वाइसमान, खाइम : (२७ नोव्हेंबर १८७४ — ८ नोव्हेंबर १९५२)

इझ्राएल-ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ; इझ्राएल चे पहिले अध्यक्ष.

वाइसमान यांचा जन्म बेलारूसमधल्या खेड्यात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव ऑयझर आणि आईचे नाव राचेल असे होते. वडीलांचा लाकडाचा व्यापार होता. वाइसमान यांचे वयाच्या अकरा वर्षापर्यंत शिक्षण जन्मगावी ज्यू धार्मिक शाळेत झाले. पुढील शालेय शिक्षणासाठी ते पिंस्क (Pinsk) या गावी गेले. जर्मनीतल्या डार्मस्टाट (Darmstdt) या गावातील पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. स्वित्झर्लंडमधल्या फ्रायबर्ग विद्यापीठातून (Fribourg University) विशेष प्राविण्यासह त्यांनी पीएच.डी. मिळवली(१८९९). १९०१मध्ये जिनीव्हा विद्यापीठात अध्यापन केल्यानंतर १९०४ साली ते मँचेस्टर विद्यापीठात व्याख्याता पदावर रुजू झाले. मँचेस्टरमध्येच त्यांनी जीवाणूद्वारे होणाऱ्या किण्वण (बॅक्टेरियल फर्मेंटेशनद्वारे; Bacterial Fermentation) पद्धतीने विविध पदार्थांच्या निर्मितीचे तंत्र शोधले. तिथेच त्यांनी अॅसिटोन (Acetone; CH3CHO) निर्मितीसाठी क्लॉस्ट्रिडियम अॅसिटोब्युटिलिकम (Clostridium acetobutylicum) या जीवाणूच्या वापराचे तंत्र विकसित केले. हा जीवाणू वाइसमान बॅक्टेरिया (Weizmann Bacteria) या नावाने ओळखला जातो. अॅसिटोनचा उपयोग युद्धात वापरल्या जाणाऱ्या कॉर्डाडाइट या स्फोटकामधे केला जातो. वाइसमान यांनी अॅसिटोनच्या औद्योगिक निर्मितीची प्रक्रिया शोधली. त्यांनी १००पेक्षा जास्त एकस्वे मिळवली.

१९४२साली अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांनी वाइसमान यांना अमेरिकेत बोलावून घेतले. कृत्रिम रबर तयार करण्याचा त्यांचा मानस होता. वाइसमान यांनी मक्याच्या किण्वनातून ब्युटील अल्कोहॉल तयार करणे आणि त्या अल्कोहोलचे रूपांतर ब्युटिलीन व ब्युटाडाइनमधे करण्याची औद्योगिक प्रक्रिया शोधली होती. तिचा उपयोग अमेरिकन उद्योगाने करावा अशी रूझवेल्ट यांची इच्छा होती. परंतु अमेरिकेतल्या तेल कंपन्यांनी वाइसमान यांचा प्रस्ताव हाणून पाडला.

वैज्ञानिक संशोधनात मग्न असतानाच वाइसमान राजकारणातही सक्रीय होते. ज्यूंसाठी इझ्राएल हा स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या चळवळीत ते आघाडीवर होते. त्यामुळेच १९४९साली ते इझ्राएलचे पहिले अध्यक्ष झाले.

वाइसमान यांचा रेहोव्हेत, इझ्राएल येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा