फ्ल्युओरीन हे मूलद्रव्य निसर्गात सगळीकडे (जमीन, पाणी, हवा यांत ) थोड्याफार प्रमाणात मिसळलेले असते. दगडी कोळसा, नैसर्गिक वायू व तेल यांच्या ज्वलनाने, तसेच बॉक्साइट शुद्धीकरण आणि खत कारखान्यात दगडी फॉस्फेट वापरताना, फ्ल्युओराइडे मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात.

फ्ल्युओराइडमुळे पानांच्या कडा आणि टोके यांवर झालेला परिणाम.

झाडांच्या पानांवरील रंध्रांतून फ्ल्युओराइडे आत शिरतात. त्वरेने विरघळण्याच्या गुणधर्मामुळे पेशीदरम्यानच्या पाण्यात व पेशीत ती विरघळतात आणि पानातील जलवाहिन्यात जातात. झाडाने शोषलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती सर्व अवयवांत पसरतात. मुख्यत्वे उच्छ्वासनमार्गाच्या टोकापर्यंत, म्हणजे पानांच्या टोका-कडांपर्यंत पोचतात, तेथे ती साठून राहतात. काही काळ साठल्यानंतरच त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. सहनशील झाडांची पाने फ्ल्युओरीनचे ५००/१,०००,०००, (५०० भाग प्रति दशलक्ष भागांत)  प्रमाण झाले तरी डागाळलेली दिसत नाहीत. संवेदनशील झाडांतील दृश्य परिणाम म्हणजे फ्ल्युओरीन साठलेल्या भागात पानांच्या कडा आणि टोकाकडील हरितद्रव्याचा नाश होऊन ते भाग भुरे-मातकट दिसतात, पाने गळून पडतात.

फ्ल्युओराइडचा परिणाम प्रथम प्राकल रेणूवर (Protoplast molecule) होतो आणि मुख्यत्वे श्वासोच्छ्वास, प्रकाश संश्लेषण, कर्बोदके आणि प्रथिने यांची निर्मिती, न्यूक्लिइक  आम्लनिर्मिती यांच्याशी संबंधित विकरांवर (एंझाइमांवर) होतो.

ग्लॅडिओलस या फुलझाडाच्या काही जाती फ्ल्युओरिनला अतिशय संवेदनशील असून, फ्ल्युओरीन प्रदूषणाचे निदर्शक म्हणून काही संबंधित उद्योगांच्या परिसरात वापरल्या जातात. समशीतोष्ण कटिबंधात वाढणाऱ्या द्राक्षाच्या काही जाती, पीच, जरदाळू, मका  हीसुद्धा संवेदनशील आहेत, तर टोमॅटो, गहू, सूर्यफूल ही फ्ल्युओरिनला सहनशील आहेत.

संदर्भ :

  • McCune, D.C., Hitchcock, A.E. ; Jacobson, J.S. & Weinstein, L.H. Fluoride accumulation and growth of plants exposed to particulate cryolite in the atmosphere  Contrib. Boyce Thompson Inst. 23(1):1-12, 1965.
  • Treshaw, M. Evaluation of vegetation injury as an air pollution criterion, J.Air.Pollut. Assoc. 15(6):226-269, 1965.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा