बॅचलर, जॉर्ज कीथ (८ मार्च १९२० – ३० मार्च २०००).
ऑस्ट्रेलियन गणितज्ञ. उपयोजित गणित (Applied Mathematics) आणि द्रायुगतिशास्त्र (Fluid Dynamics) या क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य आहे.
बॅचलर यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. बी.एस्सी. व एम्.एस्सी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन एअरॉनॉटिक्स रिसर्च डिव्हिजनमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम केले. तेथील काम विमानांच्या इंजिनांमध्ये इंधनाच्या प्रवाहात येणाऱ्या अडचणींसंबंधी होते. त्यामुळे त्यांना द्रायुगतिशास्त्रात रस निर्माण झाला. पुढे त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात सर जिऑफ्रे टेलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९४७ मध्ये पीएच्.डी. पदवी संपादन केली. केंब्रिज विद्यापीठातच प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम करताना त्यांनी तेथे उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र (Theoretical Physics) या विषयांचा स्वतंत्र विभाग सुरू केला. तेथेच ते १९५९–८३ च्या दरम्यान विभागप्रमुख आणि निवृत्तीनंतरही मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. बॅचलर यांची १९५७ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलोशिपसाठी (FRS) निवड झाली. द्रायुगतिशास्त्रातील उसळते प्रवाह (Turbulent flows) आणि विरोध प्रणाली (colloidal systems) म्हणजेच द्रवातील सूक्ष्म कणांमुळे त्याच्या प्रवाहावर होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. गणिताच्या मदतीने सिद्धांत शोधून या विशिष्ट समस्या सोडविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
बॅचेलर यांच्या नावाने द्रायुगतिशास्त्रातील ‘बॅचलर व्होर्टेक्स’ आणि ‘बॅचलर स्केल’ ही दोन समीकरणे प्रसिद्ध आहेत. द्रायुगतिशास्त्रावरील ॲन इंट्रोडक्शन टू फ्ल्यूइड डायनॉमिक्स (An Introduction to Fluid Dynamics) हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. द्रायुयामिकी (Fluid Mechanics) या प्रतिष्ठित शोधपत्रिकेचे ते संस्थापक होते आणि या पत्रिकेचे त्यांनी ४३ वर्षे संपादन केले.
बॅचलर यांना अॅडॅम्स पारितोषिक, रॉयल सोसायटीचे पदक, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स या संस्थेचे टिमोशेन्को पदक आणि सोसायटी ऑफ इंजिनिअरिंग सायन्सेसचे टेलर पदक असे अनेक सन्मान प्राप्त झाले. दर चार वर्षांनी भरणाऱ्या सैद्धांतिक आणि उपयोजित यामिकीच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांच्या सन्मानार्थ द्रायुयामिकीसाठी बॅचलर पारितोषिक देण्यात येते.
बॅचलर यांचे केंब्रिज येथे निधन झाले.
संदर्भ:
- http://www-history.mcs.st-andrews.ac.uk/Biographies/Batchelor.html
- http://www.eoas.info/biogs/P001597b.htm
समीक्षक – विवेक पाटकर