मानवकुलाच्या उत्क्रांती टप्प्यातील एक महत्त्वाचा अवशेष. सिंधू आणि गंगा या नद्यांनी बनलेल्या गाळाच्या पठाराच्या उत्तरेस शिवालिक पर्वताच्या रांगा आहेत. घड्या घातल्याप्रमाणे दिसणाऱ्या या पर्वतांमध्ये अनेक ठिकाणी प्रायमेट गणातल्या परंतु आता नामशेष झालेल्या अनेक प्रजातींचे जीवाश्म आढळतात. अमेरिकन भूवैज्ञानिक जी. ई. लेवीस यांना १९३२ मध्ये पोतवार पठार आणि शिमला भागांत अनेक प्रायमेट जीवाश्म मिळाले होते. पंजाबमधील निम्नस्तर शिवालिक पर्वतरांगेत मिळालेल्या दोन प्रकारच्या जीवाश्मांना लेवीस यांनी सर्वप्रथम रामापिथेकस (Ramapithecus) हे नाव दिले. गोलाकार दंतकमानी व छोट्या आकाराच्या चेहऱ्यावरून त्याची गणना मानवकुलात केली गेली. अशा प्रकारे पुरामानवशास्त्रात रामापिथेकसचा उदय झाला. रामापिथेकसचा कालखंड हा १४ ते १८ दशलक्ष वर्षांपूर्वीचा मानला जातो.
लेवीस यांनी रामापिथेकसच्या जबड्याचा अभ्यास करून असे सुचवले की, रामापिथेकस हा मानव आणि कपी (गिबन, ओरँगउटान, चिंपँझी व गोरिला) यांच्यामधील दुवा आहे; तथापि हे संशोधन फारसे प्रसिद्ध झाले नाही. रामापिथेकसचा उत्क्रांतीशी संबंध नाही, असे ठाम प्रतिपादन स्मिथ्सोनियन संग्रहालयातील ज्येष्ठ संशोधक अॅलेस हार्डलिका यांनी केले होते. तसेच अमेरिकन संशोधक विल्यम ग्रेगरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानमधील कुंडलनाला येथे मिळालेला आणि रामापिथेकस मानलेला एक जीवाश्म रामापिथेकसपेक्षा अगदीच वेगळा असल्याचे पुढे सिद्ध झाले. साहजिकच १९६० पर्यंत रामापिथेकस जीवाश्मांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते.
येल विद्यापीठातील सुप्रसिद्ध पीबडी संग्रहालयात जमा झालेल्या सर्व रामापिथेकस जीवाश्मांचा नव्याने अभ्यास करून एल्विन सायमन्स् यांनी हे जीवाश्म निश्चितपणे मानवी उत्क्रांतीशी संबंधित आहेत, असे नमूद केले आणि जवळजवळ तीन दशके विस्मृतीत गेलेले रामापिथेकस हे नाव प्रकाशात आले. दरम्यान लुई लिकी या विख्यात पुरामानवशास्त्रज्ञांना केनियात फोर्ट टेर्नान येथे मिळालेल्या अशाच जीवाश्मांना केनियापिथेकस विकेरी असे नाव देण्यात आले होते. या प्रजातीने मानवपणाच्या दिशेने वाटचालीतील एक टप्पा गाठला असावा, असे लिकींचे म्हणणे होते. तथापि हे जीवाश्म आणि भारतात मिळालेले रामापिथेकस जीवाश्म तंतोतंत सारखे असल्याचे सायमन्स् यांनी जाहीर केले. ड्रायोपिथेकस पंजाबिकस असे वर्णन केलेल्या एका प्रायमेट प्रजातीचा समावेशही सायमन्स् आणि त्यांचा विद्यार्थी डेव्हिड पिलबीम यांनी रामापिथेकसमध्येच केला (१९६५).
रामापिथेकसचा मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध आहे, असे ठामपणाने मानल्याने १९६५ ते १९७० दरम्यान रामापिथेकसला ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या (Australopithecus) खालोखाल महत्त्व प्राप्त झाले. रामापिथेकसमध्ये मानवपणाची चाहूल दिसते, हे मानायला सर्व वैज्ञानिक तयार नसले, तरीही क्रमिक पुस्तकांमध्ये रामापिथेकस ही मानवी उत्क्रांतीच्या दिशेने प्रवास सुरू करणारी पहिली प्रजात असे शिकवले जात होते. रामापिथेकसचे जीवाश्म (अश्मीभूत स्वरूपात) शिवालिक क्षेत्राव्यतिरिक्त अन्य काही भागांतही आढळले. केनियात रूसिंगा, नोगोरोरा आणि ल्यूकिनो येथे आढळलेल्या अनेक जीवाश्मांची गणना रामापिथेकसमध्ये करण्यात आली. तसेच तुर्कस्थानातील पासलार येथे मिळालेले सुमारे दीड कोटी वर्षांपूर्वीचे अंकारापिथेकस (Ankarapithecus) हे जीवाश्म रामापिथेकसचे असल्याचे मत मांडणारे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. रामापिथेकस प्रजात यूरोपातही अस्तित्त्वात होती, असे मत काही संशोधकांनी मांडले. हंगेरीतील काही कोळसा खाणींमध्ये पूर्वी प्रायमेट जीवाश्म आढळले होते. रूडाबान्या (हंगेरी) येथे मिळालेल्या काही जीवाश्मांचे रामापिथेकस हंगेरीकस असे नामकरण झाले. ग्रीसमध्ये अथेन्स शहराजवळ मिळालेल्या प्रायमेट जीवाश्मांना मिसोपिथेकस पेन्टेलिकस असे म्हणत असत. यांचाही समावेश रामापिथेकसमध्येच करण्यात आला. चीनमध्ये लुफेंग येथे मिळालेल्या आणि सुमारे सव्वा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या एका प्रायमेट प्रजातीची गणना चिनी वैज्ञानिकांनी लुफेंगपिथेकस अशी वेगळ्या गटात केली होती. चिनी वैज्ञानिकांनी या प्रजातीच्या जीवाश्मांचा पुन्हा अभ्यास करून ते रामापिथेकसचेच असल्याचे जाहीर केले.
रामापिथेकसला मानवी उत्क्रांतीमध्ये एवढे महत्त्वाचे स्थान मिळाले, तेव्हा अभ्यासाचा मुख्य भर दातांची आणि कवटीची रचना यांच्यावर होता. मानवपणाचा शोध घेण्यासाठी त्या वेळी सुळ्यांच्या आकारात घट होणे, दोन पायांवर ताठ उभे राहणे आणि अवजारांचा वापर हे तीन मुख्य निकष मानले जात असत; तथापि रामापिथेकस जीवाश्म मिळालेल्या ठिकाणी कोठेही अवजारे आढळली नाहीत. तसेच रामापिथेकस दोन पायांवर उभे राहात होते की नाही, याबद्दलही अनेक वैज्ञानिकांमध्ये साशंकता होती. असे असूनही रामापिथेकस हा मानवाचा प्राचीनतम पूर्वज म्हणून प्रख्यात झाला. तसेच रामापिथेकस जीवाश्मांचा कालखंड एक कोटी वर्षांपूर्वीचा असल्याने मानवाचे अस्तित्व फार प्राचीन आहे आणि मानवाचा उगम आशिया खंडातून, विशेषतः शिवालिक पर्वतराजींतून झाला असे चित्र निर्माण झाले. तरीही रामापिथेकसच्या मानवी उत्क्रांतिवृक्षावरील (Evolutionary tree) नेमक्या स्थानाबद्दलची गुंतागुंत वाढतच चालली होती.
१९८० मध्ये रामापिथेकसच्या मानवी उत्क्रांतीमधील स्थानाला धक्का लागायला सुरुवात झाली. कारण नवीन शोधमोहिमांमधून अनेक प्रजातींचे प्रायमेट जीवाश्म मिळू लागले होते. उदा., केनियात फोर्ट टेर्नान येथे १९७६ मध्ये मिळालेल्या रामापिथेकसच्या जबड्याचा पुन्हा अभ्यास झाल्यावर त्यामध्ये मानवी उत्क्रांतीच्या दिशेने अजिबात प्रगती झालेली नाही, हे सिद्ध झाले. पीटर ॲन्ड्र्यूज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९८० मध्ये शिवापिथेकस आणि रामापिथेकस जीवाश्मांचा सखोल अभ्यास करून त्यांनी असे मत मांडले की, या दोन प्रजातींमध्ये प्रचंड साम्य असल्याने रामापिथेकसला वेगळे मानण्याचे काहीही कारण नाही. याचप्रमाणे पूर्वी रामापिथेकसला वेगळे स्थान देण्याचे समर्थक असणारे डेव्हिड पिलबीम यांनी पाकिस्तानातील नवीन जीवाश्मांच्या अभ्यासानंतर आपले मत पूर्णपणे फिरवले. रामापिथेकस जीवाश्मांची शारीरिक लक्षणे मानवासारखी नसून ती ओरांगउटान या कपीप्रमाणे आहेत, हे स्पष्टपणे समजून आले. रामापिथेकस हा कदाचित ओरांगउटान या आशियाई कपींचा पूर्वज असावा, असे मानले जाते. त्यामुळे रामापिथेकसचे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्व कमी झाले आहे. काही दशकांपूर्वी पुस्तकांमध्ये मानवाचा आद्यपूर्वज म्हणून रामापिथेकसचा असलेला समावेश आता इतर जीवाश्म प्रजातींमध्ये करण्यात येत असल्याने त्याचे हे गाजलेले रामापिथेकस नावही रद्दबातल ठरलेले आहे.
संदर्भ :
- Michael, Allaby, Ed., A Dictionary of Earth Sciences, Oxford, Oxford University Press, 2008.
- Andrews, Peter & Evans, Elizabeth Nesbit ‘The Environment of Ramapithecus in Africaʼ, Paleobiology 5 (1): 22-30. 1979.
- Buettner-Janusch, John Ed., Evolutionary and Genetic Biology of Primates, New York, Academic Press, 1963.
- Kennedy, K. A. R. God-Apes and Fossil Men : Paleonanthropology of South Asia, Ann Arbor, University of Michigan Press, 2000.
समीक्षक – शौनक कुलकर्णी