सार्क (SAARC –  दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषद).

पार्श्वभूमी : दक्षिण आशियाई देशांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संघटना. या देशांनी एप्रिल १९४७ ते डिसेंबर १९८५ या काळात प्रदीर्घ चर्चा करून दिनांक ८ डिसेंबर १९८५ रोजी सार्क संघटनेची ढाका येथे स्थापना केली. या बाबतीत बांगला देशाचे तत्कालीन अध्यक्ष जनरल इर्शाद यांनी अंतिम पुढाकार घेतला होता. सुरुवातीला भारत, बांगला देश, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, भूतान आणि नेपाळ हे सात देश या संघटनेचे सदस्य होते. दक्षिण आशियातील देशांचे समाजकल्याण आणि तेथील लोकांचा जीवनविकास, आर्थिक स्थितीत सुधारणा इत्यादी उद्दिष्टे समोर ठेवून ही संघटना तयार केली गेली होता. या सर्व देशांनी त्या वेळी कृषी, ग्रामीण विकास, दूरसंचार, हवामान, आरोग्य आणि लोकसंख्यावाढ या क्षेत्रांत एकात्मिक कृतिकार्यक्रम राबविण्याचे ठरविले. सार्कच्या स्थापनेनंतर अनेक देश या संघटनेत सदस्य किंवा निरीक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील होते. बऱ्याच वादावादीनंतर एप्रिल २००७ मध्ये अफगाणिस्तानला आठवा सदस्यदेश म्हणून या संघटनेत प्रवेश देण्यात आला. सध्या ऑस्ट्रेलिया, चीन, इराण, जपान, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया, अमेरिका हे आठ देश आणि युरोपियन युनियन ही संघटना यांना निरीक्षक देश म्हणून दर्जा देण्यात आला आहे. म्यानमारला लवकरच पूर्ण सदस्यत्व दिले जाईल, तर रशिया, दक्षिण आफ्रिका आणि टर्की हे देश निरीक्षक देशाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत.

रचना व कार्य : नेपाळची राजधानी काठमांडू येथे १६ जानेवारी १९८७ रोजी सार्कच्या सचिवालयाची स्थापना करण्यात आली. सार्कच्या सरचिटणीसची नियुक्ती सदस्यदेशांमधून आळीपाळीने केली जाते. सदस्यदेशांमधल्या विविध शहरांतून विविध समित्यांमार्फत सार्कचे काम चालते. सार्कची वार्षिक परिषद (वर्षातून एकदा) देशांच्या नावाच्या आकारविल्हेनुसार त्या-त्या देशात भरते. तत्पूर्वी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वर्षातून दोनदा बैठक होते आणि त्या बैठकीला सदस्यदेशांचे राष्ट्रप्रमुख/पंतप्रधान उपस्थित राहतात. पूर्वी सदस्यदेशांतील मतभेदांमुळे या बैठका सौहार्दपूर्ण वातावरणात होत नसत. पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेल्या पाठिंब्यामुळे आणि भारतात उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत, बांगला देश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणा-या सार्कच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे ही बैठकच रद्द करावी लागली. सदस्यदेशांच्या अंतर्गत वादाचा सार्कच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून सार्कच्या बैठकीत युद्ध किंवा दोन देशांमधील संघर्ष यावर सहसा चर्चा होत नाही. पण संबंधित देशांना या बैठकीच्या वेळी परस्पर चर्चा करण्याची संधी सार्क देते. सार्कच्या शिखर परिषदांमध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सदस्यराष्ट्रांच्या व्यापक सहकार्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे. २०१५च्या आकडेवारीनुसार सार्कमध्ये जगाच्या क्षेत्रफळाच्या ३ टक्के भूभाग समाविष्ट होता, तर जगाच्या लोकसंख्येच्या २१ टक्के लोकसंख्या या देशांची होती. सदस्यदेशांमध्ये आर्थिक आणि क्षेत्रीय सहकार्य वाढावे यासाठी सार्क नेहमीच प्रयत्नशील असते. निरीक्षक या नात्याने सार्कचे संयुक्त राष्ट्रसंघाशी कायमस्वरूपी राजनैतिक संबंध आहेत. युरोपियन युनियन व अन्य अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर सार्कने मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत.

सार्कने अल्पकाळात विविध आघाड्यांवर लक्षणीय प्रगती केली आहे. दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र या सार्क अंतर्गत संघटनेची (SAFTA) स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. सदस्यदेशांमधील व्यापारवृद्धीबाबत या संघटनेला चांगलेच यश मिळाले आहे. सार्क अंतर्गत देशांमधील प्रवासासाठी व्हिसाच्या २४ प्रकारांच्या अटी शिथिल करण्यात आल्या. महिला व बालकल्याण, शांतता, विकास, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरणरक्षण आणि प्रादेशिक सहकार्य या क्षेत्रांत सार्कच्या कामात सहकार्य करणाऱ्यांना अनेक पारितोषिके जाहीर करण्यात आली. सदस्यदेशांतील नामवंत लेखक आणि युवकांसाठीही सार्क पुरस्कार जाहीर करण्यात आले. सार्क देशांतील ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी सार्कचे गीत तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारताने सार्क देशातील संपर्कासाठी एक दळणवळण-उपग्रह देण्याचे मान्य केले आहे. या उपग्रहासाठी २३५ कोटी रुपये खर्च येणार असून तो सर्व खर्च भारतच देणार आहे. पाकिस्तानचा या योजनेला विरोध आाहे. त्यामुळे पाकिस्तान वगळता अन्य सार्क देशांनी या उपग्रहाचा वापर करण्याचे ठरविले आहे. ‘सीमाविरहित ज्ञान’ असे घोषवाक्य असलेले एक दक्षिण आशियाई विद्यापीठ भारताने नवी दिल्ली येथे सुरू केले आहे. या विद्यापीठात अनेक विषयांतील संशोधनाची सोय असून अत्यंत समृद्ध असे ग्रंथालय उभे करण्यात आले आहे. सार्क आणि अन्य देशांतील विद्यार्थी २०१४ पासून या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. सुमारे ७ हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतील. संघटनेच्या सदस्यदेशांमध्ये या विद्यापीठाच्या संलग्न शाखा असतील व तेथेही या विद्यार्थ्यांना संशोधन करता येईल. नवी दिल्लीतील इग्नू विद्यापीठ आणि असोला अभयारण्य यांच्या दरम्यान या विद्यापीठासाठी १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मूल्यमापन : भारत आणि अन्य सदस्यदेश यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या अनेक जागतिक व प्रादेशिक संघटनांबरोबर सार्कचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामध्ये एशिया को-ऑपरेशन डायलॉग (ACD–३४ देश), साऊथ एशिया सब रीजनल इकॉनॉमिक को-ऑपरेशन (SASEC–६ देश), मेकाँग–गंगा को-ऑपरेशन (MGC–६ देश), इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA–२१ देश), बांगला देश, भूतान, भारत, नेपाळ सहकार्य (BBIN–४ देश)  आणि बंगालच्या उपसागरानजीकच्या देशांची परिषद (BIMSTEC–७ देश) या संघटनांचा यात समावेश होतो. या संघटनांमुळे सार्कला स्थैर्य प्राप्त झाले आहे. दहशतवादाला उघडउघड पाठिंबा देणा-या पाकिस्तानमुळे सार्कमध्ये मतभेद निर्माण झाले असून या भूप्रदेशातील शांततेला बाधा निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तान हा मध्य आशियातील देश असल्यामुळे त्याला प्रवेश देताना सार्कच्या सदस्यदेशांमध्ये खूपच वाद झाले होते. दक्षिण आशियाई देश कुणाला म्हणायचे, यावरून हा वाद निर्माण झाला होता.

सार्कमधील सर्वच देशांना विकासासाठी खूप वाव असल्याने अनेक देश निरीक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले आहेत. धोरण आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत सार्कचा प्रभाव हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.

संदर्भ :

भाषांतरकार : भगवान दातार

समीक्षक : शशिकांत पित्रे