पिसाराइडेज, सर ख्रिस्तोफर ए. (Pissarides, Sir Christopher A.) : (२० फेब्रुवारी १९४८). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे ‘रेजिस प्राध्यापक’. स्थूल अर्थशास्त्राशी निगडित श्रम, आर्थिक वृद्धी व आर्थिक धोरण यांसंदर्भातील संशोधनात विशेष स्वारस्य असणाऱ्या ख्रिस्तोफर यांना अर्थतज्ज्ञ पिटर ए. डायमंड (Peter A. Diamond)डेल टी. मॉर्टेन्सन (Dale T. Mortensen) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयाचा २०१० सालचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

ख्रिस्तोफर यांचा जन्म सायप्रसमधील ऍग्रोज या खेडेगावात झाला. त्यांनी इसेक्स विद्यापीठातून १९७० मध्ये अर्थशास्त्र विषयातील बी. ए. आणि १९७१ मध्ये त्याच विषयात एम. ए. या पदव्या संपादन केल्या. नंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत पीएच. डी.साठी प्रवेश घेतला. तेथे अविकसित बाजारपेठा, त्यासंबंधीची अपुरी माहिती व व्यक्तींचे वर्तन या विषयांवर प्रबंध लिहून त्यांनी १९७३ मध्ये डॉक्टरेट मिळविली. १९७४ ते १९७६ या काळात साउथॅम्प्टन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी १९७९-८० मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठ आणि १९९०-९१ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ-बर्कली येथे तसेच सायप्रस विद्यापीठ, अमेरिकेतील येल, प्रिन्स्टन विद्यापीठ यांसारख्या विख्यात विद्यापीठांतून अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. वर्ल्ड बँक, आस्ट्रेलियन रिझर्व बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांचे ते सल्लागार होते.

ख्रिस्तोफर यांनी श्रमिक बाजारपेठा, संरचनात्मक बदल व आर्थिक प्रश्नांसंबंधीचा अभ्यास करून बेरोजगारीचे अर्थशास्त्र, रोजगारातील प्रवाह, बेरोजगारीचे सूक्ष्म आर्थिक परिणाम तसेच श्रमिक बाजारपेठातील (Labour Market) विविध घटकांकडे लक्ष वेधले. पीएच.डी.चे त्यांचे मार्गदर्शक मिचिओ मॉरिशिमा यांच्या बरोबरीने नोकऱ्यांची निर्मिती व विनाश (Destruction) या बेरोजगारीच्या सिद्धांतासंबंधी १९९४ मध्ये लिहिलेल्या शोधनिबंधामुळे त्यांना पुढे नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. जेव्हा व्यक्तीची नोकरी जाते, तेव्हा आर्थिक घटक व सरकारी धोरण यांमुळे रोजगारीचा कालावधी कसा बदलतो याचे विश्लेषण त्यांनी केले. बेरोजगार भत्त्याची रक्कम कमी व मर्यादित कालावधीसाठी असावी, अशी रक्कम जास्त तसेच प्रदीर्घ काळासाठी असेल, तर त्यामुळे बेरोजगारीला चालना मिळून श्रमिकांचे श्रमाचे तास कसे वाया जातात यांबाबत त्यांनी निष्कर्ष काढले. व्यक्ती जादा काळ रोजगाराशिवाय राहणार नाहीत याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

ख्रिस्तोफर यांनी स्थूल अर्थशास्त्र व श्रमिक बाजारपेठा यांच्यातील परस्पर संबंधाचा विशेष अभ्यास करण्याबरोबरच त्यांचा मेळ कसा घालता येईल, याबाबतचे विवेचन केले. अर्थव्यवस्थेत विशिष्ट कालावधीत बेरोजगारीकडून रोजगारीकडे वाटचाल होऊन दोन्हीमधील मेळ प्रक्रिया (Matching Function) संकल्पना विकसित केली व आपल्या अनुभवसिद्ध संशोधनाने रोजगारी संबंधीची भाकितेही वर्तवली. संरचनात्मक बदल व विकास यासंबंधीचे मूलभूत संशोधन केले. त्यांच्या मार्टेन्सन-पिसाराइडेज प्रतिमानाचा आधुनिक स्थूल अर्थशास्त्रात मोठा बोलबाला आहे. जगभरच्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमात क्वचित फेरफारासह त्यांची वरील प्रतिमान समाविष्ट केलेली आढळते. ख्रिस्तोफर यांचा इक्विलिब्रियम अनएम्प्लायमेंट थिअरी हा ग्रंथ बेरोजगारीच्या स्थूल अर्थशास्त्र विषयाच्या विश्लेषणासाठी प्रमाण मानला जातो.

ख्रिस्तोफर यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले : लेबर मार्केट ॲडजेस्टमेंट (१९७६), इक्विलिब्रियम अनएम्लायमेंट थिअरी (१९९०), टेक्नॉलॉजी प्रोग्रेस, जॉब क्रिएशन ॲण्ड जॉब डिस्ट्रक्शन (सहलेखन – १९९५), दि इम्पॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट टॅक्स कट्स ऑन अनएम्प्लॉयमेंट ॲण्ड वेजेस (१९९७), जॉब रिलोकेशन एम्प्लॉयमेंट फ्लक्च्युएशन्स ॲण्ड अनएम्प्लॉयमेंट (सहलेखन – १९९९), लुकींक इंटू दि ब्लॅक बॉक्स (सहलेखन – २०००), कंपनी स्टार्ट-अप कॉस्ट ॲण्ड एम्प्लॉयमेंट (२००१), टॅक्सेस, सब्सिडीज ॲण्ड इक्विलिब्रियम लेबर मार्केट आउटकम्स (सहलेखन – २००१), कन्झम्पशन ॲण्ड सेव्हिंग्ज विथ अनएम्प्लॉयमेंट रिस्क (२००२), स्केल इफेक्ट्स इन मार्केट्स विथ सर्च (सहलेखन – २००२), जॉब मॅचिंग, वेज डिस्पर्शन ॲण्ड अनएम्प्लॉयमेंट (सहलेखन – २०११). शिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.

ख्रिस्तोफर यांना अर्थशास्त्रविषयक संशोधनकार्याबद्दल अनेक सन्मान लाभले. इकॉनॉमिक सोसायटीचे फेलो (१९९७), ब्रिटिश अकॅडमीचे फेलो (२००२), बॅचलर – किताब (२००३), यूरोपियन इकॉनॉमिक्स असोसिएशनचे फेलो (२००५), आय. झेड. ए. इकॉनॉमिक्स प्राइझ (२००५), इकॉनॉमिक जर्नलचे संपादक (२००६-०७), एक्सलन्स इन रेफरिंग अवॉर्ड (२००८), अमेरिकन इकॉनॉमिक्स असोसिएशन्सचे परदेशी (ब्रिटिश) मानद सदस्य (२०११), २००९ पासून यूरोपियन इकॉनॉमिक असोशिएशनच्या कार्यकारिणीचे सदस्य व अध्यक्ष (२०११), ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन –  गोल्ड मेडल (२०१२), नाईट – किताब (२०१३).

ख्रिस्तोफर हे १९७६ पासून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच तेथील सेंटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्सचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा