कळके, भगवंत राजाराम : (२४ नोव्हेंबर १९२७–१३ जुलै २०१६).
भारतीय वैद्यक आणि संशोधक. त्यांनी हृदयांच्या कृत्रिम झडपांचे शोध लावले. त्यांनी शोधलेल्या या हृदय झडपा कळके-हार्ट व्हाल्व्ह म्हणून ओळखली जाते.
कळके यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या खेड्यात झाला. ते दहा वर्षाचे असताना त्यांचे कुटुंबीय मुंबईत आले. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबईतील शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५२ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शस्त्रक्रिया या विषयात त्यांनी आपले शिक्षण नायर रूग्णालयात पुढे चालू ठेवले. डॉ. क्लेरेन्स वॉल्टन लिलेहाय (Clarence Walton Lillehei) यांचे हृदयशस्त्रक्रियेवरचे लेख वाचून त्यांना हृदय शस्त्रक्रियेत रस निर्माण झाला. त्यावेळी नायर रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभाग नुकताच सुरू झाला होता. ओपन हार्ट शस्त्रक्रिया हा विभाग प्रायोगिक अवस्थेत होता. जानेवारी १९६४मध्ये मिनेसोटा विद्यापीठाचे डॉ. लिलेहाय भारतात आले होते. डॉ. कळके त्यांना जाऊन भेटले व त्यांच्याबरोबर दोन वर्षे काम करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. डॉ. लिलेहाय यांनी त्याला संमती दिली आणि १४ ऑक्टोबर, १९६४ला डॉ. कळके मिनियापोलीसमध्ये दाखल झाले.
डॉ. कळके यांची पहिलीच शस्त्रक्रिया महाधमनीची (एओरटिक) झडप (व्हाल्व्ह) बदलण्याची होती. त्यासाठी स्टार एडवर्ड प्रोस्थेसिसचे रोपण केले. डॉ. कळके यांनी विचार केला की, आकाराने मोठ्या असलेल्या ह्या प्रोस्थेसिसपेक्षा लहान आकाराचे प्रोस्थेसिस तयार केले तर ते लहान मुलांत वापरायला सोपे पडेल. डॉ. कळके यांना त्यांच्या गावातल्या धरणाची आठवण झाली. भरती आली की, पाण्याच्या दाबाने दारे बंद होत होती. पाणी ओसरायला लागले की, आपोआप दारे उघडत आणि पाणी कालव्यात जात असे. १९६४च्या अखेरीस डॉ. कळके यांनी ही कल्पना डॉ. लिलेहाय यांना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यावर त्यांनी प्रयोग करावयाचे ठरवून डॉ. कळके यांनी ताबडतोब पीएच.डी.साठी मिनेसोटा विद्यापीठात नाव नोंदवले व या झडपाचे रेखाटन करून प्रयोग करायचे ठरवले. सुरुवातीला चार झडपा तयार केल्या. त्या स्टेनलेस स्टीलच्या होत्या. दोन अर्ध गोलाकृती धातूच्या पानासारख्या दिसणाऱ्या पट्ट्या एका पिंजऱ्यासारख्या कड्यात अडकवल्या. या झडपा डॉ.कळके यांनी प्रथम कुत्र्याच्या द्विदल (मायट्रल) व महाधमनीतील (एओरटिक) झडपात बसवले. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सिनेअँजिओग्राफी (Cineangiography, वाहिकाचित्रण) केली. एवढ्यात डॉ. कळके यांनी गॉट डेगेटी नावाची एक वेगळीच झडप पाहिली. सिलिकॉनचे वेष्टण असलेली ही झडप टेफलॉनपासून बनवली होती. या झडपेभोवती रक्ताची गुठळी होत असल्याने ती १९६६मध्ये बाजारातून विकायची थांबवली गेली होती. एकंदरीतच डॉ.कळके यांची झडप इतरांपेक्षा जास्त चांगली ठरली. त्याची दोन्ही पाती स्वतंत्रपणे हलत होती. डॉ. कळके यांच्या ह्या झडपाचे परीक्षण आठ महिन्याच्या अवधीत ६५ प्राण्यांवर झाले आणि ते सर्व यशस्वी झाले.
कळके – लिलेहाय झडपा १९६८साली टिटेनियमपासून तयार केल्या. त्याच्या कडा टेफलॉनने आच्छादल्या होत्या. पहिले प्रोस्थेसिस १९६८च्या मार्चमध्ये बसवले होते. त्यानंतर लिलेहाय यांचेही लक्ष लिलेहाय कास्टर व्हाल्व्हवर केंद्रित होऊ लागले. हे प्रोस्थेसिस १९७०मध्ये प्रथम रोपण करण्यात आले. यामध्ये जवळजवळ ५५,००० पायरोलेटिक कार्बनच्या चकत्या बसवण्यात आल्या. परिणामी डॉ. कळके यांच्या झडपा काही वर्षे मागे पडल्या. पण काही काळाने लिलेहाय यांचे लक्ष पुन्हा कळके यांच्या झडपांकडे लागले. या झडपांसाठी पायरोलेटिक कार्बन या अतिशय कठीण पदार्थाची निवड केली. ह्या पदार्थामुळे हृदयाच्या झडपा बनवण्यामध्ये क्रांतीकारी शोध लागले.
डॉ. कळके टोपीवाला नॅशनल महाविद्यालयाचे अधिष्ठाता झाले. तसेच कार्डिओ वेस्क्युलर शल्यक्रिया विभागाचे प्रमुख झाले. १९८५ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते समाजकार्यात समरस झाले.
डॉ. कळके यांचे निधन मुंबई येथे झाले.
संदर्भ :
- Bhagavant Kalke and His Poineering Work on the Bi-Leaflet Heart Valve Prosthesis – Pankaj Saxena and Igor Konstantinov – Ann Thorac Surg, 2009;88: 344-7