शेळके, शांता : (१२ ऑक्टोबर १९२२ – ६ जून २००२). ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म इंदापूर (जि. पुणे). खेड, मंचर या परिसरात त्यांचे बालपण व्यतीत झाले. शांताबाईंचे आजोबा (वडिलांचे वडील) अण्णा हे शाळामास्तर होते. शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावे लागले. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत. एकूण ही पाच भावंडे त्यात शांताबाई सगळ्यात मोठ्या. आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत – नकळत शांताबाईंवर होत राहिले. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली. १९३० मध्ये शांताबाईंच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. यानंतर सारेजण पुण्याला काकांकडे आली. अखेर पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागेत झाले. सुसंस्कृत सुविद्य, अभिजात अशा या शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. १९३८ मध्ये त्या मॅट्रीक झाल्या आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्या. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली. या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला. प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला. हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी. ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी  नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली. १९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्. ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्. ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक  मासिकात, नंतर नवयुग  या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

साहित्यसंपदा : कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा  (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३) गोंदण (१९७५),अनोळख (१९८६), कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुक्ता (१९४४), गुलमोहोर (१९४९), प्रेमिक (१९५६), काचकमळ (१९६९) ,सवाष्ण (१९७४),अनुबंध (१९८०),बासरी (१९८२), कविता करणारा कावळा (बालकथासंग्रह, १९८७) ,सागरिका (बालकथासंग्रह१९९०),हे कथासंग्रह ;विझली ज्योत (१९४६), नरराक्षस (१९४८), पुनर्जन्म (१९५०), धर्म (१९७३), ओढ (१९७५), स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर, या कादंबऱ्या ;शब्दांच्या दुनियेत (१९५९),आनंदाचे झाड, धूळपाटी (१९८२ ),पावसाआधीचा पाऊस (१९८५), एकपानी, वडीलधारी माणसे (१९८९), संस्मरणें (१९९०), मदरंगी (१९९१ ),सांगावेसे वाटले म्हणून (१९९४) हे ललितलेखन इत्यादि विपुल अशी त्यांची  साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखन आहे. तालपुष्कर (१९५०) आंधळ्याचे डोळे, औट घटकेचा राजा (१९५७), चौघीजणी (१९६०), गाठ पडली ठका ठका (१९६१) ,गवती समुद्र (१९६२) आंधळी (१९६३) ,गाजलेले विदेशी चित्रपट (१९८९), पाण्यावरल्या पाकळ्या (१९९२), मेघदूत (१९९४) असे अनेक अनुवादही शांताबाईंनी केले आहेत.

विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिल आणि खरं प्रेम राहिल ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत. शांताबाई बी. ए. च्या पहिल्या वर्षात असताना म्हणजे १९४१ मध्ये त्यांची पहिली कविता ‘शालापत्रक’ मासिकात छापून आली. तीही काहीशी बालगीतं या स्वरुपात. एकीकडे अनेक कवींच्या, विशेषत: माधव जूलिअन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीला त्या वळणाची शब्दबंबाळ कविताच त्या लिहित राहिल्या. पण गोंदण (१९७५) पासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून, शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला. त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेली. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपण, मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविषय गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली. तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अशी अनेक गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही होत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता  आणि हे बंध रेशमाचे  या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली. अशाप्रकारे कवितेच्या विविध रूपात, विविध लेखनप्रकारात त्या रमलेल्या होत्या. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते. शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी, वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत. अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा ह्या गांभीर्याने शांता शेळके यांनी त्यांचे अनुवाद कार्य केले आहे. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्टे होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८८), कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), ग. दि. माडगुळकर पुरस्कार (१९९४) इत्यादी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. त्याबरोबरच १९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा; डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा),संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.

This Post Has One Comment

  1. शांताबाईंच्यचे लेखन हे वाचनीय तर आहेच पण भाषा , संस्कृती यांचे संवर्धन जतन परंपरावादी सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करणारे. सौंदर्य दृष्टी विकसित करणारे पुनरप्रत्ययाचा आनंद देणारे.

Comments are closed.