पिल्टडाउन मानव ही विज्ञानाच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध घटना आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानवी उत्क्रांतीबद्दल अनेक मतप्रवाह प्रचलित होते. मानवाचा उगम मर्कटसदृश प्राण्याप्रासून झाला हे सिद्ध करण्याएवढे जीवाश्म उपलब्ध नव्हते. या पार्श्वभूमीवर पिल्टडाउन मानव हा बनवाबनवीचा (hoax) प्रकार घडला. कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास टाकला की काय होते, याचा पिल्टडाउन मानव हा विज्ञानाच्या इतिहासातील एक मोठा धडा आहे.

पिल्टडाउन मानव या बनावट जीवाश्माच्या कथेची सुरुवात १९१२ मध्ये झाली. चार्ल्स डॅासन (१८६४–१९१६) या हौशी पुरातत्त्वज्ञांनी लंडनच्या साउथ किंगस्टन येथील नॅचरल हिस्ट्री संग्रहालयामध्ये एक मानवी कवटीचा जीवाश्म, इतर प्राण्यांचे काही जीवाश्म आणि काही आदिम अवजारे आणून दिली. हे सगळे अवशेष आपण इंग्लंडमधील ससेक्स परगण्यातील पिल्टडाउन गावाजवळून आणले आहेत, असे त्यांनी सांगितले. नॅचरल हिस्ट्री संग्रहालयातील अभिरक्षक आर्थर स्मिथ वूडवर्ड (१८६४–१९४४) आणि डॅासन यांनी पिल्टडाउन येथे उत्खनन केल्यानंतर त्यांना एक मानवी वाटणारा खालचा जबडा आणि इतर काही अवशेष मिळाले. कवटी आणि खालचा जबडा एकाच प्राण्याचे आहेत असे सांगून वूडवर्ड यांनी मानवी उत्क्रांतीमधील आतापर्यंत न मिळालेला मानव-कपि दुवा (Missing link) सापडल्याची घोषणा केली. पाठोपाठ १९१३ मध्ये तशाच प्रकारचा दात मिळाला. सर आर्थर किथ (१८६६–१९५५), ग्राफ्टन इलियट स्मिथ (१८७१–१९३७) आणि हेन्री एफ. ओसबोर्न (१८५७–१९३५) अशा विख्यात वैज्ञानिकांनी पिल्टडाउन जीवाश्माला मान्यता दिली. त्याचे इओॲन्थ्रोपस डॅासनी (Eoanthropus dawsoni) असे नामकरणही झाले. अशा प्रकारे कपीसारखा असणारा मानवाचा हा पूर्वज विज्ञानाला कलाटणी देणारा पुरावा म्हणून गाजू लागला आणि त्याचा समावेश मानवशास्त्राच्या आणि जैवविज्ञानाच्या क्रमिक पुस्तकांमध्येही झाला.

पिल्टडाउन मानव जीवाश्म सापडल्यापासूनच डेव्हिड वॅाटरसन व गेरीट स्मिथ मिलर (१८६९–१९५६) अशा काही वैज्ञानिकांनी त्याबद्दल शंका व्यक्त केल्या होत्या. रेमन्ड डार्ट (१८९३–१९८८) या दक्षिण आफ्रिकी भौतिक मानवशास्त्रज्ञांना १९२५ मध्ये त्वांग बालक (Taung child) नावाने प्रसिद्ध झालेला जीवाश्म (ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस) आढळला. यानंतर १९३६ मध्ये रॅाबर्ट ब्रूम (१८६६–१९५१) यांना स्टर्कफोन्तेन येथे मानवी उत्क्रांतीसंबंधी अनेक जीवाश्म (पॅरान्थ्रोपस) आढळले. तरीदेखील पिल्टडाउन मानवाचा (मानवाचा उगम युरोपातच झाला या समजुतीचा) पगडा असल्याने हे नवीन संशोधन मान्य होत नव्हते.

पिल्टडाउन मानवासंबंधी वादविवादांना १९५३ मध्ये कलाटणी मिळाली. केनेथ ओकले (१९११–१९८१) यांनी फ्लुरीन, फॅास्फरस आणि नायट्रोजन यांच्यावर आधारित तौलनिक कालमापनाची पद्धत विकसित केली होती. ओकले यांनी ऑक्सफर्ड येथील शास्त्रज्ञ जोसेफ वाईनर आणि विल्फ्रेड ली ग्रॉस क्लर्क (१८९५–१९७१) यांच्या संशोधनात सहभागी होऊन असे निदर्शनास आणले की, पिल्टडाउन मानव अवशेषांची कवटी जुनी आणि खालचा जबडा आधुनिक काळातील आहे. तसेच दात जुने वाटावेत म्हणून ते कानशीने घासले असल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनामुळे कोणीतरी जुनी मानवी कवटी आणि ओरांगउटानचा खालचा जबडा एकत्र करून व त्यांना रंगवून बनावट जीवाश्म तयार केला होता, त्याचप्रमाणे हत्तीच्या हाडाला लोखंडी हत्यारांनी कापून व घासून प्रागैतिहासिक वाटावीत अशी हत्यारे बनवली होती, असे दिसून आले. पुढे सर गेविन डी बीर (१८९९–१९७२) या नॅचरल हिस्ट्री संग्रहालयाच्या संचालकांनी १९५४ मध्ये ‘पिल्टडाउन मानवाचे भूत गाडल्याचीʼ घोषणा केली. यानंतर क्रमिक पुस्तकांमधून पिल्टडाउन मानव अभ्यासाची गच्छंती झाली.

पिल्टडाउन मानव जीवाश्म खोटे होते, हे कळल्यावर त्याचे अनेक परिणाम झाले. मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांताला न मानणाऱ्या व मानवाची निर्मिती देवाने केली असे प्रतिपादन करणाऱ्या (Creationists) लोकांच्या हातांत कोलीत मिळाले. पिल्टडाउन मानवाचे उदाहरण देऊन वैज्ञानिक कसे लबाडी करतात, हे ते सांगू लागले. ही लबाडी कोणी केली याबद्दल अभ्यासाला सुरुवात झाली. पिल्टडाउन मानवाला मान्यता देणारे मानवशास्त्रज्ञ सर आर्थर किथ, आर्थर स्मिथ वूडवर्ड आणि चार्ल्स डॅासन अशा अनेकजणांवर संशय होता. याखेरीज शेरलॅाक होम्स कथांचे सुप्रसिद्ध लेखक आर्थर कॅानन डॅाइल (१८५९–१९३०) यांचेही नाव संशयित म्हणून चर्चेत होते. तथापि २०१६ मध्ये झालेल्या संशोधनातून आर्थर कॅानन डॅाइल यांच्यावरचा संशय दूर झाला असून ही लबाडी चार्ल्स डॅासन यांनीच केली, असे सिद्ध झाले आहे.

संदर्भ :

  • De Groote, Isabelle; Fink, Girdland Linus; Abbas, Rizwan; Bello, Silvia M. & and Burgia, Lucia ‘New Genetic and Morphological Evidence Suggests a Single Hoaxer Created Piltdown Manʼ, The Royal Society Open Science, 2016.
  • MacRitchie, Finlay, Scientific Research as a Career, CRC Press, 2011.
  • Weiner, J. S. Piltdown Forgery, Oxford, Oxford University Press, 2004.
  • Spencer, Frank, Piltdown : A Scientific Forgery, London, 1990.

समीक्षक – शौनक कुलकर्णी