रे व इतिहास–पुराणे हे वैदिक आगम मानतात. परंपरेनुसार अठ्ठावीस आगम व एकशे आठ उपागम मानण्यात येत असले, तरी ते सर्व आज उपलब्ध नाहीत.
संदर्भ :
- Chatterji, J. C. Kashmir Shaivaism, 1914.
- Guru Dutt, K. Kashmir Shaivaism, Bangalore, 1949.