ग्लेसर, डॉनल्ड आर्थर   (२१ सप्टेंबर १९२६ – २८फेब्रुवारी २०१३).

अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि जैवशास्त्रज्ञ. त्यांनी मूलभूत कणांचे अस्तित्व ओळखणाऱ्या उपकरणाचा (बुद्बुद कोठीचा) शोध लावल्याबद्दल १९६० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच त्यांनी पदार्थाच्या मूलभूत कणांच्या क्षणभंगूरतेसंबंधी संशोधन आणि दृष्टिज्ञान करून देणाऱ्या संगणकीय प्रणालीचा विकास केला.

ग्लेसर यांचा जन्म अमेरिकेतील ओहायोओ राज्यातील क्लीव्हलॅंड  येथे झाला. ज्यू वंशीय व रशियामधून विस्थापित झालेले त्यांचे वडील व्यवसायाने व्यापारी होते. ग्लेसर यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण क्लीव्हलॅंड येथे झाले. भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  या महाविद्यालयातून १९४६ मध्ये बी.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. १९४९ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमधून भौतिकशास्त्रात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ते  मिशिगन विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. पीएच्. डी. करीत असताना मूलभूत कणाच्या अभ्यासामध्ये विशेष गोडी निर्माण झाल्यामुळे त्यांना नोबल पुरस्कार विजेते कार्ल डेव्हिड अॅंडरसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

अँडरसन वैश्विक किरणांचा अभ्यास करीत होते. हा अभ्यास आणवीय भौतिकशास्त्रात किती उपयोगी पडू शकेल, हा विचार ग्लेसर यांच्या मनात आला आणि त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या उपकरणावर काम करण्यास सुरुवात केली. कॅल्टेकमध्ये असताना त्यांनी या प्रकारच्या उपकरणाची रचना आणि कार्य यांचा अभ्यास केला होता. नोबल पुरस्कार विजेते मॅक्स डेलब्र्यूक यांच्या रेणवीय प्रजननशास्त्र (मॉलेक्यूलर जेनिटिक्स) या विषयावरील व्याख्यानांना ते आवर्जून उपस्थित रहात असत.

ग्लेसर १९५९ मध्ये  बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९६४ मध्ये ते भौतिकशास्त्र आणि रेणवीय जीवशास्त्र या विषयांचे प्राध्यापक झाले. याच काळात त्यांनी पदार्थाच्या मूलभूत कणांच्या क्षणभंगूरतेवर संशोधन केले. त्यांनी बुद्बुद् कोठी (बबल चेंबर, bubble chamber) या उपकरणाचा शोध लावला. या संशोधनामुळे मूलभूत कणांची हालचाल व त्याचा जीवनकाल याचे चित्रण करता येणे शक्य झाले आणि कणांसंबंधी पुढील संशोधनाचा मार्ग सुकर झाला. त्यांचे हे संशोधन पुढे अनेक महत्त्वाचे शोध घेण्याकरिता उपयोगी पडले.

इ. स. १९६० मध्ये नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ग्लेसर यांचे विचारचक्र वेगळ्या दिशेने फिरू लागले. त्यांच्या लक्षात आले की प्रयोग करणे व त्यासाठी उपकरणे बनविणे याच्या व्यवस्थापनामध्येच आपला जास्त वेळ जात आहे. कॅल्टेकमधे सुरू केलेला जीवशास्त्राचा अभ्यास त्यांनी पुन्हा सुरू केला.

बर्कली विषाणू प्रयोगशाळेत ग्लेसर यांनी काम करण्यास सुरुवात केली. अतिरिक्त किरणोत्सर्गामुळे होणारा कर्करोग हा प्रकल्प त्यांनी प्रथम हाती घेतला. जीवाणू व सस्तन प्राण्यांच्या पेशी यांवर त्यांनी अनेक प्रयोग केले. महत्त्वाचे प्रयोग करीत असताना त्याकरिता लागणारी उपकरणे त्यांनी स्वयंचलित बनविली. बर्कली वैज्ञानिक प्रयोगशाळा त्यांनी सुरू केली.

ग्लेसर यांनी १९७१ मध्ये मोशे अलाफी यांच्याबरोबर सेटस कार्पोरेशन नावाची संस्था काढली. त्याचे ते अध्यक्ष होते. जैव अभियांत्रिकीमध्ये काम करणारी ही पहिली संस्था!

जीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध लक्षात आल्यावर ग्लेसर यांचे विचारचक्र पुनश्च वेगळ्या दिशेने फिरू लागले. स्वयंचलित उपकरणातील दृष्टिज्ञान प्रणाली आणि मानवी डोळा, तसेच काय पाहिले याचे ज्ञान मानवाला करून देणाऱ्या मानवीय मेंदूची एक संगणकीय प्रणाली ग्लेसर यांनी विकसित केली.

ग्लेसर यांचे निधन बर्कली, कॅलिफोर्निया येथे झाले.

 

संदर्भ :

समीक्षक – हेमंत लागवणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा