एथिलीन (CH2CH2) हे वनस्पतिजन्य रसायन – हॉर्मोन – वनस्पतींच्या वाढीस मदत करते. झाडांची वाढ, पानांचे वाढणे व गळून पडणे, फळे मोठी होणे, पिकणे व त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर देठापासून गळून पडणे, मुळे फुटणे, बाजूकडील फांद्यांची वाढ, श्वासोच्छवासाचा वेग इत्यादी नैसर्गिक क्रिया एथिलिनमुळे होत असतात. परंतु या क्रियांना जरूर असलेले एथिलिनचे प्रमाण अत्यंत कमी असते. दशलक्ष भागात एकापेक्षाही कमी प्रमाणातील हे रसायन वनस्पतींना विषारी ठरते, हे ऑर्किड व्यापाऱ्यांना जाणवले आणि या समस्येकडे इतरांचे लक्ष वेधले गेले.

रोषणाईसाठी  वायू वाहून नेणाऱ्या नळांतून निसटणारा एथिलीन वायू वनस्पतींना विषारी असतो. हा वायू काचगृहातील शोभेच्या झाडांना मारक ठरत असल्याचे शंभर वर्षांपूर्वी लक्षात आले. शहरी वातावरणात वाहनांतून बाहेर पडणारे एथिलीन एक प्रदूषक म्हणून  विसाव्या शतकाच्या मध्यावर ओळखले गेले. वाहनांच्या संख्येबरोबर एथिलिनचे प्रमाणही वाढत गेले. प्रदूषित शहरात एथिलीन दशकोटी भागात ३ – १५ भाग आसल्याचे दिसून आले आहे.

फुले उमलण्याआधीच कळ्या गळून पडणे, फुलांची बाह्यदले पारदर्शक होणे वा त्यांना भोके पडणे हे  एथिलिनचे परिणाम वायूच्या अतिशय माफक प्रमाणात (दशकोटी भागात ५ भाग), थोड्या वेळात (६ तासांत) व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या फुलझाडांत दिसून आले आहेत. काचगृहात दिसलेल्या या परिणामांचे  गांभीर्य अमेरिकेतील एका पॉलिथिलिनच्या कारखान्याजवळील कपाशीचे पीक नष्ट झाल्यावर जाणवले. कारखान्याच्या परिसरातील काही किलोमीटर दूरपर्यंत पीक पूर्णपणे नष्ट झाले, त्यापलीकडील झाडांची पाने गळून पडली व कोवळी झाडे वेडीवाकडी वाढली. त्याही पलीकडच्या झाडांची पाने हरितद्रव्य नाशामुळे तांबडसर पडली, फुले लवकर आली पण फळे गळून पडली. त्यामुळे कपाशीचे फार मोठे नुकसान झाले.

संदर्भ :

  • Hall, W.C.; Trucelut,  G.B.;  Leinweber, C.L.;  Herrero, F.A. Ethylene production by cotton plants and its effects under experimental and field conditions Physiol.Plant. 10: 306 – 317, 1957.
  • Stephens, E.R. ; Burleson, F.R. Analysis of the atmosphere for light hydrocarbons J.Air Pollut. Contr. Assoc. 17:147-153, 1967.
  • Treshow, M. Environment And Plant Response.. McGraw Hill.Publ. in Agric. Sci. N.Y., 1970.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा